मौलवींना गाव सोडून जाण्याची विश्‍व हिंदू परिषदेची चेतावणी

गुरुग्राममधील भोरा कलानमध्ये मशिदीच्या बांधकामाच्या नावाखाली ‘लँड जिहाद’ची घटना !

मौलवी म्हणजे ‘इस्लामचे धार्मिक नेते’

विश्‍व हिंदु परिषदेचे संयुक्त सरचिटणीस सुरेंद्र जैन

गुरुग्राम (हरियाणा) – विश्‍व हिंदु परिषदेचे संयुक्त सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी १६ ऑक्टोबर या दिवशी हरियाणातील मानेसर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात    मौलवींना त्यांचे गाव सोडून जाण्याची चेतावणी दिली. गुरुग्राममधील भोरा कलानमध्ये मशिदीच्या बांधकामाच्या नावाखाली ‘लँड जिहाद’ची घटना समोर आल्यानंतर त्यांनी ही चेतावणी दिली.

१. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार मानेसरमध्ये  विश्‍व हिंदु परिषदेने ‘त्रिशूल दीक्षा’ कार्यक्रम आयोजित केला होता.

२. या कार्यक्रमाला संबोधित करताना सुरेंद्र जैन म्हणाले की, गुरुग्राममधील भोरा कलान गावात मुसलमानांनी अवैधपणे जमीन कह्यात घेतली आहे. १२-१३ वर्षांपूर्वी भोरा कलानमध्ये ३ मुसलमान कुटुंबे आली होती. या गावात शेळ्या चरत असलेल्या जमिनीवर नमाजपठणासाठी त्यांनी अनुमती मागितली.

३. त्यावेळी बाहेरून कुठलाही मौलवी येणार नाही असे ठरले होते; परंतु हळूहळू बाहेरून मौलवी येऊ लागले. त्यांना संपूर्ण देशाचे धर्मांतर करायचे आहे.

४. गुरुग्रामच्या भोरा कलान गावात १२ ऑक्टोबर या दिवशी काही लोकांनी मशिदीत घुसून नमाजपठण करणार्‍यांना बेदम मारहाण केली होती आणि गाव सोडून जाण्याची चेतावणी दिली होती.