देवाप्रती भाव असलेला ५४ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला तळेगाव दाभाडे, पुणे येथील कु. मनन श्रेय टोंपे (वय ९ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मनन श्रेय टोंपे हा या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले ‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – परात्पर गुरु डॉ. आठवले |
‘वर्ष २०१५ मध्ये ‘कु. मनन श्रेय टोंपे उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आला असून तो ५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२२ मध्ये त्याची आध्यात्मिक पातळी ५४ टक्के झाली आहे. आता त्याच्यातील भाव, साधनेची तळमळ आणि पालकांनी केलेले योग्य संस्कार यांमुळे त्याची साधनेत प्रगती होत आहे.’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१०.८.२०२२) |
१. डॉ.(सौ.) कृपा श्रेय टोंपे (चि. मनन टोंपे याची आई), तळेगाव दाभाडे, पुणे.
१ अ. व्यवस्थितपणा : मनन बाहेर जातांना नवीन कपडे घालून गेला, तर घरी आल्यावर आठवणीने ते काढून घडी घालून ठेवतो आणि घरात घालायचे कपडे घालून झोपतो. तो त्याची प्रत्येक गोष्ट स्वच्छ ठेवतो. त्याचे रहाणीमानसुद्धा नीटनेटके आहे.
१ आ. काटकसरी वृत्ती : मी मननला नवीन कपडे घेण्यासाठी दुकानात नेल्यावर मी त्याला ३ – ४ ‘टी-शर्ट’ घेण्यास सांगते. तेव्हा तो मला म्हणतो, ‘‘आई, मी एका वेळी एकच ‘टी-शर्ट’ घालतो; म्हणून तू मला दोनच ‘टी-शर्ट’ घेऊन दे.’’ तो टी-शर्ट’चे मूल्य विचारतो आणि ‘ते अधिक महाग नाहीत ना !’, असा सगळा विचार करूनच ‘टी-शर्ट’ घेतो. मनन कुठल्याही दुकानात गेल्यावर कधीच काही घेण्यासाठी हट्ट करत नाही.
१ इ. खाण्याविषयी आवड-नावड नसणे : मननला खाण्याविषयी काहीच आवड-नावड नाही. त्याला भूक लागली की, तो जे असेल, ते खाऊन घेतो. तो मला किंवा आजीला खाण्यासाठी कधीच त्रास देत नाही.
१ ई. भाव
१ ई १. मोठ्या भावाचे पाहून शिवलिंग सिद्ध करणे आणि त्याची प्रदोष काळी सकाळी उठून सोवळे नेसून पंचामृताने पूजा करणे : ‘दळणवळणबंदीपूर्वी प्रथम चि. नलिन (मननचा मोठा भाऊ, वय ११ वर्षे, आध्यात्मिक पातळी २०२० मध्ये ५७ टक्के) याने शिवलिंग सिद्ध केले होते. तेव्हा त्याचे पाहून मनननेसुद्धा लहान शिवलिंग सिद्ध केले आणि तो दादाप्रमाणे प्रदोष काळी (प्रत्येक मासातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी या तिथीला ‘प्रदोष’ म्हणतात.) त्या शिवलिंगाची अगदी सकाळी उठून सोवळे नेसून पंचामृताने पूजा करत असे. तो नेहमी दादाच्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करतो आणि दादाचे काही चुकीचे वाटल्यास तो मला सांगतो.
१ ई २. लक्ष्मीदेवीचे चित्र असणारे फटाके फोडले असता कागदाचे सर्व तुकडे गोळा करून चिकटवण्यासाठी घरी आणणे : वर्ष २०२१ च्या दिवाळीत काही जणांनी लक्ष्मीदेवीचे चित्र असणारे फटाके फोडले. तेव्हा ज्या ठिकाणी फटाके फोडले गेले, त्या मार्गाने मनन जात असतांना त्याने लक्ष्मीदेवीचे चित्र असणारे सर्व तुकडे गोळा केले. त्याने ते तुकडे खिशात भरून घरी आणले आणि मला चिटकवण्यास दिले.
१ ई ३. मी त्याला दळणवळणबंदीच्या काळात शाळेला सुटी असतांना प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करायला शिकवल्या. त्या तो प्रतिदिन करतो.
१ उ. स्वभावदोष : मनाविरुद्ध काही घडल्यास वाईट वाटणे (रडू येते) आणि भ्रमणभाषचा अधिक वापर करणे’
(१७.२.२०२२)
२. श्री. प्रसाद देव (कु. मनन टोंपे याचा मामा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
२ अ. वक्तशीरपणा : ‘मी गोव्याला येतांना तळेगाव दाभाडे येथे माझ्या बहिणीकडे (डॉ. (सौ.) कृपा श्रेय टोंपे यांच्याकडे) गेलो होतो. त्या दिवशी नेहमीप्रमाणे कु. मनन सायंकाळी ५ ते ७ वाजेपर्यंत त्याच्या मित्रांच्या समवेत खेळण्यासाठी जाणार होता. तेव्हा मी त्याला म्हणालो, ‘‘आज मी आलो आहे. त्यामुळे तू तुझ्या मित्रांना ‘आज माझा मामा आला आहे. आपण एक घंटाच खेळूया’, असे सांग. तुला सायंकाळी श्लोकही म्हणायचे असतात ना ?’’ तेव्हा त्याने मला लगेच उत्तर दिले, ‘‘मामा, ठीक आहे. मी सायंकाळी ६ वाजेपर्यंत घरी परत येतो.’’ असे सांगून तो खेळायला गेला. तो बरोबर सायंकाळी सहा वाजता खेळून परत आला. तेव्हा मी त्याला विचारले, ‘‘तुला ६ वाजल्याचे कसे कळले ?’’ त्यावर तो मला म्हणाला, ‘‘मी माझ्या एका मित्राला ‘सहा वाजले की, मला आठवण करून दे’, असे सांगितले होते.’’ हा प्रसंग मी माझ्या बहिणीला सांगितला. तेव्हा ती मला म्हणाली, ‘‘अरे, हो. तो त्याची सर्व कामे, उदा. जेवणे, अल्पाहार करणे आणि खेळणे इत्यादी अगदी वेळेत करतो.” (१०.६.२०२२)