कुटुंबियांवर धार्मिक संस्कार करणारे आणि तळमळीने भगवद्गीतेचा प्रसार करणारे एक उत्साही व्यक्तीमत्त्व असलेले माधवनगर (जिल्हा सांगली) येथील पू. (कै.) हेमराज बलदेवजी जाखोटिया (वय ८४ वर्षे) !
वर्ष २०१८ मध्ये सौ. चंद्ररेखा नटवरलाल जाखोटिया यांनी त्यांचे चुलत सासरे आणि सांगलीतील एक प्रतिष्ठित व्यक्ती श्री. हेमराज जाखोटिया यांच्याविषयी त्यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये लिहिली होती. ६.१०.२०२२ या दिवशी हेमराज जाखोटिया (वय ८४ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. १८.१०.२०२२ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने कै. (सौ.) चंद्ररेखा जाखोटिया यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी लिहिलेला लेख प्रसिद्ध करत आहोत.
माधवनगर, सांगली येथील सनातनच्या साधिका सौ. चंद्ररेखा नटवरलाल जाखोटिया (वय ६१ वर्षे) यांचे १६.६.२०२१ या दिवशी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वर्ष २०२० मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के होती. त्यांचे पूर्ण कुटुंब सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार पूर्णवेळ साधना करत असून त्यांचे यजमान श्री. नटवरलाल जाखोटिया (वय ६६ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, तर त्यांचे द्वितीय सुपुत्र श्री. आनंद यांची पातळी ६३ टक्के आहे.
१. माधवनगर येथील आदर्श आणि धार्मिक नेतृत्व असलेले कै. हेमराज जाखोटिया !
‘माधवनगर, सांगली येथे कुणाचे नेतृत्व आदर्श आणि धार्मिक आहे ?’, असे विचारल्यास ‘श्री. हेमराज (पापालालजी) जाखोटिया’ यांचे नाव डोळ्यांसमोर आल्याविना रहात नाही. जाखोटिया परिवारातील आम्ही सर्व सदस्य आणि गावातील काही व्यक्ती त्यांना ‘बापूजी’ या नावाने संबोधायचो. बापूजी सांगलीतील ‘श्रीकृष्ण मंदिर’ आणि ‘हनुमान सेवामंडळ’ यांचे विश्वस्त होते.
२. धार्मिक वृत्ती
प्रतिदिन पूजा आणि अग्निहोत्र करण्याचा नेम ते कधीही चुकवत नसत. त्यांचे गोमातेवर विशेष प्रेम होते. त्यांनी घरी गाय पाळली होती. ते गायीची सेवा करायचे.
३. ‘कुटुंबातील आणि समाजातील व्यक्तींवर धार्मिक संस्कार व्हावेत’, ही तळमळ असणे
३ अ. पू. बापूजींनी राधा-कृष्ण मंदिरात ध्वनीक्षेपकावर आरत्या आणि नामजप लावणे : माधवनगर येथे पू. बापूजींनी राधा-कृष्ण मंदिर बांधले आहे. या मंदिरासाठी त्यांनीच जागाही दिली आहे. ते या मंदिराच्या ध्वनीक्षेपकावर आरत्या, नामजप आणि हनुमानचालीसा लावत. त्यामुळे तेथील नागरिकांच्या दिवसाचा आरंभ आध्यात्मिक चिंतनाने होत असे. याचे सारे श्रेय पू. बापूजींनाच द्यावे लागेल.
३ आ. मुलांवर चांगले संस्कार करणे
१. आपली मुले आणि नातवंडे यांच्यावर ‘लहानपणापासून चांगले संस्कार व्हावेत’, यासाठी ते घरातील लहान मुलांना प्रतिदिन मंदिरात घेऊन जात. तेथे मुलांनी ध्वनीक्षेपकावर हनुमानचालीसा आणि भजने म्हणावीत, यासाठी ते प्रोत्साहन देत.
२. जवळपास रहाणार्या सर्व मुलांना एकत्र करून ते त्यांच्याकडून नामजप आणि आरती करून घेत. ते मुलांकडून हनुमानचालीसा आणि विष्णुसहस्रनाम यांचे पठण करून घेत अन् भगवद्गीतेचे वाचनही करून घेत.
त्यांच्यामुळे आम्हा कुटुंबियांमध्ये अध्यात्माची आवड निर्माण झाली आणि आमच्यावर धार्मिक संस्कारही झाले.
४. सत्संगाची आवड
सत्संग मिळवण्याची एकही संधी ते सोडत नसत. वर्षातून २ – ३ वेळा हरिद्वार आणि ऋषिकेश या तीर्थक्षेत्री त्यांचे १५ ते २० दिवस वास्तव्य असायचे. तेथे चालू असलेल्या ‘भागवत’ आणि ‘रामायण’ यांच्या कथावाचनातून ते सत्संगाचा लाभ करून घ्यायचे.
५. सेवाभावी वृत्ती
मंदिरातील देवाच्या मूर्तीसाठी हार बनवणे, फलकांवर सण-उत्सव यांसंदर्भात नियमित लिखाण करणे, सांगलीत कीर्तन-प्रवचन यांचे आयोजन करणे, ते करण्यासाठी आलेल्या साधू-संतांच्या निवास आणि भोजन यांची व्यवस्था करणे, आदी सेवा ते अखंड अन् न थकता करायचे.
माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असूनही त्यांनी तन-मन-धन अर्पून अशा प्रकारे सेवा केली. गेले २० – २५ वर्षे मी त्यांना पाहिले आहे. ‘ते कधीही आजारी पडले किंवा खूप थकले आहेत’, असे मला जाणवले नाही.
६. अहंभाव नसणे
वर्ष २०११ मध्ये कर्नाटकातील ‘शृंगेरी शारदा पिठा’च्या वतीने झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील ‘गीता पाठांतर स्पर्धे’त त्यांना पिठाचे महाधिपती जगद्गुरु शंकराचार्यजी यांच्या हस्ते २१ सहस्र रुपयांचे रोख पारितोषिक मिळाले होते; पण याचा त्यांना अहंकार नव्हता.
७. देवतांची विटंबना रोखण्याची तळमळ
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले ‘श्रीरामाची विटंबना रोखा’ हे पत्र त्यांना पुष्कळ आवडले होते. त्या पत्राच्या छायांकित प्रती (झेरॉक्स) काढून त्यांनी राधा-कृष्ण मंदिराच्या फलकावर चिकटवण्यास सांगितले होते.
८. श्रीकृष्णभक्त पू. बापूजी यांनी ‘भगवद्गीता’ या पवित्र ग्रंथाचा केलेला प्रसार !
अ. बापूजी श्रीकृष्णभक्त होते. भगवद्गीतेचा प्रचार ते वेगवेगळ्या माध्यमांतून करत. गीताजयंतीच्या दिवशी ते भगवद्गीता तोंडपाठ म्हणणार्यास पारितोषिक द्यायचे. त्यांचा हा उपक्रम अनेक वर्षांपासून चालू होता. आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी पारितोषिके दिली आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थी वर्गात गीतेचे पाठांतर करण्याची तळमळ वाढली.
आ. बापूजींची मुले, मुली, सुना आणि नातवंडे यांनाही भगवद्गीता तोंडपाठ आहे. घरी कौटुंबिक कार्यक्रमातही ते ‘भगवद्गीता’ हा ग्रंथ भेट म्हणून द्यायचे.
इ. गीता प्रेस, गोरखपूरचे ग्रंथ आणि अन्य संतसाहित्य यांच्या विक्रीत त्यांचा मोलाचा सहभाग होता. ते त्या ग्रंथांचे घाऊक विक्रेते होते. हे ग्रंथ ते नातेवाईक आणि जिज्ञासू यांना वाचण्यासाठी देत, तसेच त्यांनी बांधलेल्या मंदिरात विक्रीसाठीही ठेवत.
९. भागवत सप्ताहाचा लाभ सर्वांना व्हावा, यासाठी प्रयत्न करणे
शुक्रताल (उत्तरप्रदेश) या तीर्थक्षेत्राचे महत्त्व लक्षात घेऊन पू. बापूजी तेथे भागवत सप्ताहाचे उत्कृष्ट नियोजन करत. या भागवत सप्ताहाचा लाभ सर्वांना घेता यावा, यासाठी ते नातेवाइकांना तेथे येण्यास प्रवृत्त करत.
प्रार्थना
पू. बापूजी यांच्या व्यावसायिक जीवनापेक्षा त्यांचे आध्यात्मिक जीवन आम्हाला अधिक अनुभवायला मिळाले. ‘त्यांची निस्सीम कृष्णभक्ती आणि त्यांनी इतरांना दिलेली प्रेरणा, यांतून आम्हाला शिकता येऊ दे. पू. बापूजी यांचे गुण आम्हा सर्व कुटुंबियांमध्ये येऊ देत’, हीच परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. चंद्ररेखा नटवरलाल जाखोटिया (मृत्यूसमयी वय ६१ वर्षे आणि वर्ष २०२० मधील आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.५.२०१८)
(‘सौ. चंद्ररेखा जाखोटिया यांचे १६.६.२०२१ या दिवशी निधन झाले. मृत्यूपूर्वी त्यांनी हा लेख लिहिला होता.’ – संकलक)