भाग्यनगर येथील साधिका श्रीमती पद्मा शेणै यांची बहीण आणि तिचे यजमान यांना रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील वास्तव्यात जाणवलेली सूत्रे
१. बहिणीच्या यजमानांचा स्वभाव अबोल आणि कुणामध्ये न मिसळणारा असणे
माझी बहीण सौ. स्मिता सतीश पै हिच्या यजमानांचा (श्री. सतीश पै यांचा) स्वभाव अबोल आहे. त्यांचे काम झाले की, ते घरीच रहातात. त्यांना कुठेही जाणे-येणे आवडत नाही. काही कारणांनी गावी जायचे ठरल्यास ते म्हणतात, ‘‘तुम्ही सर्व जाऊन या. मी घरीच रहातो.’’ ते दूरदर्शनवर वृत्ते आणि क्रिकेट या दोन गोष्टी बघत असतात. त्यांना आवड-नावड असल्याने त्यांना जेवणातही बर्याच गोष्टी चालत नाहीत. गुरुकृपेने ते प्रतिदिन बसून नामजप करतात.
२. बहिणीने राष्ट्रीय भक्तीसत्संग आवडीने ऐकणे
माझी बहीण प्रत्येक वेळी न चुकता राष्ट्रीय भक्तीसत्संग ऐकते. तिला काही कारणाने सत्संग ऐकता आला नाही, तर ती पुनर्मुद्रित सत्संग ऐकते. सत्संग ऐकल्यावर ती सत्संगात सांगितलेले संदर्भ उदाहरण म्हणून सर्वांना सांगते. ती मला म्हणते, ‘‘त्या सत्संग घेणार्या सद्गुरु ताई (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ) किती दैवी आहेत ! ‘त्यांचा आवाज ऐकतच रहावा. त्यांचे बोलणे संपूच नये’, असे मला वाटते. तुम्ही सर्वजण त्यांच्या सान्निध्यात रहाता. किती भाग्यवान आहात ! मला केवळ एकदा तरी त्यांना भेटायला मिळेल का गं ?’’
३. रामनाथी आश्रमातील वास्तव्यात बहीण आणि तिचे यजमान यांना जाणवलेली सूत्रे
परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या कृपेमुळे त्या दोघांना ३.३.२०२२ या दिवसापासून ४ – ५ दिवस सनातनच्या रामनाथी आश्रमात रहाण्याची संधी मिळाली. तेव्हा त्यांना आश्रमजीवन अनुभवायला मिळाले. त्या कालावधीत त्यांना आश्रमाच्या संदर्भात पुढील सूत्रे जाणवली.
अ. रामनाथी आश्रम स्वच्छ असून तेथील प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असते.
आ. आश्रमात प्रत्येक कृती समयमर्यादेचे पालन करत केली जाते.
इ. आश्रमात घरच्या पेक्षाही उत्तम आणि चैतन्यमय महाप्रसाद ग्रहण करतांना त्यांनी सांगितले, ‘‘हे केवळ मनुष्यबळावर शक्य नाही. गुरूंची अपार शक्ती आणि संकल्प यांमुळे हे सर्व होत आहे, हे स्पष्ट आहे.’’ त्यांना येथे बनवलेला प्रत्येक पदार्थ आवडला.
ई. ध्वनीचित्रफितीच्या (सी.डी.च्या) माध्यमातून संस्थेचे कार्य, साधकांनी साधनेत केलेले प्रयत्न, हे सर्व पाहून ते निःशब्द झाले.
४. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांची भेट झाल्यावर चैतन्यदायी रामनाथी आश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि ‘स्वतःचे घरही गुरूंचा आश्रम आहे’, असा भाव निर्माण होणे
शेवटी त्यांची श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्याशी भेट झाली. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताईंनी त्यांना विचारले, ‘‘कसा वाटला आश्रम ? आमच्या काही चुका झाल्यास आम्हाला सांगा ! ’’ त्यांनी असे म्हणताच बहिणीचे यजमान कृतज्ञता व्यक्त करत म्हणाले, ‘‘आजपर्यंतच्या माझ्या आयुष्यात असे आरामदायी आणि चैतन्यदायी ठिकाण मला कधीही बघायला मिळाले नाही. माझ्या आयुष्यात मी कधीही हे ठिकाण विसरणार नाही. हुब्बळ्ळीला आमच्या घरी तुम्ही आणि साधक कधीही या. इथे पाहिल्याप्रमाणे आम्हीही ‘आमचे घर गुरूंचा आश्रमच आहे’, या भावाने ठेवण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न करू.’’ असे म्हणून प्रसाद घेऊन ते बाहेर आले. जाता जाता त्यांनी मला सांगितले, ‘‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ काही सामान्य नाहीत. त्या साक्षात् देवीच आहेत. आमचे पूर्वसुकृत; म्हणून या देवीचे दर्शन आम्हाला लाभले. कृतज्ञता !’’
– श्रीमती पद्मा शेणै (सौ. स्मिता पै यांची बहिण) (आध्यात्मिक पातळी ६१, वय ६१ वर्षे), आंध्रप्रदेश. (१०.३.२०२२)