बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)
बलीप्रतिपदा (दिवाळी पाडवा)
अत्यंत दानशूर, परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलीराजाला भगवान श्रीविष्णूने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. त्रिपाद भूमी दान मागून वामनाने बलीराजाला जरी पाताळात धाडले असले, तरी सर्वार्थाने त्याचे कल्याणच केले आहे. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागेदेखील या घटनेचा प्रमुख आधार आहे.
१. तिथी
कार्तिक शुद्ध प्रतिपदा ( दिवाळी पाडवा ). श्रीविष्णूने ही तिथी बलीराजाच्या नावाने केली, म्हणून या तिथीला ‘बलीप्रतिपदा’ म्हटले जाते.
२. इतिहास
बलीराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते दान तो त्याला देत असे. ‘दान देणे’ हा गुण आहे; पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे अन् तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत्त होऊन वाटेल तसे वागू लागतात. बलीराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूने मुंजा मुलाचा अवतार (वामनावतार) घेतला. (मुंजा मुलगा लहान असतो अन् तो ‘ॐ भवति भिक्षां देही ।’ म्हणजे ‘भिक्षा द्या’ असे म्हणतो.) वामनाने बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, ‘‘काय हवे ?’’ तेव्हा वामनाने त्रिपाद भूमीदान मागितले. ‘वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार’, याचे ज्ञान नसल्याने बलीराजाने त्रिपाद भूमी वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराटरूप धारण करून एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्या पावलाने अंतरिक्ष व्यापले अन् त्याने ‘‘तिसरा पाऊल कोठे ठेवू ?’’, असे बलीराजास विचारले. त्यावर बलीराजा म्हणाला, ‘‘तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा.’’ तेव्हा ‘तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून बलीराजाला पाताळात घालावयाचे’ असे ठरवून वामनाने, ‘‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग (वरं ब्रूहि)’’, असे त्याला सांगितले. तेव्हा त्याने वर मागितला, ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याचे जे सर्व घडले, ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे. प्रभू, यमाप्रीत्यर्थ दीपदान करणार्याला यमयातना होऊ नयेत, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा.’ ते तीन दिवस म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला ‘बलीराज्य’ असे म्हणतात.
आध्यात्मिक महत्त्व : बलीराजाला दिलेल्या वचनानुसार दिवाळीचे तीन दिवस आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी यमदीपदान केल्यामुळे जिवावर आलेले अपमृत्यूचे संकट टळते अन् धर्माचरण करणार्या व्यक्तींच्या घरी लक्ष्मी निवास करते. हे तीन दिवस पृथ्वीवर बलीचे राज्य असेल, असे सांगून भगवंताने त्याचा निस्सीम भक्त जरी असुर असला, तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे. यावरून भगवंताची तत्त्वनिष्ठा, भक्तवत्सलता आणि दातृत्व हे गुण प्रकर्षाने दिसून येतात.
भावार्थ – ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा करत देवत्वाला पोहोचलेल्या बलीची आठवण करावी ! : बलीप्रतिपदेला बलीची पूजा करतात. बलीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा आणि दानी राजा होता. प्रत्येक मानव हा प्रारंभी अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यांमुुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो, हे या उदाहरणावरून दिसून येते. अशा निर्भयतेने सत्यकर्माचे पालन केल्यावर त्याला मृत्यूभयच रहात नाही. यमसुद्धा त्याचा मित्र आणि बंधू होतो. या दिवशी भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की, भगवंत हा सर्वस्व अर्पण करणार्याचा दाससुद्धा होण्याची सिध्दता ठेवतो. बली वास्तविक असुर घराण्यातील असूनसुद्धा त्याच्या उदार तत्त्वामुळे आणि त्याने भगवंताला शरण जाऊन आपले सर्वस्व अर्पण केल्यामुळे भगवंताने त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या जीवनाला कलाटणी दिली आणि त्याचा उद्धार केला. त्याच्या राज्यात असलेले असुरवृत्तीला पोषक असे भोगमय विचार घालवून, त्या ठिकाणी त्यागाची भावना रुजवून, जनतेला दैवीविचार देऊन सुख आणि समृद्धी यांचे जीवन प्रदान केले.
– प.पू. पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
३. महत्त्व
दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. हा ‘विक्रम संवत’ कालगणनेचा वर्षारंभदिन म्हणून साजरा करतात.
आध्यात्मिक महत्त्व : अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी (दसरा) हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. साडेतीन मुहुर्तांना ईश्वराची पराशक्ती ब्रह्मांडात प्रक्षेपित होत असते. या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्त्वगुणाला चालना मिळून सर्वत्र मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांच्या वेळी अनेक शुभकर्मे केली जातात.
४. वैशिष्ट्ये
अ. हा दिवस दिवाळीतील दिवस असल्याने आनंद वाटत असला, तरी या दिवशी सूक्ष्मातून दाब असतो. ही तिथी असुराची असल्याने त्यांच्या वृत्तीप्रमाणे तिथीची निर्मिती होते. त्यामुळे या दिवशी बाह्य वातावरणाबरोबर स्वतःच्या अंतःकरणाचे निरीक्षण करा.
आ. हा दिवस क्षमेचा असल्याने या दिवशी चुका केलेल्या जिवांना क्षमा करून त्यांना नवीन संधी दिल्यास ते जीव पुढे जाऊन सत्त्वमय होतात.
इ. या दिवशी बर्याच ठिकाणी मांसाहार करण्याची प्रथा असली, तरी मांसाहार करणे टाळले पाहिजे. या दिवशी मांसाहार केल्यास जिवाची वृत्ती तामसिक बनू शकते.
ई. या दिवशी वातावरणात श्रीविष्णूचे १५ ते ३५ टक्के तत्त्व पृथ्वीतलावर येत असल्याने पृथ्वीवरील वातावरण विष्णुमय होते. त्याचा श्रीविष्णूच्या (श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि सत्यनारायण यांच्या) भक्तांना अधिकाधिक लाभ होतो.
साधकांनो, या दिवशी माझे तत्त्व जास्तीतजास्त येणार असल्याने तुमच्यातील तळमळ आणि भक्ती वाढवून त्याचा लाभ करून घ्या.
– श्रीकृष्ण (कु. मेघा नकाते यांच्या माध्यमातून, १०.१०.२००५, सकाळी ११.१३)
५. वाईट शक्तींचा त्रास होऊ नये; म्हणून बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन
या दिवशी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून त्याला नैवेद्य दाखवला जातो; म्हणजेच त्याच्या क्षुधा-तृष्णा शांत केल्या जातात. त्यानंतर वर्षभर बळीराजाने आपल्या काळ्या शक्तीच्या बळावर पृथ्वीवरील जिवांना त्रास न देता इतर वाईट शक्तीं (टीप २) ना शांत, म्हणजेच आपल्या ताब्यात ठेवून त्यांना दिलेल्या पाताळाच्या राज्यातच गुण्यागोविंदाने नांदावे, हा त्याच्या प्रतीमेच्या पूजेमागील पूजकाचा भाव असतो.
– सूक्ष्म (टीप १) जगतातील ‘एक विद्वान’,१८.५.२००५, सकाळी १०.५५
६. सण साजरा करण्याची पद्धत
अ. बलीचे पूजन करणे : बलीप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात.
आध्यात्मिक महत्त्व : थोर विष्णुभक्त या नात्याने बली आणि त्याची पत्नी यांचे पूजन करण्याचे विधान धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे पूजकामध्ये बलीसारखी विष्णुभक्ती निर्माण होण्यास साहाय्य मिळते. बलीला समर्पित भावाने दीपदान केल्याने त्याला अग्नीचा अंश अर्पण होऊन दैत्यराजा संतुष्ट होतो आणि दीपदान करणार्या व्यक्तीला दैत्यांच्या उपद्रवापासून अभयदान प्राप्त होते. बलीराजाला पृथ्वीच्या सृजनशीलतेचे प्रतीक असणार्या वस्त्रांचे दान केल्यामुळे दान करणार्या व्यक्तीवर बलीची कृपा होऊन त्याच्या घरात भरभराट रहाते.
आ. पत्नीने पतीला ओवाळणे : या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात.
आध्यात्मिक महत्त्व : पुरुष हे शिवाचे आणि स्त्री हे दुर्गादेवीचे प्रतीक आहे. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. त्यामुळे पत्नीमध्ये दुर्गातत्त्व कार्यान्वित होते आणि पतीचे औक्षण केल्यानंतर त्याची कुंडलिनीशक्ती जागृत होऊन त्याच्यातील सुप्तावस्थेत असणारे शिवतत्त्व प्रगट होते. अशा प्रकारे औक्षण केल्यामुळे पती-पत्नी या दोघांनाही आध्यात्मिक स्तरावर लाभ होतो.
इ. भोजन : दुपारी ब्राह्मणभोजन घालतात. या दिवशी पक्वान्नांचे भोजन करतात.
आध्यात्मिक महत्त्व : ब्राह्मणभोजन घातल्याने धर्मदेवता प्रसन्न होते. या दिवशी विशेष पक्वाने बनवल्यामुळे वातावरणात कार्यरत झालेली विष्णुतत्त्वयुक्त सात्त्विकता आणि चैतन्य यांच्या लहरी पक्वान्नांमध्ये आकृष्ट होतात.
ई. मौजमजा करणे : ‘बलीराज्यात शास्त्राने सांगितलेली निषिद्ध कर्मे सोडून आपल्या मनाला वाटेल तसे लोकांनी वागावे’, असे धर्मशास्त्र सांगते. अभक्ष्यभक्षण, अपेयपान आणि अगम्यागमन ही निषिद्ध कर्मे आहेत; म्हणून या दिवसांत माणसे दारू उडवितात (आतषबाजी करतात); पण दारू पीत नाहीत ! शास्त्राने परवानगी दिली असल्याने परंपरेने लोक या दिवसांत मौजमजा करतात.
आध्यात्मिक महत्त्व : या दिवशी असात्त्विक पेय किंवा पदार्थ यांचे सेवन करू नये आणि स्त्रीचा उपभोग घेऊ नये. जिवाने अशा प्रकारे कृती केल्यामुळे त्याचा आचार शुद्ध होऊन त्याच्या मनावर सात्त्विकतेचा संस्कार दृढ होतो. तसेच इंद्रियांवर संयम मिळवल्याने इंद्रियनिग्रह साध्य होण्यास साहाय्य होते. अशा प्रकारे सात्त्विक कर्म केल्यामुळे जिवामध्ये सुप्त असणारी सात्त्विक वृत्ती जागृत होते. सत्त्वगुणाला अनुसरून मौजमजा करून सात्त्विक सुखाची प्राप्ती करण्यास काहीच हरकत नाही, असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.
उ. गोवर्धनपूजा : या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.
आध्यात्मिक महत्त्व : गोवर्धन पर्वतामध्ये श्रीकृष्णाचा अंश आहे. त्याच्यामध्ये ४ टक्के कृष्णतत्त्व असून श्रीकृष्णाची १० टक्के तारक आणि १० टक्के मारक शक्ती कार्यरत आहे. गोवर्धनपूजनाने एक प्रकारे गोपाळांचा प्रतिपाळ करणार्या गोवर्धनरूपी भगवान श्रीकृष्णाचेच पूजन केले जाते. त्यामुळे पूजकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गोवर्धन पूजनामुळे सद्गुणांचे संवर्धन होते.
७. भावार्थ
अ. ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा करत देवत्वाला पोहोचलेल्या बलीची आठवण करावी !
‘बलीप्रतिपदेला बळीची पूजा करतात. बळीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा केली. तो सात्त्विक वृत्तीचा आणि दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यांमुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो, हे या उदाहरणावरून दिसून येते. अशा निर्भयतेने सत्यकर्माचे पालन केल्यावर त्याला मृत्यूभयच रहात नाही. यमसुद्धा त्याचा मित्र व बंधू होतो. या दिवशी भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की, भगवंत हा सर्वस्व अर्पण करणार्याचा दाससुद्धा होण्याची तयारी ठेवतो. बली वास्तविक असुर घराण्यातील असूनसुद्धा त्याच्या उदार तत्त्वामुळे अन् त्याने भगवंताला शरण जाऊन आपले सर्वस्व अर्पण केल्यामुळे भगवंताने त्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्या जीवनाला कलाटणी दिली आणि त्याचा उद्धार केला. त्याच्या राज्यात असलेले असुरवृत्तीला पोषक असे भोगमय विचार घालवून, त्या ठिकाणी त्यागाची भावना रुजवून, जनतेला दैवीविचार देऊन सुख आणि समृद्धी यांचे जीवन प्रदान केले.’
– प.पू. परशराम माधव पांडे महाराज, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
आ. भगवान विष्णूने बलीराजाचे कोटकल्याण करण्याच्या उद्देशाने त्याला पाताळात लोटणे
‘इंद्रपदाच्या अधिकार भोगाकरता दीन झालेल्या वडील भाऊ इंद्राला जगताचा एक तुकडा द्यावा; म्हणून बटु वामनाने (त्या पापहारक हरीने) बाह्यदृष्ट्या फसवून; पण आंतरिकदृष्ट्या बली चक्रवर्तीचे कोटीकल्याण करून दोन पावलांनी पृथ्वी आणि स्वर्गलोक व्यापून तिसर्या पावलाने बळीला पाताळात लोटले. सध्या बलि चक्रवर्ती पाताळाचा राजा असून जीवन्मुक्त स्थितीत स्वस्थ राहिला आहे. त्याचे प्रारब्ध त्याला इंद्रपद देणार आहे. त्याकरता तो जीवन्मुक्तावस्थेत शरीर धारण करून आहे. त्याने सर्व भोगांची अभिलाषा सोडल्यामुळे त्याचे मन तृप्त झाले आहे. जे कर्तव्य प्राप्त होईल ते शांत मनाने करायचे, अशी त्याची सवय असल्यामुळे तो स्वयं आनंदपूर्ण झाला आहे. बळीने ज्या मार्गाचे अनुसरण केले तोच `सत्य’ मार्ग आहे, तोच ऋत मार्ग आहे.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी, घनगर्जित, सप्टेंबर २०१०
टीप १ : स्थूल पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील, ते म्हणजे ‘सूक्ष्म’
टीप २ : मनुष्याला त्रास देणारे भुवलोक आणि पाताळ येथील अदृश्य जीव (लिंगदेह) म्हणजे वाईट शक्ती किंवा अनिष्ट शक्ती
संदर्भ : सणाविषयीची तात्त्विक माहिती सनातनचा ग्रंथ, सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र भाग १, खंड १ यातील असून सणाचे आध्यात्मिक विश्लेषण कु. मधुरा भोसले यांना सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानातील आहे.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
दिवाळीविषयीचे लघुपट पहा !
(सौजन्य : परिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारी ‘सनातन संस्था’)
#दिवाळी #diwali diwali दिवाळी #दिवाळी२०२२ #diwali2022 diwali2022 दिवाळी २०२२ #दीपावली #deepawali deepawali दीपावली #दीपावली२०२२ #deepawali2022 deepawali2022 दीपावली २०२२ #दीप #deep deep दीप #लक्ष्मीपूजन #lakshmipoojan #laxmipoojan lakshmipoojan laxmipoojan लक्ष्मीपूजन #आकाशकंदील #akashkandil akashkandil आकाशकंदील #नरकचतुर्दशी #narakchaturdashi narakchaturdashi नरकचतुर्दशी #पाडवा #padwa padwa पाडवा #भाऊबीज #bhaubeej bhaubeej भाऊबीज #भाईदूज #bhaidooj भाईदूज bhaidooj #भाईदूज२०२२ #bhaidooj2022 bhaidooj2022 भाईदूज२०२२ #भाऊबीज२०२२ #bhaubeej2022 भाऊबीज२०२२ bhaubeej2022