पुणे येथे ‘ब्रेक’ निकामी झालेली शिवशाही बस धडकून अनेक गाड्यांची हानी !
पुणे – पुण्यात पाषाण-सुस परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. पाषाण-सूस रस्त्यावर शिवशाही बसचा ‘ब्रेक’ निकामी झाल्याने ही बस चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि तिने दिलेल्या धडकेत ७-८ गाड्यांची हानी झाली आहे. या दुर्घटनेत चार ते पाच जण घायाळ झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर्व घायाळांना तातडीने जवळील रुग्णालयात नेण्यात आले आहे; पण या घटनेमुळे महामार्गावर प्रचंड खळबळ उडाली. अपघातामुळे परिसरात काही वेळ वाहतूक कोंडीसुद्धा झाली.
संबंधित शिवशाही बस बोरिवली ते सातारा असा प्रवास करत होती. ‘ब्रेक’ निकामी झालेली ही बस थेट पुढे असलेल्या दुचाकीला जोरात धडकली. बस भरधाव होती. त्यामुळे पुढची चारचाकी त्या पुढच्या चारचाकीला धडकली. अपघाताची ही मालिका एका मागे एक अशा ७-८ गाड्यांपर्यंत पोचली.
अन्य एका अपघातात पुण्यावरून मुंबईला जाणार्या कंटेनरचा खंडाळा बोरघाटात ब्रेक निकामी झाला आणि कंटेनरने पुढे जाणार्या एका कंटेनरला धडक दिल्यावरही चालकाने कंटेनरवर ताबा मिळवला; मात्र यात तो घायाळ झाला.