कठीण प्रसंगात स्थिर राहून ‘पूर्णवेळ साधना करून ईश्वराचीच चाकरी करायची’, असा निश्चय करणार्या श्रीमती धनश्री रवींद्र देशपांडे !
यजमानांच्या निधनानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या साहाय्याबद्दल श्रीमती धनश्री रवींद्र देशपांडे यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !
१. अंगणवाडीसेविकेने ‘महिला आणि बाल विकास कल्याण मंत्रालयाची मुलांसाठी अनुदान मिळवण्याची एक योजना’ असल्याचे सांगणे आणि अनुदान मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण होणे
‘यजमानांच्या निधनानंतर हळूहळू पुढील आयुष्यात संभाव्य अडचणी काय येऊ शकतात ?’, याचा मला अंदाज येऊ लागला. त्यातच एक दिवस ग्रामपंचायतीतून अंगणवाडीसेविका आमचे घर शोधत आली. तिने मला महिला आणि बाल विकास कल्याण मंत्रालयाची मुलांसाठी अनुदान मिळवण्याची एक योजना असल्याचे सांगितले. मी त्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून अर्ज पुढे पाठवला. सरकारच्या अशा प्रकारच्या योजनेबद्दल मला ठाऊक नव्हते; पण गुरुदेवांनीच (परात्पर गुरु डॉक्टरांनीच) त्या अंगणवाडीसेविकेला घरी पाठवून अनुदान मिळवण्याची प्रक्रिया पूर्ण करवून घेतली. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
२. ‘रिक्शाचालकांनी भ्रमणभाष करून प्रवासाविषयी विचारणा केल्यावर त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवलेच साहाय्याला आले होते’, याची जाणीव होऊन कृतज्ञता वाटणे
कोल्हापूर येथे असतांना श्री. दत्तात्रेय मोरे या रिक्शाचालकाने मला देवासारखे साहाय्य केले. ‘त्या काकांनी दुसर्या दिवशी सकाळी भ्रमणभाष करून मला विचारले, ‘‘प्रवास कसा झाला ? काही अडचण आली नाही ना ?’’ त्या वेळी ‘त्यांच्या रूपात श्री गुरुमाऊलीच (परात्पर गुरु डॉक्टरच) साहाय्य करायला आली होती’, असे जाणवून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
‘जीवनातील इतक्या कठीण प्रसंगातही स्थिर राहून परिस्थिती हाताळण्याचे धैर्य आणि कटू सत्याचा सामना केल्यानंतर साधनेच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेण्याची बुद्धी अन् बळ मला श्री गुरूंनी (परात्पर गुरु डॉक्टरांनी) दिले. अनंत अडचणी आल्या; पण श्री गुरु पाठीशी असल्यामुळे मला त्यावर मात करता आली. ‘या सर्व प्रसंगांत क्षणोक्षणी श्री गुरूंनी ते माझ्या समवेत आहेत’, याची मला अनुभूती दिली’, त्याबद्दल जगत्पिता श्रीविष्णुस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे.’
– श्रीमती धनश्री रवींद्र देशपांडे (१.५.२०२२)
१. यजमानांच्या निधनानंतर ‘पुढच्या दृष्टीने काय करायला हवे ?’, असा प्रश्न असतांना माझ्याकडून ‘पूर्णवेळ साधना करून ईश्वराचीच चाकरी करायची’, हा विचार दृढ होणे
‘यजमानांच्या निधनानंतर २ मुलांचे दायित्व आले. त्यामुळे हितचिंतकांनी मला ‘आता काही कामधंद्याचे पहा’, असा सल्ला दिला. तेव्हा मला ‘पुढच्या दृष्टीने काय करायला हवे ?’, असा प्रश्न होता. मुलांच्या संगोपनासाठी नोकरी किंवा उद्योग करावा लागणार हे स्पष्ट होते; पण माझ्या मनात रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्याचा विचार प्रबळ होता. एक दिवस परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मानसरित्या आळवत असतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ या दैनिक ‘सनातन प्रभात’मधील सदरातील एका लिखाणाचे स्मरण झाले. परात्पर गुरु डॉक्टरांनी त्या चौकटीत ‘तुटपुंज्या लाभासाठी कोणाची चाकरी करून पैसे मिळवण्यापेक्षा व्यावहारिक, तसेच आध्यात्मिक दृष्ट्या सर्वच देणार्या ईश्वराची चाकरी करावी !’, असे विचार मांडले होते. तेव्हा ‘पूर्णवेळ साधना करून ईश्वराचीच चाकरी करायची’, हा विचार दृढ झाला.
२. घरातील स्वतःच्या वस्तू आणि कपडे आवरतांना त्याबद्दल आसक्ती न्यून होऊन परिस्थिती स्वीकारण्याचे ठरवणे
माझी समष्टी सेवा बंद झाली असली, तरी मी व्यष्टी साधनेचे प्रयत्न चालू ठेवले होते. ‘या काळात मी अनावश्यक साहित्याची विल्हेवाट लावणे, घरातील स्वतःच्या वस्तू आणि कपडे आवरणे, यजमानांची कागदपत्रे पाहून त्यांचे वर्गीकरण करणे अन् पुढच्या दृष्टीने काही कागदपत्रे अल्प असल्यास त्यांची पूर्तता करणे’, असे प्रयत्न चालू केले. ते करतांना त्या वस्तू आणि कपडे यांबद्दलची माझी आसक्ती उणावली. हळूहळू मी घरातील प्रत्येक वस्तूची आसक्ती न्यून करण्यास आरंभ केला आणि ‘आश्रमात जाईपर्यंत वर्तमानकाळात राहून परिस्थिती स्वीकारायची’, असे मी ठरवले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनीच माझ्याकडून ही सेवा करून घेतली.
३. आश्रमात पोचेपर्यंत अनेक अडथळे येऊनही केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या श्रद्धेवर पुढील मार्गक्रमण करायचे ठरवणे
आश्रमात येण्याची अनुमती मिळाली; परंतु आश्रमात पोचेपर्यंत अनेक अडथळ्यांना तोंड द्यावे लागले. मुलगा (त्या वेळी मुलाचे वय १० वर्षे होते.) (श्रीनिवास देशपांडे, आताचे वय १२ वर्षे – आध्यात्मिक पातळी ६२ टक्के,) आजारी पडणे, रेल्वे आरक्षण करतांना आणि नंतर बसने प्रवास करण्यात अडचणी आल्या. ‘केवळ श्री गुरूंच्या (परात्पर गुरु डॉक्टरांच्या) श्रद्धेवर पुढील मार्गक्रमण करायचे आणि जे होईल ते स्वीकारायचे’, असे मी ठरवले. ‘कुठलेच वाहतूक पर्याय मिळाले नाहीत, तर श्री गुरूंची क्षमा मागून घरी परतायचे; पण प्रथम घरातून बाहेर पडूया’, असा निश्चय करून मी अंतिम टप्प्यातील सिद्धता करू लागले.
४. कोल्हापूरला आल्यावर तिथून गोव्याला जाण्यात अनेक अडथळे येऊनही रिक्शाचालकाच्या साहाय्याने कोल्हापूर ते गोवा खाजगी बसचे आरक्षण मिळणे आणि गोव्याला पोचणे
अनेक अडथळ्यांतील एक अडथळा गुरुकृपेने दूर झाला होता. तेव्हा ‘आश्रमात जाण्याचा माझा निर्णय योग्य आहे’, याची मला जाणीव झाली. गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुमाऊली, काहीही करून रामनाथी आश्रमात पोचायचे आहे. आता काय करायचे ?’, हे तुम्हीच मला सांगा.’ नंतर रिक्शाचालकाच्या साहाय्याने कोल्हापूर ते गोवा खाजगी बसचे आरक्षण मिळाले आणि आम्ही गोव्याला पोचलो. रिक्शाचालकाच्या माध्यमातून देवानेच आम्हाला पुढील प्रवासासाठी साहाय्य केले.
या सर्व प्रसंगांमध्ये यवतमाळच्या साधिका, सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांनी मला वेळोवेळी आध्यात्मिक अन् मानसिक स्तरावर अमूल्य मार्गदर्शन करून साहाय्य केले. त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !
– श्रीमती धनश्री रवींद्र देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.५.२०२२)