‘अखिल भाविक वारकरी मंडळ’ अल्पावधीत लोकप्रिय ! – विजयकुमार देशमुख, आमदार, भाजप
सोलापूर – ‘अखिल भाविक वारकरी मंडळ’ अल्पावधीत लोकप्रिय झाले आहे. आता लवकरच वारकरी भवन सोलापूर शहरात होईल, असे प्रतिपादन भाजप आमदार श्री. विजयकुमार देशमुख यांनी केले. अखिल भाविक वारकरी मंडळाच्या द्वितीय वर्धापनदिन १६ ऑक्टोबरला निर्मल कुमार फडकुले सभागृह ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्या प्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यात धाराशिव, सांगली, परभणी, सोलापूर येथील अध्यक्षांनी संघटनेसंबंधी विचार व्यक्त केले.
प्रारंभी राष्ट्रीय उपाध्यक्ष ह.भ.प. भागवत महाराज चवरे, भाजप खासदार श्री. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, भाजप आमदार श्री. विजयकुमार देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष श्री. भास्कर भांगे (प्रदेश उपाध्यक्ष) याप्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
या प्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे यांनी वारकरी मंडळ स्थापन करण्याचा उद्देश सांगून संघटनेची ध्येय आणि धोरणे सांगितली. यापुढील काळात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वारकरी मेळावा घेण्यात येणार आहे, असेही त्यांनी या प्रसंगी सांगितले. या मेळाव्यात वारकरी संप्रदायाची निष्काम सेवा आणि विशेष योगदान देणारे श्री. ज्ञानेश्वर अवताडे आणि श्री. शंकर भोसले यांचा सन्मान करण्यात आला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीप्रमुख श्री. किरण श्रीचिप्पा आणि संत तुकाराम महाराज पालखी श्री. श्रीकांत ढगे यांचाही सत्कार करण्यात आला. या मेळाव्यासाठी बहुसंख्य महिला-पुरुष भाविक, वारकरी आणि पदाधिकारी उपस्थित होते.