वार्तांकनाच्या माध्यमातून मनशुद्धी करून स्वतःला घडवा ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिदा सिंगबाळ
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘वार्ताहर प्रशिक्षण शिबीर’ !
रामनाथी (गोवा) – वार्ताहर साधकाने सेवेच्या माध्यमातून स्वतःला घडवून अन्यही वार्ताहरांना घडवणे हीच खरी साधना आहे. बातम्या पाठवतांना त्या परिपूर्ण पाठवायला हव्या. ‘मला हे जमेल का ?’, ‘मला किती सेवा आहेत ?’, अशा विचारांत न अडकता सर्वांनी मनशुद्धी करण्याचे व्रत घ्या ! साधनेच्या प्रयत्नांद्वारे मनशुद्धी झाली की, मन शांत आणि स्थिर होत जाते. मनात देवाचे विचार येतात आणि आध्यात्मिक स्थैर्य येते, असे मार्गदर्शन श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी केले. सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ११ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ‘वार्ताहर प्रशिक्षण शिबिरा’च्या समारोप सत्रात शिबिरार्थींना मार्गदर्शन करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ बोलत होत्या.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ पुढे म्हणाल्या, ‘‘सध्या कठीण काळ असला, तरी साधनेतील प्रगतीसाठी हा समृद्धी काळ आहे. आपल्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे मोक्षगुरु लाभले आहेत. त्यामुळे साधना वाढवून प्रत्येक क्षण देवासाठी समर्पित करणे, हीच देवाच्या या कृपेप्रती कृतज्ञता आहे !’’
या ‘वार्ताहर प्रशिक्षण शिबिरा’त ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले ‘सनातन प्रभात’चे समूह संपादक श्री. नागेश गाडे, ‘सनातन अध्ययन केंद्रा’चे श्री. संदीप शिंदे, ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधिका सौ. समीक्षा नागेश गाडे, श्री. प्रशांत कोयंडे, कु. सायली डिंगरे, श्री. विक्रम डोंगरे, ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. प्रीतम नाचणकर आणि श्री. अजय केळकर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिराचे सूत्रसंचालन श्रीमती वर्षा कुलकर्णी यांनी केले.