सप्तर्षींच्या आज्ञेनुसार श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी वाई (जिल्हा सातारा) येथील ‘महागणपती’चे दर्शन घेतल्यावर तेथे मिळालेला कौल आणि ‘महागणपती’चा आशीर्वाद !
अष्टविनायकांना प्रार्थना !स्वस्ति श्रीगणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चोझरे अर्थ : गणांचा स्वामी असलेल्या श्री गजाननाचे, तसेच मोरगावचा मोरेश्वर, सिद्धटेक येथील (सर्व सिद्धी देणारा) सिद्धेश्वर यांचे जो स्मरण करतो, त्याचे कल्याण होवो. पाली येथे ‘बल्लाळेश्वर’ या नावाने रहाणारा, महाड येथील वरदविनायक, थेऊर येथील चिंतामणी, लेण्याद्रिचा गिरिजात्मज, उत्तम वर देणारा ओझरचा विघ्नेश्वर, रांजणगावचा महागणपति सर्वांवर सदैव कृपा करो ! |
‘सप्तर्षी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वर्ष २०२२ च्या विजयादशमीनंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी महाराष्ट्रातील अष्टविनायक (मोरगाव येथील मयुरेश्वर, थेऊर येथील चिंतामणी, सिद्धटेक येथील सिद्धिविनायक, रांजणगाव येथील महागणपति, ओझर येथील विघ्नेश्वर, लेण्याद्री येथील गिरिजात्मज, महाड येथील वरदविनायक आणि पाली येथील बल्लाळेश्वर) यांचे दर्शन घ्यावे. या दौर्याच्या वेळी गणपतीशी संबंधित अन्य काही प्रमुख गणपति मंदिरांतही जाऊन मूर्तीचे दर्शन घ्यावे आणि ‘साधकांची प्राणशक्ती वाढावी, तसेच हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, यासाठी गणपतीला प्रार्थना करावी.’
सप्तर्षींनी सांगितल्याप्रमाणे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी १०.१०.२०२२ पासून महाराष्ट्रातील गणपति मंदिरांत दर्शनाला जाण्यास आरंभ केला आहे. या दौर्यात पहिल्यांदा त्यांनी सातारा जिल्ह्यातील वाई येथील महागणपतीचे दर्शन घेतले.
१. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी गणपतीला प्रार्थना आणि नारळ अर्पण केल्यावर मिळालेले कौल
अ. श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी गणपतीला प्रार्थना केल्यावर त्याच्या चरणांवर वाहिलेले फूल खाली पडले.
आ. थोड्या वेळानंतर गणपतीला नारळ अर्पण केल्यावर गणपतीच्या डोक्यावरचे फूल खाली पडले.
२. महागणपतीची पूजा करणार्या सेविकेच्या माध्यमातून महागणपतीने दिलेला आशीर्वाद आणि आदेश !
६९ वर्षांपासून या महागणपतीची पूजा करणार्या तेथील सेविका (शैलाताई) म्हणाल्या, ‘‘आजच्यासारखा कौल मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. गणपतीने सांगितले आहे, ‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य सिद्धीला जाईल !’ त्या पुढे म्हणाल्या, ‘गणपति मला सांगत आहे की, मी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांना गणपतीचे नारळ द्यावेत आणि त्यांनी (श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी) ते सर्व नारळ अष्टविनायकांना द्यावेत.’’
त्याच वेळी श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या मनातही आले की, ‘हे नारळ अष्टविनायकांना अर्पण करूया.’
– श्री. विनायक शानभाग (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के), पुणे, महाराष्ट्र. (१०.१०.२०२२)
वाई (‘दक्षिण काशी’) येथील महागणपतीचे पुरातन मंदिर !
वाई (जिल्हा सातारा) हे गाव कृष्णा नदीच्या काठावर वसलेले एक धार्मिक क्षेत्र आहे. काही जण वाईला ‘दक्षिण काशी’ असे मानतात. वाई येथील कृष्णा नदीच्या तिरावर असलेले ढोल्या गणपतीचे मंदिर हे सर्व गणेशभक्तांचे आवडते स्थान आहे. प्रतिदिन सहस्रो गणेशभक्त या मंदिराला भेट देतात. वाईकरांसाठी हा एक आध्यात्मिक ठेवा आहे.
हे मंदिर पुरातन असून वर्ष १७६२ मध्ये सरदार रास्ते यांनी या मंदिराची उभारणी केली. हे मंदिर सुंदर असून त्याचा कळस रेखीव आहे. येथील महागणपतीची मूर्ती एकाच दगडातून सलगपणे घडवलेली असून पहाताक्षणी तिची भव्यता जाणवते. गणपतीच्या भव्य आणि विशाल मूर्तीमुळे या गणपतीला ‘महागणपति’ किंवा ‘ढोल्या गणपति’ असे संबोधले जाते. प्रसन्न मुद्रेतील या गणपतीच्या मूर्तीला यज्ञोपवितासह मोजके अलंकार घातले आहेत. महागणपतीच्या मंदिराचा कळस वाई येथील सर्व मंदिरांत सर्वांत उंच आहे.
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वाई (जिल्हा सातारा) येथील महागणपतीचे दर्शन घेणे’ या घटनेचे सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी वाई (जिल्हा सातारा) येथील महागणपतीचे दर्शन घेणे’ या घटनेचे सनातनचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्ते साधक
‘श्री. विनायक शानभाग यांनी वाई येथील श्री गणेशमूर्तीचे, तसेच श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ महागणपतीचे दर्शन घेत असतांनाची छायाचित्रे मला पाठवली. ती पाहून मी केलेले सूक्ष्म-परीक्षण पुढे दिले आहे.
१. श्री गणपतीच्या चित्राकडे पाहिल्यावर मला सूक्ष्मातून ‘गँ गँ’ असा नामजप ऐकू आला.
२. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी इच्छाशक्तीची आवश्यकता असल्याने श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्रार्थना केल्यावर गणपतीच्या चरणांवर वाहिलेले पुष्प खाली पडले.
३. हिंदु राष्ट्र टिकून रहाण्यासाठी ज्ञानशक्तीची आवश्यकता असल्याने श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी नारळ अर्पण केल्यावर गणपतीच्या सहस्रारातून (डोक्यावरील) फूल खाली पडले.
४. गणपतीच्या चरणांवर वाहिलेले आणि तेथून खाली पडलेले फूल हे सगुण शक्ती मिळाल्याचे, तर सहस्रारातून (डोक्यावरील) पडलेले फूल हे निर्गुण शक्ती मिळाल्याचे प्रतीक आहे. थोडक्यात श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यामुळे श्री गणपतीने सगुण आणि निर्गुण अशी दोन्ही प्रकारची शक्ती प्रदान केली आहे.’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.१०.२०२२)
|