वृत्तांकनातील अतिशयोक्ती टाळा !
हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक किंवा निर्माते, तसेच त्यांचे कुटुंबीय किंवा अन्य कलाकार यांचे निधन होते, तेव्हा सामाजिक संकेतस्थळांवर त्याविषयीची वृत्ते प्रसिद्ध होतात. कुणाचेही निधन झाल्यावर त्याविषयीचे वृत्त देणे आवश्यकच आहे. ती घटना दुःखद किंवा क्लेशदायकच असते; परंतु ते देतांना त्याची पद्धत अत्यंत अयोग्य आणि गोपनीयरित्या मांडली जाते. यातून वाचकांचा गोंधळ होतो, असे लक्षात येते. त्याची उदाहरणे पाहूया.
एका कलाकाराच्या नातेवाईकाचे निधन झाले होते. त्या वेळी बातमीचा मथळा ‘बॉलीवूडला बसला हादरा’, असा होता. यामध्ये अभिनेत्याचे निधन झालेली व्यक्ती होती दुसरीच आणि त्या बातमीच्या मुख्य मथळ्यात एखाद्या सुप्रसिद्ध, वलयांकित व्यक्तीचे छायाचित्र होते. ते पाहून कुणीही ते वृत्त वाचणारच ! परंतु वाचकाला बातमी वाचून संपल्यावरच नेमका कुणाचा मृत्यू झाला, हे समजते. यामुळे त्याचा गोंधळ होतो, तसेच समाजाची एक प्रकारे दिशाभूल केली जात आहे, हे माध्यमांच्या लक्षातच येत नाही, असे वाटते. यातून माध्यमांमध्ये संवेदनशीलता शिल्लक आहे कि नाही ? असे कुणाला वाटल्यास चुकीचे ते काय ? केवळ पैसा आणि प्रसिद्धी या दोन सूत्रांच्या दृष्टीनेच त्यांच्याकडून विचार होतो कि काय ? असा प्रश्न पडतो. एवढेच नव्हे, तर त्यात वापरली जाणारी भाषा ही अतिशय अयोग्य पद्धतीची असते. अशा वृत्तांच्या मथळ्यात ‘चित्रपटसृष्टीवर पसरली शोककळा’, ‘…अमुक अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर’, ‘संपूर्ण बॉलीवूडवर दुःखाचे सावट’ अशा स्वरूपाचा उल्लेख केलेला असतो.
कोणताही मनुष्य जन्माला आला, म्हणजे एक ना एक दिवस तो जाणारच, हे विधीलिखित आहे; पण चित्रपटसृष्टीतील लोकांच्या संदर्भात अशा वृत्तांचा पुष्कळ गवगवा केला जातो. माध्यमांनी अशी वृत्ते देतांना समाजभान आणि सामान्यज्ञान (कॉमन सेन्स) बाळगणे आवश्यक आहे. आपले दायित्व काय आहे ? आणि आपण लोकांना काय सांगत आहोत ? याचा विचार करायला हवा. मथळ्यांमधील अतिशयोक्ती किंवा अतीरंजितपणा टाळणे आवश्यक आहे. मथळा, वृत्त आणि छायाचित्र हे सर्व एकच असायला हवे, हेही माध्यमे अन् सामाजिक संकेतस्थळे यांवर वृत्ते देणार्यांना समजू नये, हे आश्चर्यजनक आहे.
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.