‘नार्काेटिक’ युद्ध !
पाकिस्तानमधील एक अमली पदार्थ माफिया श्रीलंकेतील ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम’ (एल्.टी.टी.ई.) या आतंकवादी संघटनेला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे नुकतेच उघडकीस आले. भारतीय सुरक्षा यंत्रणा या माफियावर लक्ष ठेवून होत्या. त्यामुळे हे मोठे कारस्थान उघड झाले. भारतात मोठ्या प्रमाणात हेरॉईनच्या तस्करीच्या माध्यमातून ‘एल्.टी.टी.ई.’ला पुनरुज्जीवित करण्यासाठी निधी उभारला जात आहे. पारंपरिक युद्धात भारताला हरवणे शक्य नाही, हे पाकिस्तानला चांगले ज्ञात आहे. त्यामुळे अन्य माध्यमांतून तो भारताला पोखरण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहे.
उडता पंजाब ही स्थिती आय.एस्.आय.मुळेच !
भारतातील पंजाब हे राज्य पाकिस्तानच्या सीमेला टेकून आहे. या राज्यात अनेक वेळा पाकिस्तानी आतंकवाद्यांनी घुसखोरी केलेली आहे. त्याचप्रमाणे या भागात अमली पदार्थांचा पुरवठाही पाकिस्तानी हस्तक किंवा अमली पदार्थ माफिया यांच्या माध्यमातून केला जातो. याच्या परिणामस्वरूप पंजाबमधील अनेक युवक अमली पदार्थांच्या व्यसनाला बळी पडले आहेत. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय. भारताच्या विरोधात अनेक कारस्थाने रचत असते. ‘भारतीय युवकांना अमली पदार्थांचे व्यसन लावणे’, हा त्याच कारस्थानाचा एक भाग आहे. पंजाबमधील शीख समाज हा लढवय्या समाज म्हणून ओळखला जातो. भारतीय सैन्यातही या समाजाची एक वेगळी तुकडी असते. या लढवय्या समाजातील एक पिढी अमली पदार्थांमुळे नष्ट झाली, तर त्याचा परिणाम भारतीय सैन्यावरही होणार, हे जाणून आय.एस्.आय.ने शीख युवकांना लक्ष्य केले. सीमावर्ती भागात अजूनही पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे अमली पदार्थ आणि शस्त्रे भारतीय हद्दीत टाकली जातात. २-३ दिवसांपूर्वी पंजाब लगतच्या पाकच्या सीमेवरील रमदास येथे पाकचे एक ड्रोन सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी ते परत पाकिस्तानात जात असतांना पाडले. या ड्रोनद्वारे पाकने अमली पदार्थ भारतात पाठवल्याचा संशय आहे.
एल्.टी.टी.ई.तील असंतुष्टांना खतपाणी !
एल्.टी.टी.ई. ही संघटना मुख्यतः श्रीलंकेतील तमिळ समाजाच्या हितरक्षणासाठी आतंकवादी मार्गाने लढत होती. या संघटनेला भारताचा कधीही पाठिंबा नव्हता. त्यामुळे या संघटनेला भारताविषयीही कटुता होती. ही संघटना आता अस्तित्वात नाही; परंतु त्या संघटनेशी संबंधित असंतुष्ट कार्यकर्ते अजूनही आहेत. या असंतुष्टांचा लाभ उठवून पाकिस्तान त्यांच्याद्वारे भारतात अमली पदार्थ पाठवत आहे. नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरोने केरळच्या किनार्यावर नुकतेच जे २०० किलो हेरॉईन जप्त केले, ते पाकिस्तानमधील हाजी सलीम याच्या मालकीच्या आस्थापनाशी संलग्न आहे. सलीम हा श्रीलंकेतील ड्रग माफिया सी गुणसेकरन् आणि पुकुट्टी कन्ना यांच्यासमवेत अवैध शस्त्रे अन् अमली पदार्थ भारतात पाठवत होता, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला आढळून आले होते. यावरून यातील पाकिस्तानचा सहभाग स्पष्ट होतो.
ही सामाजिक नव्हे, तर राष्ट्रीय समस्या !
गोव्यात अमली पदार्थ व्यवहार हा पर्यटन व्यवसायामुळे आहे, असे आतापर्यंत वाटत होते. काही वर्षांपूर्वी विदेशी पर्यटक आणि विशेषतः नायजेरियाचे नागरिक यांच्यापाशी हे अमली पदार्थ आढळून येत असत, तसेच समुद्रकिनारपट्टी क्षेत्रात अमली पदार्थ व्यावसायिकांना पकडले जात असे. अमली पदार्थांचे हे लोण आता गोव्यातील ग्रामीण भागापर्यंत आणि शाळा-महाविद्यालयापर्यंत पोचले आहे. गोव्यातील स्थानिक युवकही आता या व्यवहारात आढळतात. एवढेच नाही, तर हरियाणातील भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येनंतर गोव्यात चालणार्या या व्यवहाराचे व्यापक स्वरूप उघड झाले. गोव्यातून तेलंगाणा राज्यात अमली पदार्थ पुरवले जात असल्याचे उघड झाले आणि या प्रकरणी गोव्याच्या मध्यवर्ती असलेल्या फोंडा भागातील स्थानिक युवकाला कह्यात घेण्यात आले. अमली पदार्थ व्यावसायिकांकडून लाच घेतल्यावरून गोव्यात २ पोलिसांना काही दिवसांपूर्वी निलंबित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंह बिश्नॉय म्हणाले, ‘‘भारताची दोन्ही शेजारील राष्ट्रे (चीन आणि पाकिस्तान) भारतात अमली पदार्थ पाठवून येथील युवावर्ग नष्ट करत आहेत. काही पोलिसांच्या सहभागामुळे अमली पदार्थविरोधी मोहिमेला खीळ बसली आहे.’’ नेमका या भ्रष्ट यंत्रणेचाच तर शत्रूराष्ट्रांना लाभ होत आहे.
काही ग्रॅम वजनाच्या अमली पदार्थांची किंमत बाजारात लाखो रुपये असते. त्यामुळे हा व्यवहार करणार्यांना त्यांच्या कमाईतील काही भाग पोलीस, तपासणी नाक्यावरील यंत्रणा यांना देण्यात काहीच अडचण येत नाही. अमली पदार्थ व्यवहारात कोणतेही कष्ट न घेता वारेमाप पैसा कमावता येतो. त्यामुळे बेरोजगार, कष्ट करण्याची प्रवृत्ती नसलेले, झटपट पैसा कमावू इच्छिणारे युवक या व्यवहारात अडकतात.
वरवर पहायला गेल्यास ही सामाजिक समस्या असल्याचे वाटते. त्यामुळे सत्ताधारी राज्यकर्तेही अमली पदार्थ समस्येकडे तेवढे गांभीर्याने पहात असल्याचे आढळत नाही. शत्रूराष्ट्र आखत असलेल्या कूट रणनीतीकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष करू नये. अमली पदार्थ व्यवहारातील कायदेही शिथिल आहेत. त्यामुळे या व्यवहारातील गुन्हेगारांना सहज जामीन मिळतो आणि ते पुन्हा तोच व्यवहार करतात. त्यामुळे राज्यकर्त्यांनी संबंधित कायदेही कठोर करणे आवश्यक बनले आहे. थोडक्यात ही सामाजिक समस्या नसून राष्ट्रीय समस्या असल्याने त्याविषयी राष्ट्रीय स्तरावरच कठोर धोरण अवलंबणे आवश्यक बनले आहे !
अमली पदार्थ ही राष्ट्रीय समस्या असल्याने त्याविषयी राष्ट्रीय स्तरावरच कठोर धोरण अवलंबणे आवश्यक ! |