कोल्हापूर येथील हिंदूसंघटन मेळाव्यात संघटितपणे धर्मकार्य करण्याचा उपस्थित हिंदूंचा निर्धार !
कोल्हापूर – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ११ ऑक्टोबर या दिवशी कोल्हापूर येथील इंद्रप्रस्थ सांस्कृतिक भवन, राजारामपुरी या ठिकाणी हिंदूसंघटन मेळावा पार पडला. यात उपस्थित हिंदूंनी संघटिपणे धर्मकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या मेळाव्यात हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात राज्य आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी उपस्थितांना संबोधित केले.
या मेळाव्याच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाऊस येऊनही २५० धर्मप्रेमी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील समितीच्या कार्याचा आढावा जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी, तर श्री. आदित्य शास्त्री यांनी समितीच्या कार्याची यशोगाथा उपस्थितांसमोर मांडली. या वेळी धर्मप्रेमींनी धर्मावरील आघात रोखण्यासाठी केलेले समष्टी प्रयत्न आणि अनुभवकथन केले.
मेळाव्यात श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते कृतीशील धर्माभिमानी म्हणून श्री. नितीन काकडे, श्री. रामभाऊ मेथे, तर शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव यांचा धर्मकार्यातील सहभागाविषयी सत्कार करण्यात आला.
धर्मावरील आघात रोखण्यासाठी धर्मप्रेमींनी केलेले समष्टी प्रयत्न आणि अनुभवकथन
१. श्री. नितीन काकडे, हिंदुत्वनिष्ठ, हुपरी – हुपरी येथे धर्मांधांनी केलेल्या अवैध बांधकामाच्या विरोधात लढा देत आहे. या संदर्भात कार्य करतांना अनेक अडचणी आल्या, धर्मांधांनी आमच्यावर खटले नोंद केले; मात्र आम्ही डगमगलो नाही. हिंदु जनजागृती समितीच्या मार्गदर्शनानुसार कार्य केल्याने नेमकी दिशा मिळाली आणि आता आजूबाजूच्या ५ गावांमध्येही कार्य चालू आहे.
२. श्री. शिवाजी शिगांरे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, तळंदगे – गावात धर्मशिक्षणवर्ग चालू असून त्याला चांगला प्रतिसाद आहे. श्री गणेशोत्सव कालावधीत शास्त्रानुसार मूर्तीदान न होता श्री गणेशमूर्तीचे विसर्जन व्हावे, यांसाठी सरपंचांना निवेदन दिले, तसेच या संदर्भात गावात प्रबोधन केले. यामुळे गावातील भाविकांनी मूर्तीचे विसर्जन केले.
३. श्री. रामभाऊ मेथे, केर्ले – पन्हाळा तालुक्यातील पोर्ले येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारासाठी गेलो असता त्या गावातील धर्मप्रेमींकडून ‘गावात गुढीपाडवा साजरा केला जात नाही’, असे कळाले. अन्य एका समितीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने त्या गावातील ग्रामस्थांना गुढीपाडवा साजरा करण्यामागील धर्मशास्त्र समजावून सांगितले. आम्ही प्रबोधन करण्याच्या अगोदर गावात त्याविषयी अपसमज होता, तो दूर झाला. यानंतर हा विषय ग्रामपंचायतीमध्ये सांगितला. याचा सकारात्मक परिणाम दिसून ८० टक्के लोकांनी शास्त्रानुसार गुढीपाडवा साजरा केला.
४. श्री. रवींद्र खोचीकर, भुयेवाडी – एका गावामध्ये ‘पतीचे निधन झाल्यावर पत्नीने मंगळसूत्र घालावे’, असे प्रस्ताव संमत करण्याचे ठरवले होते. आम्ही ग्रामसभा बोलावून नागरिकांना धर्मशास्त्र सांगून याला विरोध केला. त्यामुळे हा प्रस्ताव फेटाळला गेला.
‘समितीच्या माध्यमातून व्यष्टी स्तरावर काय पालट झाले ?’, याविषयी सौ. अनिता लोहार, श्री. दयानंद पाटील आणि श्री. पवन कवठे यांनी मनोगत व्यक्त केले.