आम्हाला ब्रिटनमध्ये भीती वाटत आहे !

ब्रिटनमधील १८० हून अधिक भारतीय आणि हिंदु संघटनांचे पंतप्रधान लिझ ट्रस यांना पत्र !

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस (उजवीकडे)

लंडन :  ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांना तेथील १८० हून हिंदु संघटनांनी पत्र लिहिले आहे. यात त्यांनी ‘ब्रिटनमध्ये आम्हाला भीती वाटत आहे’, असे लिहिले आहे. ब्रिटनच्या लिसेस्टर आणि बर्मिंगहॅम येथे हिंदूंवर मुसलमानांकडून काही आठवड्यांपूर्वी झालेल्या आक्रमणाचा उल्लेख केला आहे. यात येथील भारतीय आणि हिंदु संघटनांच्या सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संघटनांनी एकूण ६ आवाहने केली आहेत. या पत्रावर विविध संघटना, हिंदु मंदिर राष्ट्रीय परिषद, श्री स्वामीनारायण संस्था यूके, इंडियन नॅशनल स्टुडंट्स असोसिएशन यूके, इस्कॉन मँचेस्टर, ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ ब्रिटन, बीजेपी (यूके), हिंदु लॉयर्स असोसिएशन (यूके) आदींच्या  स्वाक्षर्‍या आहेत.

या पत्रात म्हटले आहे की, हिंदु समाजाने जवळपास ५० वर्षांपासून ब्रिटनला आपले घर बनवले आहे. ब्रिटनच्या लोकसंख्येमध्ये आम्ही २ टक्क्यांहून अल्प आहोत, तरीही आमचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. आम्ही केवळ सामाजिक आणि आर्थिक योगदान देत नाही, तर ब्रिटीश मूल्यांचे मनापासून पालन करत आहेत. भारतीय येथील कायदे पूर्णपणे पाळतात. असे असूनही आम्हाला येथे असुरक्षित वाटते. लिसेस्टर, बर्मिंगहॅम आणि इतर शहरांतील अलीकडील घटनांकडे आम्ही तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितोे. या घटनांमुळे ब्रिटनमध्ये रहाणारे भारतीय आणि हिंदु समुदाय व्यथित झाला आहे. हिंदु समाजाप्रती द्वेष कमालीचा वाढला आहे. सामाजिक माध्यमांवर हिंदूंविरुद्ध शिवीगाळ, शारीरिक हिंसा, छळ केल्यानंतर आता त्यांना शाळा आणि कामाच्या ठिकाणीही लक्ष्य केले जात आहे. ब्रिटीश पंतप्रधानांना परिस्थिती पहाता योग्य तो निर्णय घ्यावा आणि ब्रिटीश भारतियांची भीती दूर करण्यासाठी ठोस पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

भारतात जेथे हिंदू अल्पसंख्य आहेत, तेथेही हीच स्थिती आहे. त्या ठिकाणच्या हिंदूंनीही आता भारताच्या पंतप्रधानांना अशा प्रकारचे पत्र लिहिल्यास आश्‍चर्य वाटू नये !