१५ दिवसांत ३०० नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार

मुंबईत नेत्रसंसर्गाची साथ !

मुंबई – मागील दोन आठवड्यांपासून शहरात नेत्रसंसर्गाचे (डोळे येणे) रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि त्रास जाणवल्यास नेत्रतज्ञांकडून सल्ला आणि औषधोपचार घ्यावेत, असे आवाहन मुंबई महापालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे. महापालिकेच्या मुरली देवरा मनपा नेत्र रुग्णालयामध्ये मागील १५ दिवसांत ३०० नेत्र संसर्गबाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत.

नेत्र संसर्गाची लक्षणे : प्रथम एका डोळ्याला आणि नंतर दुसर्‍या डोळ्याला संसर्ग होणे, डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटणे, डोळ्यांमधून सतत पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यातून चिकट द्रव पदार्थ बाहेर येणे, डोळ्यांना आतील बाजूस सूज येणे, डोळ्यांना खाज येणे, डोळे जड वाटणे, तीव्र प्रकाश सहन न होणे, ताप येणे इत्यादी. सध्या या साथीचे कारण विषाणूजन्य आहे, असे आढळून येत आहे.

डोळे आल्यास काय काळजी घ्यावी ?

१. डोळ्यांना सतत हात लावू नये. डोळे स्वच्छ पाण्याने वारंवार धुवावेत.

२. डोळे पुसण्यासाठी स्वच्छ रूमाल वापरावा.

३. अन्य सदस्यांना संसर्ग न होण्यासाठी कुटुंबापासून वेगळे/सुरक्षित अंतर राखावे.

४. घरगुती उपाय न करता वैद्यकीय तज्ञांचा/नेत्रउपचार तज्ञांचा सल्ला घेऊन उपचार आणि औषधे घ्यावीत.

५. वेळेवर उपचार घेतल्यास ६ दिवसांत डोळे बरे होतात.

६. एकदा नेत्रसंसर्ग होऊन बरे झालेल्या व्यक्तीला पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे निष्काळजीपणा करू नये.