‘ज्ञानशक्ती अभियान’ आणि अन्य उपक्रम आरंभ करण्याची बुद्धी देण्यामागील गुरुदेवांचा व्यापक दृष्टीकोन काय असेल, याविषयी झालेले चिंतन !
‘सनातनच्या ग्रंथांचे समाजात मोठ्या प्रमाणात वितरण व्हावे’, या हेतूने वर्ष २०२१ पासून ‘ज्ञानशक्ती अभियान’ राबवले जात आहे. ‘हे अभियान आरंभ करण्याची बुद्धी देण्यामागे परात्पर गुरु डॉक्टरांचा व्यापक दृष्टीकोन काय असावा ?’, याविषयी झालेले माझे चिंतन पुढे दिले आहे.
१. उद्देश – हिंदूंची खालावलेली सात्त्विकता वृद्धींगत होऊन त्यांचा हिंदु राष्ट्र्र स्थापनेच्या कार्यात सहभाग वाढावा
हिंदु राष्ट्राची स्थापना करणे, हे एक प्रचंड मोठे कार्य आहे. ते कार्य एकटी सनातन संस्था किंवा अन्य कोणतीही हिंदुत्वनिष्ठ संघटना करू शकत नाही. समस्त हिंदूंचे संघटन करूनच हे कार्य करावे लागणार आहे; पण सर्वसामान्य हिंदू निद्रिस्त असल्याने आणि ते साधना करत नसल्याने त्यांचे संघटन करणे अवघड आहे. अशा परिस्थितीत हिंदूंची खालावलेली सात्त्विकता वृद्धींगत होण्यासाठी हिंदूंच्या घराघरांत चैतन्य पोचणे आवश्यक आहे. सनातनचे ग्रंथ घराघरांत पोचले, तर निश्चितच हिंदूंच्या घरांत हे चैतन्य निर्माण होईल. त्यामुळे हे अभियान चालू केले आहे. या अभियानामुळे हिंदूंमध्ये सत्त्वगुण वाढून त्यांचा हिंदु राष्ट्र्राच्या स्थापनेतील सहभागही वाढेल.
२. ज्ञानशक्ती अभियानामुळे होणारे लाभ
अ. या ग्रंथांतील चैतन्यामुळे हे ग्रंथ विकत घेणार्या हिंदूंचे आपत्काळात काही प्रमाणात रक्षण होऊ शकेल.
आ. या अभियानात सहभागी होणार्या साधकांना ग्रंथवाचन करावे लागते. त्यामुळे त्यांची शिकण्याची वृत्ती वाढेल, तसेच साधकांना ग्रंथांतील चैतन्याचा लाभ होईल.
इ. या ग्रंथांचे वितरण करणार्या साधकांचे स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन होणार आहे.
३. आपत्काळात साधक सतत सत्सेवेत रहावेत, यासाठी परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘ज्ञानशक्ती अभियान’ आणि अन्य उपक्रम करण्याची बुद्धी दिली असणे
आपत्काळाला काही प्रमाणात आरंभ झाला असल्याने साधकांच्या मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांत वाढ होत आहे. या त्रासांमुळे त्यांच्या मनात सतत अनावश्यक आणि नकारात्मक विचार येत आहेत. विशेषतः जे साधक घरीच रहातात, त्यांच्या मनात हे विचार अधिक येतात. त्यांचे मन सतत सत्सेवेत रहावे, यासाठी ‘ज्ञानशक्ती अभियान’ आणि अन्य अनेक उपक्रम चालू करण्याची बुद्धी गुरुमाऊली साधकांना देत आहे.’
– गुरुसेवक,
(पू.) अशोक पात्रीकर, अमरावती (१७.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |