‘नाटो’च्या सैन्याशी रशियाचा संघर्ष झाल्यावर जगावर मोठी अपत्ती ओढवेल !  – पुतिन यांची चेतावणी

(‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ म्हणजे ‘उत्तर अटलांटिक करार संघटना’)

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन

मॉस्को (रशिया) – कोणत्याही परिस्थितीत रशियाच्या सैन्याशी ‘नाटो’च्या सैनिकांचा थेट संपर्क अथवा संघर्ष झाल्यास जगावर मोठी आपत्ती ओढवू शकते, अशी चेतावणी रशियाचे राष्ट्रध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी दिली आहे. कझाकिस्तानची राजधानी अस्तानामध्ये पार पडलेल्या पत्रकार परिषदेत पुतिन यांनी ही चेतावणी दिली. ‘जे लोक रशियाशी संघर्ष करण्याची भाषा करत आहेत, ते हे पाऊल न उचलण्याइतके हुशार आहेत, अशी मला आशा आहे’, असेही पुतिन यांनी पुढे म्हटले.

रशियाने युक्रेनचे ४ प्रदेश नियंत्रणात घेतल्यानंतर पुतिन यांनी त्यांच्या देशाच्या भूभागाच्या संरक्षणासाठी अण्वस्त्रांचा वापर करण्याची चेतावणी गेल्या मासात दिली होती. पुतिन यांच्या या भूमिकेचा संयुक्त राष्ट्रांनी निषेध नोंदवला होता.

रशियाच्या दायित्वशून्यतेमुळे जगातील शांतता आणि सुरक्षा धोक्यात ! – ‘जी-७’ देश

रशियाच्या दायित्वशून्य भूमिकेमुळे जगातील शांतता आणि सुरक्षितता धोक्यात आली आहे. रशियाने युक्रेनवर अण्वस्त्रांचा वापर केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असे ‘जी-७’ देशांनी एका निवेदनात म्हटले आहे. ‘जी-७’ देशांमध्ये इंग्लंड, जर्मनी, इटली, कॅनडा, अमेरिका, फ्रान्स आणि जपान यांचा समावेश आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे की, जगात शीतयुद्धानंतर प्रथमच अणूयुद्धाचा धोका निर्माण झाला असून पुतिन यांचे अण्वस्त्रांविषयीचे वक्तव्य मस्करीत घेऊ नये. वर्ष १९६२ मध्ये झालेल्या क्युबाच्या क्षेपणास्त्रांच्या आक्रमणानंतर पहिल्यांदाच महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.