चिनी चित्रपट आणि औषधांची निर्मिती करणार्या आस्थापनांची लूटमार !
चीनमध्ये ‘वो बू शी याओ शेन’ (‘डाइंग टु सर्व्हाईव्ह’ – जगण्यासाठी मरणे) या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. व्यवस्थेला प्रश्न विचारणारा हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होऊ शकला, हाही एक चमत्कारच ! औषधनिर्मिती करणारी धनदांडगी बहुराष्ट्रीय आस्थापने, त्यांच्या मक्तेदारीतून निर्माण झालेली झोटिंगशाही वृत्ती, प्रचंड नफा कमावण्यासाठी ही आस्थापने अवलंबित असलेले अयोग्य मार्ग आणि या सगळ्यात भरडले जाणारे सर्वसामान्य रुग्ण यांवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या प्रश्नांचा सर्वांगीण ऊहापोह करणारा लेख…
१. चीनमधील प्रचंड महाग असणार्या औषधांच्या मूल्यांवर बोट ठेवणारा चिनी चित्रपट आणि त्याला मिळालेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद !
५ जुलै २०१८. गुरुवारची संध्याकाळ. चीनमधील बीजिंग शहरात चित्रपटगृहाबाहेर प्रेक्षकांची प्रचंड रांग लागली होती. ‘वो बू शी याओ शेन’ हा चित्रपट पहाण्यासाठी. गुरुवार म्हणजे कामाचा दिवस. त्यात संध्याकाळची वेळ. तरीही लोक वेळात वेळ काढून या चित्रपटासाठी रांगा लावून होते. नुकत्याच झालेल्या शांघाय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट गाजला होता. २ घंटे जागेवर खिळवून ठेवून चित्रपट संपला, तेव्हा प्रेक्षक उठून उभे राहिले आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांनी या चित्रपटाला मानवंदना दिली. चित्रपट संपतांना प्रेक्षकांच्या डोक्यात अनेक प्रश्न ठेवून गेला होता. या चित्रपटाने येथील व्यवस्थेला प्रश्न विचारले होते. म्हणजे अर्थात्च चीन सरकारला प्रश्न विचारले होते. तरीदेखील चित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या (सेन्सॉरच्या) कचाट्यातून सुटून हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला होता. चीनसारख्या देशात हे घडणे आश्चर्यकारकच होते. असे आहे तरी काय या चित्रपटात ?
हा चित्रपट चीनमध्ये इतका का प्रसिद्ध झाला ? याचे कारण आहे, सर्वसामान्य चिनी माणसाच्या प्रतिदिनच्या जगण्याशी अत्यंत जवळून संबंध असलेला या चित्रपटाचा विषय म्हणजे औषधांच्या प्रचंड किमती ! इतर प्रगतीशील देशांच्या मानाने चीनमध्ये औषधे प्रचंड महाग आहेत. प्रगत युरोप आणि अमेरिका आरोग्य सुविधांवर जो काही खर्च करतात त्यातला साधारण १० – १२ टक्के खर्च औषधांवर होतो; परंतु चीनसारख्या देशाचा यावरचा खर्च किती असावा ? तर आरोग्य सुविधांवरील एकूण खर्चाच्या तब्बल ४० टक्के ! चीनमधील सार्वजनिक रुग्णालये रुग्णांना मोठ्या प्रमाणात नामांकित औषधांची निर्मिती करणार्या आस्थापनांची औषधे लिहून देतात आणि त्यातून प्रचंड माया जमवतात. इतर प्रगतीशील देशांच्या मानाने ही औषधे चीनमध्ये प्रचंड महाग आहेत. ‘हेल्थ ॲक्शन इंटरनॅशनल’ नावाची एक डच स्वयंसेवी संस्था आहे. या संस्थेने जगभरातल्या औषधांच्या मूल्यांविषयी एक सर्वेक्षण केले. त्यात असे आढळले की, एखाद्या औषधाचे जे आंतरराष्ट्रीय संदर्भ मूल्य असते, त्यापेक्षा चीनमध्ये औषधे सर्वसाधारणपणे ११ पट महाग आहेत आणि भारतात मात्र या औषधांचे मूल्य आंतरराष्ट्रीय संदर्भ मूल्याच्या ५ पट न्यून आहेत. ‘वो बू शी याओ शेन’ या चित्रपटाचा नायक चीनमधील रुग्णांच्या दुर्धर आजारावरील जी औषधे वाममार्गाने आणतो, ती भारतीय असतात आणि तो तीच का आणतो ? हे पुढे लक्षात येईल!
२. नवीन औषधासाठी २० वर्षांसाठीचे ‘पेटंट’ मिळाल्यावर प्रचंड मूल्याने औषध विकणारी आस्थापने !
कुठलेही औषध जेव्हा पहिल्यांदा बाजारात येते, तेव्हा त्याचे मूल्य प्रचंड असते. याचे कारण म्हणजे जी औषधनिर्मिती करणारी आस्थापने आहेत, ती औषधे अथक संशोधन करून शोधून काढतात. त्यांनी त्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केलेले असतात. कितीतरी वर्षे संशोधनाच्या कामात घालवलेली असतात आणि ती औषधे बाजारात आणण्याआधी प्रचंड कष्टदेखील केलेले असतात. अशा प्रकारे संशोधन करून नवी औषधे बाजारात आणणार्या बलाढ्य बहुराष्ट्रीय औषध आस्थापनांना ‘इनोव्हेटर’ आस्थापने म्हणतात ! ‘जीएस्के’, ‘बायर’, ‘फायझर’, ‘नोव्हार्टिस’ या अशाच काही बलाढ्य ‘इनोव्हेटर’ औषधांची निर्मिती करणारी आस्थापने आहेत. बहुतेक सगळी बलाढ्य आस्थापने ही युरोपीय आहेत किंवा अमेरिकी ! ही आस्थापने त्यांचे नवीन औषध बाजारात आणण्यासाठी त्यावर ‘पेटंट’ घेतात. (पेटंट हा एक असा कायदेशीर अधिकार आहे जो केवळ कोणत्याही एकाच व्यक्तीला, संस्थेला किंवा एखाद्या आस्थापनाला एखाद्या वस्तूच्या विशेष उत्पादनासाठी, संशोधनासाठी, तसेच एखाद्या प्रक्रियेसाठी एकाधिकार पद्धतीने दिला जात असतो.) या पेटंटचे आयुष्य असते साधारणपणे २० वर्षे. एकदा पेटंट मिळाले की, दुसरे कुठलेही आस्थापन ते औषध बनवू शकत नाही. त्यामुळे इनोव्हेटर आस्थापनाला बाजारात काहीही स्पर्धा उरत नाही. त्यामुळे अर्थातच हव्या त्या मूल्याला ते औषध विकायला संबंधित आस्थापने मोकळी असतात. ही आस्थापने प्रचंड मूल्याने ही औषधे विकतात. ते साहजिकही आहे. ‘आम्ही संशोधनावर प्रचंड खर्च केला; म्हणूनच आमच्या औषधाचे मूल्य अधिक आहे,’ असे ही आस्थापने छातीठोकपणे सांगत असतात.
३. नवीन औषधांच्या संशोधनावर मोठ्या प्रमाणात खर्च झाल्याचे सागंणारी; मात्र खर्च लपवणारी औषधनिर्मिती आस्थापने !
औषधांची निर्मिती करणार्या आस्थापनाला एक नवीन औषध बाजारात आणायला साधारण सरासरी किती खर्च येतो ? तर वर्ष २०१७ मध्ये हा आकडा होता तब्बल २.९ अब्ज अमेरिकी डॉलर (साधारण १८ सहस्र ५६० कोटी रुपये) ! पण हा आकडा आला कुठून? तर अमेरिकेतल्या टफ्ट्स विद्यापिठात ‘टफ्ट्स सेंटर’ नावाचे एक संशोधन केंद्र आहे. हे केंद्र आस्थापनांकडून या किमती गोळा करते. बरे, हा सगळा पैसा संशोधनावरचा खर्च आहे का ? तर नाही ! हा औषध बाजारात आणण्याचा एकूण खर्च आहे. ‘विपणन’ (मार्केटिंग) आणि ‘ग्राहक संबंध’ (कस्टमर रिलेशन्स) या गोंडस नावाखाली आस्थापनांना जो खर्च डॉक्टरांवर त्यांची औषधे त्यांनी रुग्णांना लिहून द्यावीत म्हणून करावा लागतो, त्यावर केलेला हा खर्च असतो; पण मग ‘संशोधनासाठी पुष्कळ खर्च झाला म्हणून या औषधाचे मूल्य अधिक आहे’, असे ही आस्थापने का सांगतात ? कारण ते सोयीचे असते आणि ऐकायलाही बरे वाटते म्हणून ! मग संशोधनावरचा सरासरी खर्च किती? तर तो कुणालाच ठाऊक नाही. अगदी टफ्ट्स सेंटरलाही नाही. आस्थापनाचा संशोधनावरील खर्चाचा आकडा अत्यंत गोपनीय असतो. औषध आस्थापने जी औषधे बाजारात आणतात, त्यातल्या ४० टक्के औषधांवरचे मूळ संशोधन होते अमेरिकी विद्यापिठांत ! एका ठराविक टप्प्यापर्यंत संशोधन आले की, त्या औषधाचे पेटंट घेऊन विद्यापिठे औषध आस्थापनांना ही औषधे भरपूर मोबदला घेऊन देऊन टाकतात. विद्यापिठांकडे हे संशोधन करायला पैसे कुठून येतात ? तर बहुतेकदा अशा प्रकारच्या संशोधनाला ‘राष्ट्रीय आरोग्य संस्था’ (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ (एन्.आय.एच्.)) ही सरकारी संस्था भरपूर पैसा पुरवते. हा सरकारी पैसा असतो. अर्थातच लोकांनी भरलेल्या करांतून आलेला ! लोकांच्याच पैशातून संशोधन करून लोकांसाठीच बनवलेल्या औषधांचे मूल्य मग इतके अधिक कसे ?
‘संशोधनावर पुष्कळ खर्च झाला’, असे म्हणतांना औषधांची निर्मिती करणारी आस्थापने ‘एन्.आय.एच्.’कडून मिळणार्या देणग्या लक्षातच घेत नाहीत. विद्यापिठांनी केलेले संशोधन पुरेसे नसते, त्यावर पुढे बरेच काम आस्थापनांना करावे लागते, त्यावर भरपूर खर्च होतो, हे मान्यच; पण मग हा खर्च किती होतो, हे आस्थापने सांगत का नाहीत ?
४. अन्य औषधांपेक्षा ९० ते ९५ टक्क्यांनी स्वस्त असणारी ‘जेनेरिक’ (टीप) औषधे !
(टीप : जेनेरिक औषधे म्हणजे औषध निर्मिती करणार्या आस्थापनांच्या एखाद्या औषधावरील ‘पेटंट’ची कालमर्यादा संपल्यावर अन्य आस्थापनांकडून बनवली जाणारी आणि स्वस्त असणारी औषधे.)
‘इनोव्हेटर’ औषध आस्थापनाच्या पेटंटचे आयुष्य संपले की, औषधांची निर्मिती करणारे कुठलेही आस्थापन हे औषध बनवू शकते. पेटंटचा कालावधी संपलेले औषध कसे बनवायचे ? हे जेनेरिक आस्थापनाला इनोव्हेटर आस्थापनाच्या पेटंटवरून समजते, तसेच त्या औषधाची सुरक्षितता आणि उपयुक्तताही इनोव्हेटर आस्थापनाने सिद्ध केलेली असते. ते सिद्ध करण्यासाठी जेनेरिक आस्थापनाला काहीच खर्च करायची आवश्यकता नसते; म्हणूनच अशा प्रकारे इनोव्हेटर आस्थापनाचे पेटंट संपल्यावर जेव्हा जेनेरिक आस्थापने ते औषध बनवू लागतात, तेव्हा त्याचे मूल्य बरेच अल्प असते. अनेक जेनेरिक आस्थापने ते औषध एकाच वेळी बनवू शकतात. त्यामुळे बाजारातील स्पर्धा वाढते आणि मूल्य आणखीनच खाली येते; म्हणूनच जेनेरिक औषधे स्वस्त असतात; परंतु याचा अर्थ ती बनावट (खोटी) असतात, न्यून दर्जाची असतात, असे अजिबातच नाही. परिणामकारकता सिद्ध झाल्याविना जेनेरिक आस्थापनाला औषध विकण्याची अनुज्ञप्ती (परवाना) मिळतच नाही. जेनेरिक औषधे इनोव्हेटर औषधापेक्षा ९० ते ९५ टक्क्यांनी स्वस्त असतात. (म्हणजे इनोव्हेटर औषध १०० रुपयाला मिळत असेल, तर जेनेरिक औषध १० किंवा ५ रुपयाला मिळते!)
(क्रमशः पुढील रविवारी)
– डॉ. मृदुला बेळे (ऑक्टोबर २०२१)