पंढरपूर येथे विकासाचा सुधारित आराखडा सिद्ध करण्यासाठी ड्रोन छायाचित्रकाद्वारे चित्रीकरण !
पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर पालखी तळ आणि मार्ग विकास आराखड्याच्या अंतर्गत भाविकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी नव्याने समाविष्ट करण्याच्या कामांचा सुधारित सर्वंकष आराखडा सिद्ध करण्यात येत आहे. आराखड्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार आराखड्यामध्ये कोणत्या सूचनांचा समावेश करता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार मंदिर, मंदिराचा परिसर, दर्शनाची रांग, चंद्रभागा वाळवंट, नदीवरील घाट, बंधारे आदी ठिकाणांचे ड्रोन छायाचित्रकाद्वारे चित्रीकरण करण्यात आले.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचना यांचा विचार करून वारकरी भाविकांसह स्थानिक नागरिकांना तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या अंतर्गत आवश्यक सुविधा देण्यासाठी सर्वसमावेशक असा विकास आराखडा सिद्ध करण्यात येत आहे. चित्रीकरणास कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन, नगरपालिका, पोलीस प्रशासन, मंदिर समिती येथील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासमवेत चित्रीकरण करण्यात आले.