सनातनचे ११४ वे व्यष्टी संत पू. लक्ष्मण गोरेआजोबा यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. सायली देशपांडे (वय १२ वर्षे) हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

६.१२.२०२१ या दिवशी पू. लक्ष्मण गोरेआजोबा यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी उपस्थित साधकांकडून सूक्ष्मातील प्रयोग करवून घेण्यात आले. त्या वेळी, तसेच पू. लक्ष्मण गोरेआजोबांचा सन्मान होतांना कु. सायली देशपांडे हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

पू. लक्ष्मण गोरेआजोबा

१. सूक्ष्म प्रयोगाच्या वेळी जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

कु. सायली देशपांडे

१ अ. प्रयोग १ – साधकांना ‘सनातन चैतन्यवाणी’ या ॲपवरील ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, हा नामजप ऐकवणे

१. ‘नामजप ऐकतांना मी अत्यंत आतुरतेने आणि अंतर्मनापासून कृष्णाला आळवत आहे’, असे मला जाणवले.

२. माझे मन निर्विचार होऊन मी नामजपाशी एकाग्र झाले.

१ आ. प्रयोग २ – पांढर्‍या लखोट्याकडे पाहून काय जाणवते ?

पांढर्‍या लखोट्याकडे पाहून ‘त्यात श्रीकृष्णाचे चित्र आहे. त्यात पुष्कळ कृष्णतत्त्व आहे’, असे मला जाणवले. (प्रत्यक्षातही लखोट्यात श्रीकृष्णाचे चित्र होते.)

२. पू. लक्ष्मण गोरेआजोबांचा सन्मान करत असतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ पू. गोरेआजोबांचा सन्मान करत असतांना ‘आकाशातून सर्व देवता पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले.

आ. पू. आजोबांकडे पाहिल्यावर मला त्यांच्यातील बालकभाव आणि निर्मळता जाणवली.

इ. त्यांच्याकडे पाहिल्यावर मला त्यांच्यात मारुतितत्त्व जाणवून ‘ते मारुतीचे अंश असावेत’, असे वाटले. त्या वेळी मला त्यांच्यामध्ये असलेल्या क्षात्रभावाची जाणीव झाली.

ई. साधक पू. आजोबांची गुणवैशिष्ट्ये सांगत असतांना मला सतत चमेलीच्या अत्तराचा सुगंध तीव्रतेने येत होता.’

– कु. सायली देशपांडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१२.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक