उत्तरप्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यात ५८५ अवैध मदरसे !

लक्ष्मणपुरी – उत्तरप्रदेशातील ६ सहस्र ५०२ मदरशांपैकी ५ सहस्र २०० मदरशांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. राज्यातील मुरादाबाद जिल्ह्यात ५८५ अवैध मदरसे आढळले आहेत. अवैध मदरशांना कोट्यवधी रुपयांचा निधी मिळत असल्याचे या सर्वेक्षणामधून उघड झाले आहे. या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारकडे सुपुर्द करण्यात आला आहे.

उत्तरप्रदेशात विविध जिल्ह्यांमध्ये अवैध मदरसे

गाजियाबादमध्ये १३९ मदरसे सरकारी मान्यता नसतांना चालवले जातात. गोरखपूरमध्ये १४२ मदरसे अवैध आहेत. कानपूरमध्ये ८६ मदरसे सरकारी अनुमतीविना चालवले जातात. अयोध्येत १४३ पैकी ५५ मदरसे अवैध आहेत. प्रयागराजमधील २६९ मदरशांपैकी ७८ मदरसे अवैध आहेत. बाराबंकीमध्ये १०२ मदरसे सरकारी मान्यतेविना चालतात. पीलीभीतमध्ये २५ मदरसे अवैध आहेत. तसेच देवबंदमध्ये १०० मदरसे सरकारी अनुमतीविना चालवले जातात. सहारनपूरमध्ये ७५४ पैकी ७६ मदरशांना सरकारची मान्यता नाही. आग्रा येथे ९७ पैकी १० मदरसे अवैध आहेत, असे या अहवालात आढळून आले आहे. सरकारची मान्यता नसलेल्या मदरशांना कोट्यवधींचा निधी मिळाल्याचे या अहवालाच्या माध्यमातून उघड झाले आहे. (एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मदरसे चालणे हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)

मदरशांमध्ये लैंगिक अत्याचार आणि बालहक्कांचे उल्लंघन होेत असल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकारने ऑगस्ट २०२२ पासून राज्यातील मदरशांचे सर्वेक्षण हाती घेतले होते. समाजवादी पक्षाने या सर्वेक्षणाला विरोध दर्शवला होता.

संपादकीय भूमिका

एका जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अवैध मदरसे असतील, तर राज्यात आणि पूर्ण देशात किती असतील, याचा विचारही न केलेला बरा !