मुस्लिम राष्ट्रे जगाच्या नकाशातून पुसली जातील ! – श्री हालसिद्धनाथ देवाची भविष्यवाणी
ब्रह्मनाद सोहम् अजपाजप । येई प्रचीती ते परमेश्वराचे निखळ स्वरूप ।।
कृपाशीर्वाद तयांचा अनुभवती नाथभक्त । देवाधिदेव तो हालसिद्धनाथ ।।
श्रद्धा आणि भावाचा केला जागर । हालसिद्धनाथांचा महिमा अपरंपार ।।
चैतन्य सोहळा रंगे नाथ दरबारी । भक्तीत मग्न झाले सेवेचे मानकरी ।।
भाकणूक यात्रेचे वैशिष्ट्य
पाच दिवस चालणार्या यात्रेचे नाथांची भाकणूक हेच वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे यात्राकाळात वाडी आणि कुर्ली या गावांमध्ये मांसाहार वर्ज्य केला जातो. अनेक वर्षांपासून चालू असलेला अलिखित नियम आजही सर्व जण पाळतात. माहेरवाशिणी आणि परगावी असलेले सर्व ग्रामस्थ श्री हालसिद्धनाथांच्या यात्रेसाठी उपस्थित रहातात. श्री क्षेत्र आप्पाचीवाडी देवस्थान कोल्हापूरजवळील कागलपासून २६ कि.मी. अंतरावर असून चिंचबनात प्रचंड घुमटीचे मंदिर, दरबारी सदर, बुरूजबंद देऊळ, सहस्रो भक्तमंडळी असे सर्व गोष्टींनी ऐश्वर्यसंपन्न असे असून कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात हे सिद्धस्थान विख्यात आहे. भाकणूक म्हणजे ५-२५ वर्षांत घडणार्या जागतिक घडामोडींचे सूचक वर्णन असते. ते सांगतांना एक छंद आणि तालबद्ध भाव असतो. त्याला एकप्रकारची समाधीच लागलेली असते. (संदर्भ : संकेतस्थळ)
सर्वसाधारणपणे महनीय व्यक्तींकडून सांगितली जाणारी राष्ट्राच्या संदर्भातील भविष्यवाणी ही सांकेतिक शब्दांत असते. त्यातील संकेतांचा अर्थ समजून घ्यावा लागतो. संकेतांमध्ये भविष्य सांगण्यापाठीमागेही काही कारणे असतात. प्रसिद्ध भविष्यवेत्ता नॉस्टॅ्रडॅमस याचीही भविष्यवाणी सांकेतिक शब्दांत होती. हालसिद्धनाथांच्या तीर्थक्षेत्री होणार्या भाकणुकीतही काही वाक्ये सांकेतिक शब्दांत सांगितली असल्याचे लक्षात येते.
पू. भगवान डोणे महाराज यांच्यात श्री हालसिद्धनाथ देवाचा संचार होतो आणि ते त्या स्थितीत भविष्यकथन करतात, अशी नाथभक्तांची श्रद्धा आहे.
श्री क्षेत्र आप्पाचीवाडी कुर्ली (तालुका निपाणी, जिल्हा बेळगाव) येथील श्री हालसिद्धनाथ देवाच्या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भाकणूक होय ! ही भाकणूक कशा स्वरूपाची असते ? हे सर्वांना कळावे, तसेच तिचा सर्वसाधारण अर्थ काय होऊ शकतो ? तो कंसामध्ये दिला आहे.
(सेवेकरी – श्री. अजिंक्य विभूते, श्री. वीरभद्र विभूते आणि श्री. राजेंद्र विभूते, कुर्ली)
१ . आप्पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रतिशिर्डी होईल ।
काढावं काढावं पोथी पुराण काढावं, वाचून दावावं, सभेत बोलावं, खोटं तू बोलशील सिद्धा खरं मी करीन, सभेला सादर राहीन पेरलं ते उगवलं शेवटाला लाविन चालवीन चालवीन डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन अगा ये गा बाबा, धरतो हालसिद्धाप्पा.
मेघयान मळा माझ्या आकाशाच्या फळा अमृताच्या धारा हाय कि गा हाय मेघ उदंड हाय. बांधा आड बांध, शिवं आड शिवं (एका शेतात पाऊस पडेल, तर शेजारच्याच एका शेतात पाऊस पडणार नाही, तसेच एका गावात पडेल, तर शेजारच्याच दुसर्या गावात पडणार नाही. यातून नाथांनी सध्याच्या पावसाची परिस्थिती सांगितली आहे.), मेघाची कावड गैरहंगामी उदंड हाय (नको असेल त्या वेळी पाऊस पडेल म्हणजेच अवकाळी पाऊस. जो सध्या पडत आहे.), मेघाच्या पोटी आजार हाय (पूर्वी पाऊस योग्य त्या वेळी योग्य त्या मासात पडत असे. याउलट सध्या मानवनिर्मित प्रदूषणामुळे पावसाचे पाणीही प्रदूषित होत आहे. त्यामुळे ‘मेघाच्या पोटी आजार आहे, असे म्हटले आहे.), द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय. दुनिया न्याहाळाय लागलाय. त्याच्या मागं अंधार आणि म्होरं अंधार पडलाय (सध्याच्या जनतेचा पापकर्माचा अंधार पडला आहे.), कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाचं हाय. नऊ दिन नम, सात दिन भोंब बरोबर हाय (ज्याप्रमाण नवरात्र नऊ दिवस असते, तशी देवाची यात्रा सात दिवस असते.) वाडी कुर्लीचा अगाध मोठा हाय, जगात झेंडा मिरवलं. (वाडी कुर्लीचा महिमा मोठा असून त्याची कीर्ती जगात पसरेल.) भोंबेच्या पुनवेला माझा सोहळा निघतोय (कोजागिरी पौर्णिमेला माझी यात्रा होते.) चिंचेच्या बनात मी खेळायला जातोय. (या ठिकाणी नाथांची संजीवन समाधी आहे.) कारीच्या माळाला (देवांचे विश्रांतीसाठी असलेले एक ठिकाण.) माझी विश्रांती हाय. खडकाच्या माळाला भाषण चाललय (ज्या ठिकाणी यात्रा भरते ते ठिकाण, म्हणजेच भाकणूक ज्या ठिकाणी होते ते ठिकाण), खडकाच्या माळाला आसन टाकलयं. पूर्वीच्या युगात निशाण रोवलयं. (फार पूर्वीपासून देवांचे निवासस्थान या ठिकाणी आहे. माझे हेच स्थान आहे, असे देव सांगत आहे.)
माझी विटंबना करशिला, तर मातीत मिसळून जाशिला. खडकाच्या माळाला ३३ कोटी देवांचा दरबार भरलाय. बसलोय बसलोय कांबळ्याच्या खोळ्यात फुलांच्या माळेत. बसलोय पृथ्वीची घडामोड करत (संपूर्ण विश्वात ज्या घडामोडी चालू आहेत त्यावर देवाचे नियंत्रण आहे.), बसलोय आप्पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रतिशिर्डी होईल. तिरुपती बालाजीचा माझा अवतार हाय. आप्पाचीवाडी सोन्याची काडी हाय. वाडी-कुर्ली आगार भरलाय, नाथांचा दरबार हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील.
२. हालसिद्धनाथाचा त्रिभुवनात जयजयकार चाललं ।
पिवळ्या भस्माचा महिमा जगात वाढत राहील (भंडार्याचा – भंडारा पिवळ्या रंगाचा असतो) महिमा सर्वत्र पसरेल), हालसिद्धनाथांचा त्रिभुवनात जयजयकार चाललं. वाडी-कुर्लीच्या पुजारी मानकर्यांना माझा आशीर्वाद हाय. वाडी-कुर्लीच्या सबिन्यात फूट पाडशिला, तर यमपुरी बघशीला.
ऐका माझ्या बाळांनो ऐका माझ्या तान्ह्यांनो भोळ्या शंकरानं हालसिद्धनाथांचा धावा केलाय, धावा करून हालसिद्धनाथाला गार्हाण घातलय. कोरोना व्हायरस माझ्या पायाशी घेईन, पायाशी घेऊन त्याच मी गाडप (नष्ट) केलय. ३३ कोटी देवांचा दरबार बंद पडलाय. खडकाचा दरबार चालू राहील. भारत देशात समान नागरी कायदा येईल. गोरगरीब जनता गुढ्या-तोरण बांधतील ! जगाच्या तापमानात धोका वाढल. जंगलास आग लागल. वन्यजीव-वन्य औषध पृथ्वीवरून नष्ट होईल. निपाणकर सरकारला हालसिद्धनाथ शापातून मुक्त करील तुळजापुरची अंबाबाई त्याची पाठिशी राहील. ही धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा.
३. देवधान्य बहुत पिकेल, राजधान्य उदंड पिकेल ।
पिंजर्यातला राघू भाषण करील चित्त द्याव (देवाचा ‘संचार’ झाल्यावर अवस्था कशी असते, त्याची कल्पना देणारे वाक्य – देह म्हणजे पिंजरा या पिंजर्यात ज्याला सूक्ष्म ज्ञान आहे, असा आत्मा प्रवेश करून ही भाकणूक करतो.) पहिला मोगरा धुपून जाईल, दोनवा मोगरा मध्यम राहील, उड्डाण मारील तिनवा मोगरा, राज्य करील. (स्वातंत्र्यापासून जो पक्ष राज्य करत होता, तो म्हणजे पहिला मोगरा. तो म्हणजे काँग्रेस पक्ष. तो हळूहळू नाहिसा झाला. त्याला विरोध करणारा जयप्रकाश नारायण यांचा पक्ष मध्यम राहिला, तिसरा मोगरा म्हणजे भाजप पक्ष दीर्घकाळ राज्य करेल) (याचा हाच अर्थ असेल असा दावा नाही, यातून अन्य अर्थही निघू शकतो. – संकलक) तुम्ही बघाल अश्विनी, भरणी, कात्या, कृतिका, रोहिणी मिरगाच्या बहिणी, सरता रोहिणी निघता मिरग मिरवल, कुरी कोकण बंधारी (पेरणी यंत्र म्हणजे त्या भागातील पेरणी होईल), बांधा आड बांध, शिव आड शिव. रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा. सादल तो सज्जन हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहील. सरता मिरग निघता आडद्रा मध्यम फाट्याचा पेरा होईल (सरता मृग म्हणजे नक्षत्राचा शेवटचा भाग आणि आडद्रा नक्षत्राचा प्रथम भाग होय. शेतकर्यांना केलेले हे मार्गदर्शन आहे. मृगाचा शेवटचा भाग आणि निघत्या आडद्रा म्हणजे आद्रता नक्षत्राचा प्रथम – संकलक), सरत्या आडद्रा निघता तरणा आलम दुनियेचा पेरा होईल (जगाचे देवाने तीन भाग केले असून पहिल्या भागाला कोकण विभाग, दुसरा मध्य, उर्वरित भाग म्हणजे आलम दुनिया ! – संकलक), कुरी थार्याला बसल (यावर्षीचे काम पूर्ण झाल्यावर कुरी जाग्यावर बसेल म्हणजे आता याचे काम पुढच्या वर्षीचे असेल.) रोहिणीची पेरणी तिला हातग्याची पुरवणी होईल. (दीर्घकालीन पिकासाठी पूरक असा पाऊस होईल.) देवयान धान्य बहुत बेईमान राहील, राजयान धान्य उदंड पिकल (जोंधळा भरपूर पिकेल) धारण धोरण जगाचं जीवन होईल. (या धान्याचा दर ठरवण्याची प्रक्रिया त्यावर अवलंबून आहे, असे धोरण. ज्यावरच शेतकर्याचे पुढचे सगळे अवलंबून असते.) खळ्याच्या काढी तीन मापटी म्हणशीला तीन मापटी म्हणता शेरावर येईल, ऐकल न ऐकल शेर म्हणता मापट्या-चिपट्यावर येईल. चढल-उतरल (धान्याचा दर सर्वसाधारण राहील. तो तीन मापटी म्हणजे सर्वसाधारण दोन किलो धान्य होय !)
४. मूग, कडधान्य, तूर, सोयाबीन उदंड पिकल, डाळीचा भाव तेजीत राहील ।
खरीप भोरीप बहुत उदंड पिकल. जमिनीतील धान्य बहुत बेईमान राहील. तांबडी रास मध्यम राहील. काळी रास सुफळ जाईल. मूग, तूर, सोयाबीन, कडधान्य उदंड पिकल, सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळल. डाळीचा भाव तेजीत राहील. दीड महिन्याच इथून पुढ धान्य पिकल, पांढर धान्य उदंड पिकल गोरगरीबाला पुरावा करील. तांबडी कळी मध्यम पिकल, ताजव्यातुन जोखल. (मिरची मध्यम पिकेल; पण दर चांगला मिळेल) धान्य दारात वैरण कोन्यात राहील. वैरण सोन्याची होईल सांभाळून रहा. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. (पूर्वी काळ असा होता की, धान्य घरी असायचे आणि वैरण हे रानात असायचे. यापुढे काळ असा येईल की, एकवेळ धान्य शेतात राहील; पण वैरण जपून ठेवावी लागेल. म्हणजे वैरण अल्प होईल, असे देवाला सांगायचे आहे.) गव्हाची पेंडी मध्यम पिकल. बांधा आड बांध शिव आड शिव धान्याधुन्याची वैरण काडीची चोरीमारी वाढत राहील.
५. महाराष्ट्र राज्यामध्ये नदीजोड प्रकल्प येईल !
महाराष्ट्र राज्यात एन्रॉनची लाईट येईल, लाईटीअभावी जनजीवन विस्कळून जाईल. दिवसा डाके-दरोडे पडतील, लुटालुट होइल. ऐका माझ्या बाळांनो ऐका माझ्या तान्ह्यांनो भागुबहीण सातजणी बहिणांना हालसिद्धनाथ यांच्या भेटीला येतील. बहीण भाऊ सुख दु:खाच्या गोष्टी करतील. न्हावानं घालतील. भंडार्याचा काव कटाळा काढतील शीण काढतील. महाराष्ट्र राज्यामध्ये नदीजोड प्रकल्प येईल. दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल. नंदनवन होईल. म्होरल भविष्य सीमाप्रश्न राज्यकर्त्यांच्या चर्चेत राहील. सीमाभागात मोठा गोंधळ माजल. निपाणी भागात अतिरेकी लोक येतील. जाळपोळ-फायरींग होईल. कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठ भगदाड पडेल. कर्नाटक राज्याचा चौथाई कोना ओसाड पडेल, जलमय होईल. (सर्वसाधारपणे शत्रूने बाँबवर्षाव केल्याने एखादे मोठे धरण फुटून कर्नाटक राज्यातील एक चतुर्थांश भाग ओसाड पडेल, अशी आम्हाला दाट शक्यता वाटते. – संकलक)
६. उसाच्या कांड्यान दुधाच्या भांड्यान राजकारणाला मोठी कलाटणी लागल ।
उसाच्या कांड्यान दुधाच्या भांड्यान गावोगावी तालुक्यात जिल्ह्यात राज्यात राजकारणाला मोठी कलाटणी लागल (प्रत्येक वर्षी उसाचे आंदोलन होते. यामुळे गाव-तालुकास्तरावरील राजकारण बदलत जाते. सत्ताकेंद्र पालटत जाईल.), शेतकरी वर्ग रात्रंदिवस काबाडकष्ट करतील. कष्ट करून ढोरं गुरं घेऊन उगा निगा करून (वैरण आणण्यापासून ते गुरांना घालण्यापर्यंत, जनावरांचे पालनपोषण करून शेतकर्यांना हातात प्रत्यक्षात पदरात काही पडत नाही.), धार दुभतं काढून डेरीला घालतील. डेरीचा मॅनेजर मलई खात राहील. दूध घालणारा शेवटी कर्जात राहील, गाई-म्हशींचा भाव गगानाला भिडल. दुधाचा भाव वाढत राहील. नदीकाठची जमीन ओसाड पडेल. तुम्ही जरी काठी नेसशीला आई-बापाला सतरा गाठीची धडूती मिळतील. (माणसाचे जग आता मी, माझी बायको, माझी मुले एवढ्यापुरते मर्यादित राहिले आहे.)
७. धरणीमाता दुभंगून जाईल ।
१२ वर्षांची मुलगी आई होईल. कानानं ऐकशिला, डोळ्यान बघत राहशीला. नीतीमत्तेचा खेळ बिघडायला लागलाय. उगवत्या सूर्याला संकट पडलया. (आताची एकूण परिस्थिती पहाता नीतीमत्तेचा र्हास, मनुष्याचे अधर्माने वागणे, त्याचप्रमाणे प्रदूषणाची पातळी वाढणे आदींमुळे पृथ्वीचा तोल ढासळत आहे. – संकलक) शर्यतीचा बसवा शाप देईल ऐका माझ्या बाळांनो ऐका माझ्या तान्ह्यांनो जाती-धर्म बाळांनो, बिघडून जातील. जाती-धर्मात वैरत्व वाढल, वैरत्व वाढून हाणामार्या होतील. धरित्री माता दुभंगून जाईल. धरित्री मातेतून भोंगे निर्माण होतील. मनुष्याच्या जिवाला हानी पोहचवल (पृथ्वीच्या पोटातून विचित्र किडे बाहेर येतील. हे किडे कदाचित् इतके विषारी असू शकतील की, त्यामुळे मनुष्याच्या जिवाला हानी पोचेल. – संकलक)
८. पाकिस्तान देशाचा चौथाई कोना भारताच्या ताब्यात येईल ।
मराठा सैनिक मृत्यूला भिणार नाही. छातीची ढाल करील. पाकिस्तान राष्ट्राशी लढत राहील. पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोना भारताच्या ताब्यात येईल. भारतमातेचा तिथं जयजयकार चालंल.
पारवं फुल सुफल जाईल पिवळ फुल उदंड पिकल मुलान विकलं. पांढर फूल मध्यम पिकल. ताबंड फुल उदंड पिकल. देवाधर्माला पुरावा करल. लुगडी घोंगडी कपडालत्ता मनुष्याला काही वर्षांनी फुकाचा होईल. सरकी पुकाची मेंढी मोलाची होईल, (मेंढीचे महत्त्व वाढेल, तर सुती कपड्यांना अधिक महत्त्व रहाणार नाही.)
जग दुनियेत एक मोठं नवाल होर्ईल, मेंढींच्या पोटाला मुलगा जन्माला येईल. जगात त्याची किर्ती होईल. (‘पुढे मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल’, असे देवाला सांगायचे आहे. – संकलक) मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय, मेंढी माऊली मेंढक्याला जगदुनिया दाखवल (मेंढीमुळेच मेंढपाळाला जग पहायला मिळते.), मेंढींच्या जीवावर मेंढका सुखी राहील. मेंढीबाईला कलम जडल. मेंढीपासून वेगळी पैदास निर्माण होईल, मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात खेळल. मेंढीच्या गळ्यात पुतळ्याच्या माळा घालशीला मेंढीबाई पालखीतून मिरवल. मेंढीबाई सोन्यापेक्षा पिवळी होईल. (पूर्वी श्रीमंत घरातील महिला पुतळ्याच्या माळा घालत. त्याचप्रकारे यापुढील काळात मेंढीचे महत्त्व वाढत जाईल. ती सोन्यासारखी मौल्यवान होईल.)
धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारील (सध्याच्या काळात माणसे रंग पालटत आहेत. बाह्यतः एक, तर अंतरंगात दुसरेच अशी माणसाची अवस्था आहे. त्यामुळे आता आपण ज्याला मेंढी समजतो, तो प्रत्यक्षात अस्वलासारखा, तसेच हिंसक, क्रूर किंवा कपटीही असू शकेल ! म्हणजेच मनुष्य ज्याच्यावर विश्वास ठेवायला हवा, त्याच्यावर विश्वास न ठेवता अयोग्य आणि चुकीच्या माणसावर विश्वास ठेवत आहे.)
९. साखर आणि गुळाचा भाव तेजीत राहील ।
शुगर फॅक्टरीचा मालक-मॅनेजर आनंदात रहातील. साखरेचा भाव तेजी-मंदीत राहील. गुळाचा भाव वाढत राहील. मांडवाच्या दारी ३६०० म्हणशीला, ३६०० म्हणता ३५०० येईल. ऐकेल न ऐकेल ३५०० म्हणता ३४०० येईल. (यापुढील काळात साखरेचा भाव एका क्विंटलला किती असेल, ते सर्वसाधारपणे देवाने सांगितले आहे.) चढलं उतरलं तंबाखूची पेंढी मध्यम पिकल.
१०. तंबाखूमुळे घरंदारं बरबाद होतील ।
बांधाआड बांध शिवं आड शिवं. तंबाखूचा भाव गगनाला भिडल. तंबाखूपासून मनुष्याला रोगराई वाढत राहील. तंबाखूचा बंबाखू होईल. (तंबाखूच्या शेतात तंबाखूसारखेच बंबाखू नावाचे पीक उगवेल. यापुढील काळात हे बंबाखू इतके उगवेल की, त्यामुळे त्या तंबाखूची पूर्णत: हानी होईल. तंबाखूच्या शेजारी उगवणारा बंबाखू हा तंबाखूला लागणारी सर्व पोषक द्रव्ये शोषून घेतो.) मांडवाच्या दारी ३४०० म्हणशीला, ३४०० म्हणता ३३०० वर येईल. ऐकेल न ऐकेल ३३०० म्हणता ३२०० वर येईल. (तंबाखूचा भाव किती असेल ते सर्वसाधारणपणे देवाने सांगितले आहे.)
३२०० म्हणता ३१०० वर येईल. चढंल उतरल. रसयान भांडं उदंड पिकेल. रसाला धारण माणसाला मरण. (ऊस भरपूर पिकेल. अधिक प्रमाणात ऊस पिकल्याने मनुष्याची आर्थिक परिस्थिती सुधारेल. गरजेपेक्षा अधिक पैसा मिळाल्याने मनुष्य व्यसनाधीन होईल आणि त्यात मृत्यूमुखीही पडेल.) उसाचा काऊस होईल. सडकला पडंल. औषधाला मिळणार नाही. उसासाठी राज्यात आंदोलन होईल. गावोगावी खेडोपाडी दंगाधोपा होईल. कळपातला बकरा कळपात भांडून खेळल. मायीचे लेकरू माईला ओळखणार नाही. गायीला वासरू भेटणार नाही.
११. पाण्याचा कप विकत मिळेल ।
जगदुनियेत धुंदकारी पडलं (धुंदकारी ही दोन प्रकारची असू शकेल. यातील भौतिक म्हणजे यापुढील काळ कठीण असून कदाचित् असे वातावरण असेल की, ना ऊन ना पाऊस ना थंडी अशा वातावरणामुळे वेगवेगळ्या प्रकारचे रोग उत्पन्न होतील किंवा बौद्धिक पातळीवर म्हणजे यापुढील काळात मनुष्य सद्सद्विवेकबुद्धी गमावून बसेल. – संकलक)
वांग्याच्या झाडाला शिडी लावशीला. (‘यापुढील काळात माणसाची उंची अल्प होईल. ती इतकी अल्प होईल की, कदाचित् मनुष्य वांग्याच्या झाडाला शिडी लावून त्यावर चढेल.’ – संकलक)
चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल. उशाची भाकरी उशाला राहील. (‘जीवन नश्वर असून माणसाने जरी डोक्यापाशी भाकरी ठेवली, तरी सकाळी उठल्यावर ती खाण्यासाठी तो जिवंत राहील’, असे सांगता येत नाही. भविष्यकाळासाठी मनुष्य वेगवेगळ्या प्रकारच्या योजना करतो; मात्र मनुष्य जगलाच नाही, तर त्या योजनांचा उपयोग काय ? असा सध्याचा काळ आहे.) कुणाच पटकूर कुणाला होईल. माझं माझं म्हणू नका. भ्रांतीच ओझं हाय. पाण्याचा बुडबुडा हाय ! पाण्याचा कप विकत मिळल, पाळी लागंल. (‘सध्या पाणी विकत घ्यावे लागत असून त्यासाठी अनेक ठिकाणी रांगाही लागत आहेत. कदाचित् भविष्यात यापेक्षाही भीषण परिस्थिती होऊ शकते. तसेच माणसाच्या चुकीच्या वागण्यामुळे अनेक ठिकाणी पाणी प्रदूषित होऊ शकते आणि काहीच ठिकाणी चांगले पाणी राहिल्यावर ते विकत घ्यावे लागेल.’ – संकलक)
१२. अठरा तर्हेचा मनुष्याला एक आजार होईल ।
जाळयान किरम खोकला उदंड हाय (सध्या होत असलेले कृमी अथवा जंतांपासून होणारे रोग) अठरा तर्हेचा मनुष्याला एक आजार होईल. आड चुकल पण खेडं चुकणार नाही. डॉक्टर लोक हात टेकतील. (हे कदाचित् एड्स रोगाच्या संदर्भात असू शकते. सध्या एड्स रोगाला औषध नसून तो अगदी खेड्यापर्यंत पोचला आहे. डॉक्टर लोकही त्यासाठी काही करू शकत नाहीत, अशीच स्थिती आहे. – संकलक) लाकूड सोन्याचे होईल. सांभाळून रहा. लाकडाची डोर्ली येतील. गायी म्हशीला गहू घालशीला रेड्या-पाड्याला पंद घालशीला. धर्माचे पारडे वर हाय. गंमत बघतया. कर्माचे पारडे घाली हाय. खेळ करतया. आपली जागा शेवटी साडेतीन हात हाय.
पाची बोटांनी मनुष्यानी धर्म करावा. उंदराला भिशीला; पण वाघाला भिणार नाहीसा. (ज्या गोष्टी करायला घाबरणे आवश्यक आहे म्हणजे पापकर्म करतांना घाबरणे आवश्यक असतांना मनुष्य घाबरत नाहीये, तर पुण्यकर्म करतांना घाबरणे आवश्यक नसतांना ते करतांना घाबरत आहे; म्हणजे चांगली कृती करणे टाळत आहे.) चैत्राच्या महिन्यात गायी माळाला जातीला. एक रुपया गाडीच्या चकराऐवढी होईल. च्या च्या म्या म्या करशीला (‘प्रारंभी काळात चहा नव्हता, नंतर तो प्रतिष्ठित लोकांकडे होता आणि तो सर्वसामान्यांकडेही आहे. यावरून चहा आता सर्वमान्य झाला आहे आणि सर्वसामान्यांना चहाची चटक लागली आहे !’ – संकलक), कालवलं कालवलं दुनिया कालवलं.
१३. राजकारणात भगवा झेंडा डौलात मिरवल !
दागिनं पैसे मनुष्याला घातक ठरतील. घरातून बाहेर गेलेला मनुष्य परत येईल; म्हणून आशा धरू नका. तांबे लोखंड मोलाने विकल. सोनं रूपे काही वर्षांन पुकाचं होईल. चांदीचा भाव वाढत राहील, राजकारणात मोठा सट्टाबाजार मांडल. राजकीय नेते पैसासंपत्ती गोळा करतील. देशाचा बाजार मांडतील. राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील, कोलांट्या उड्या मारतील. तोंडघशी पडतील. राजकारणात स्त्रीवर्ग सक्रीय राहील. राजकारणात भगवा झेंडा डौलात मिरवल. इतर पक्ष चिंतेत राहतील.
१४. गोरगरिबांना जगणं मुश्कील होईल ।
नोकर वर्ग समाज खाईल. पैसा न खाणारा माणूस सापडणार नाही. १२ ही महिने लग्न कार्य चालतील. काँग्रेस पक्षाचे दोन पक्ष पडून झंजावात लागेल. पंचलोक दोन्हीकडील लाच खाऊन भांडण लावतील. पैशांच्या जिवावर मनुष्याला न्याय मिळणार नाही. खर्याच खोट, खोट्याच खरं. महागाईचा भस्मासूर सुटेल. गोरगरिबांना जगणं मुश्किल होईल.
१५. चीन राष्ट्र भारतावर हल्ला करेल ।
चीनराष्ट्र भारतावर हल्ला करेल, गुंडांच राज्य चालल. अतिरेकी लोक येतील, मोठा घोटाळा करून जातील, बाँबस्फोट होतील. दिल्लीच्या गादीला धक्का बसल. दिल्ली शहराचे मोठे नुकसान होईल. शहराला लागून असलेले शहर खेड्याप्रमाण राहील. आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल. भारत-पाक बाँड्रीवर (सीमेवर) रण धुमलं. आया-बहिणींची दिवसा अब्रू लुटतील. कानान ऐकशीला डोळ्यानं बघशिला.
१६. मुस्लिम राष्ट्रे जगाच्या नकाशातून पुसून जातील ।
मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होतील, जगाच्या नकाशातून पुसून जाईल. ऐका बाळांनो ऐका तान्ह्यांनो वादळ, भूकंपाने समुद्राची-देशाची उलथापालथ होईल. कृष्णेच्या काठी नऊ लाख बांगड्या फुटतील. रक्ताचे पाट वाहतील. रेल्वेमोटार यांचे मोठे ॲक्सिडंट होतील. दिवसाआड बातमी कानावर येईल.
उगावत पेटल. मावळत विझल (‘युद्धाची ठिणगी सर्वसाधारणपणे पूर्व दिशेला पडेल आणि ते पश्चिम दिशेपर्यंत येऊन विझेल म्हणजेच सारे जग यात ओढले जाईल.’ – संकलक), आलम दुनियेत चौथाई कोना ओसाड पडल (‘यापुढील काळ इतका भयानक असेल की, जगाच्या एक चतुर्थांश भागातील लोकसंख्या नष्ट होईल.’ – संकलक) मोठ लोक दारात बसतील. कामगार लोक घरात दडून बसतील. संप हरताळाची पाळी देशावर येईल. दुनिया पेटल. काळरात्र येईल. (‘पुढचा काळ इतका भयानक असेल की, प्रत्येक दिवस काळरात्र असल्यासारखे वाटेल. वीज गेल्यामुळे हिल्लाळ हा मशालीचा प्रकार पेटवावा लागेल.’ – संकलक)
जंगलातले प्राणीपक्षी गावात येतील. धुमाकुळ घालतील. गावातला मनुष्य भयभीत होईल. बैलाची किंमत बकर्याला येईल. बकर्याची किंमत कोंबड्याला येईल. कोंबडा मनुष्याच्या पाठी लागल. त्याच दात पाडल.
१७. ३४ वर्षांचं म्हातारपण येईल ।
बारा वर्षाचं बालपण खेळत राहील. चोवीस वर्षांचं तरुणपण काबाडकष्ट करील. ३४ वर्षांचं म्हातारपण (‘सध्या मनुष्याची जीवनशैली पालटली आहे. पूर्वी लोक १०० वर्षर्े जगत. आता व्यायाम न करणे, फास्टफूड खाणे, व्यसनाधीनता यांमुळे शरीर पूर्वीसारखे टिकत नसून मनुष्य १०० व्या वर्षी म्हातारा न होता ३४ व्या वर्षीच म्हातारा होत आहे.’ – संकलक) मनुष्याला बुद्धी अधिक आयुष्य कमी राहील. ऐका पुरषाला सात बायका होतील. पुरुष झाडाच्या शेंड्यावर चढून बसतील. बायको नवर्याला थोबाडीत मारील. नदीचा माळ आणि माळीची नदी होईल. नदीबाईला कुलप पडतील. नावबाईजवळ सतपण हाय. स्मगलर लोकांची मोठ्या हत्या होईल. समुद्राची संपत्ती नाश पावेल. हिजडे नाचतील.
ऐका बाळांनो-ऐका तान्ह्यांनो, जग दुनियेत एक मोठ नवाल होईल. भावाबहिणींच सख्या प्रेमप्रकरण चालंल. भाऊ-बहिणीच्या नात्याला कलंक लागंल. काळीमा फासल. भावाला बहीण ओळखना झालीया. सासर्याला सून ओळखना. जगात धर्म बुडून गेलायं. सत्य फासावर चढलया. शेषाच्या फणीवर धरतरी उळमळू लागलीया. दिवसेंदिवस पाप वाढत चाललया. ऋषी-मुनीला कोडं पडलया. इंद्रसभा देवांचा धावा करील. सूर्यचंद्र काही दिवसांत एकत्र येतील. टक्कर होईल. पृथ्वी गडप होईल. पृथ्वीचा करार संपत आलाय (पृथ्वीचा विनाशकाळ जवळ आला आहे.) एक तारणार – कळप मारणार (‘विविध संस्था, राजकीय पक्ष, तसेच संघटना यांत सर्वजण वाईट असले आणि एक जरी चांगला असला, तरी त्यातील चांगल्या एकाला मी तारेन.’ – संकलक) कळप तारणार कळपातला एक हुडकून मारणार. (ज्या ज्या संस्था, राजकीय पक्ष, तसेच संघटना यांत सर्वजण चांगले असतील आणि एक जरी वाईट असला, तरी त्यातील एका वाईट मनुष्याला मी शोधून काढून ठार मारेन. श्रीकृष्णाने गीतेत जे वचन दिले की, ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’, त्याचप्रकारे देवाचे हे वचन आहे.’ – संकलक) ज्याच्या अंगी भक्ती तो चार दिवस सुखाच खाईल.
१८. शेतीसाठी देशात खून पडतील ।
कोकणातला बसवा सरहतीवर येईल. देशातला बसवा सरहदीवर त्याची टक्कर लागल. शिरांचा चेंडू असुडाच्या धारा. कागदी घोडा मनुष्याला खुळ लावल. (नोटाबंदीनंतर लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आणि लोकांना वेड लागल्यासारखी स्थिती निर्माण झाली.) दात पाडल. उपराटा फसा जाईल. सवचा फसा येईल. घरातील लक्ष्मी दडून बसलीया. दारातली लक्ष्मी पळून खेळतीया. (हे शेतीच्या संदर्भात आहे. एखाद्या वर्षी एखाद्या शेतात चांगले पिक येते, तर दुसर्या वर्षी ‘तसे पिक येईलच’, असे नाही. म्हणजे शेती कायमस्वरूपी चांगलीच असेल असे नाही, एखाद्या वर्षी लाभ, तर एखाद्या वर्षी तोटा असे असेल.)
शेतीसाठी देशात खून पाडतील. काळी कांडी (शेती) पोटाशी धरावी. जतन करावी. बारा बाजार मोडून एक बाजार भरल. बारा बाजार फिरून एक बसवा मिळल. १२ बैलाचा तिवडी शेवलाय. मदनातला बैल उरफाटा फिरालाय. एक औत चौघात होईल. (‘भूमीची मशागत करण्यासाठीचे एक अवजार म्हणजे औत (नांगर) होय. हे औत पूर्वी जवळपास प्रत्येक शेतकर्याकडे होते. आता यांत्रिक शेती होत असल्याने अनेकांकडे औत नाहीत.’ – संकलक) कुणब्याच्या बाळाला विचार पडलाय. (पिकांना भाव न मिळणे, बैल उपलब्ध न होणे, सतत पालटणारे हवामान, तसेच अन्य अनेक गोष्टींमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे.) बसवा राजाची तुम्ही सेवा करावी. बसव्याच शिंगाट सोन्याचं होईल. (बैलांची संख्या अल्प होऊन बैल सोन्यासारखे दुर्मिळ झाले आहेत आणि महागही झाले आहेत.)
जग दुनियेत तीन राजे आहेत. पहिला मेघराजा, दोनवा बसवराजा, तिनवा कुनबीराजा (शेतकरी) राजा. कुनब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद आहे. मेघराजाची तुम्ही वाट बघत रहाशीला. उन्हाळ्याचा पावसाळा आणि पावसाळ्याचा उन्हाळा होईल. धर्माचा पाऊस, कर्माचे पीक हाय. पावसाअभावी पेरणी पाण्याचे ऋतुमान बदलत राहील.
१९. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करा !
कोेल्हापूरच्या देवीला संकट पडलया, रात्री बाराच्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी पडतय. (‘लोकांकडून होणारे पापकर्म, सद्य परिस्थिती, दुराचार, अनाचार यांमुळे श्री महालक्ष्मीदेवीलाही वाईट वाटत असून तिच्या डोळ्यांतून अश्रू येत आहेत.’ – संकलक) परमेश्वर तिचा निवाडा करल. खडकाच्या माळाला. धडका मारशीला. काळ्या खडकाच्या लाह्या उडतील. (‘आताच्या परिस्थितीत या स्थानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. यापुढील काळात कदाचित् मनुष्यांच्या चुकीच्या वागण्यामुळे देव इथून निघून जाईल आणि मग या खडकावर डोके आपटून घेण्याविना कोणताच पर्याय मनुष्यासमोर नसेल.’ यातील दुसरा अर्थ असा की कदाचित् संकटावर संकटे इतकी येतील की, मनुष्याला सतत त्या खडकावर डोके आपटून घ्यावे लागेल ! – संकलक)
कोल्हापूरच्या गादीवर हिल्लाळ पेटतील. सातार्याच्या गादीवर फूलं पडतील. (हे भविष्य जुन्या काळातील म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गाद्यांमध्ये वाद निर्माण झाले. त्या वेळी सातारा येथील गादी अधिकृत घोषित होईल; म्हणजेच त्या गादीवर फुले पडतील’, असे देवाला सांगायचे आहे. – संकलक) वीजबाईचा मोठा कल्लाट होईल. वीजबाईमुळे मोठ नुकसान होईल. डोंगर पर्वत वाफेन जातील. डोंगराचा भोंगर होईल. शिवाजी महाराजांचा तुम्ही जयजयकार करा ! शिवाजी महाराज कुणाच्या तरी पोटी जन्माला येतील.
२०. भगवा झेंडा राज्य करेल ।
भगवा झेंडा राज्य करील. सभेत मिरवल. थराचा धोंडा थराला बसल. तिरंगा झेंडा भंगला जाईल. (‘याचे दोन अर्थ होऊ शकतात. १. काँग्रेसचा तिरंगा झेंडा भंग होईल; म्हणजे काँग्रेस पक्षाची सत्ता जाईल. काँग्रेस पक्ष संपून जाईल. २. डावी विचारसरणी, डाव्यांचे प्राबल्य, विचारसरणी संपून जाईल; म्हणजेच निधर्मी विचारसरणी लयाला जाईल. ज्याप्रकारे भिंत बांधतांना ती योग्य त्या थरासहित बसते म्हणजे वीट त्यानंतर सिमेंट असे, त्याचप्रकारे देशावर योग्य जागी योग्य माणूस येईल.’ – संकलक) वस्त्रोद्योग मोठ्या अडचणीत येईल. सुताचा दलाल दिवाळ काढल.
नवखंड पृथ्वी दहावा खंड काशी, दहाव्या काशीत माझ दफ्तर हाय. करवीर काशीत माझा ठिकाणा हाय. (नऊ खंड एका बाजूला असून दहावा खंड काशी एका बाजूला आहे. त्या काशीत माझा विद्याभ्यास झाला. त्याचप्रकारे कोल्हापूर विभागात माझे वास्तव्य आहे.) वाडी कुर्लीच्या बाळांनो एकीन वागाव सांगत आलोय.
२१. तुमच दु:ख माझ्या पायाशी घेईन ।
थोबाडीत खाशीला. (माझ्याजवळ येतांना शुर्चिभूत मनाने म्हणजे पवित्र मनाने यायला हवे. तुम्ही अपवित्र मनाने माझ्याजवळ याल, तर शासन केले जाईल.) मुंबईत हायकोर्ट हाय. निवाडा करायला. इकाचा पेला खैराचा इंगोळ लई वाईट. बोराटीचा काटा तुमच दु:ख माझ्या पायाशी घेईन. माझ्या झोळीतील रिद्धी-सिद्धी देईन. चालवून दाखवीन. गर्वाने वागू नये. गर्वान वागशीला तर फसून जाशीला. गर्वाच घर खाली हाय. मी थोरला तू थोरला म्हणू नका. लहानाचा मोठा मोठ्याचा लहान होईल. पांढरीची राखण करीन. छाया धरीन ! जतन करीन (आप्पाचीवाडी-कुर्ली या ठिकाणी श्री राजगिरी महाराजांची समाधी आहे. ती समाधी ११ व्या शतकातील आहे. या ठिकाणी १६/१७ व्या शतकात जेव्हा नाथ आले, तेव्हा त्यांनी राजगिरी महाराजांशी सूक्ष्मातून संवाद साधला. नाथांनी ‘मला समाधीसाठी ही जागा योग्य वाटत आहे. तरी चालेल का ?’ असे राजगिरी महाराजांना सूक्ष्मातून विचारले. तेव्हा राजगिरी महाराजांनी त्यांना अनुमती दिली; मात्र या पंचक्रोशी, इथली जनता-रयत म्हणजेच कुर्ली परिसरातील भक्तांचे रक्षण करण्याचे वचन घेतले. त्यामुळे प्रत्येक भाकणुकीत देव ‘पांढरीची राखण करीन’, असे सांगतात.) कांबळ्याचा शेवट घालीन. गावातली इडा-पिडा दूर करीन, गावात रिद्धी-सिद्धी नांदवीन. १२ बलुतेदार सुखी ठेवीन. आज वर्षाचा दिवस बाळगोपाळांना आनंदाचा दावीन.