मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर कुडाळ सेवाकेंद्रात वास्तव्याला असतांना देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील श्री. सुरेश सावंत (वय ७० वर्षे) यांनी अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अपार कृपा !
१. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यावर गुरुकृपेने उपनेत्र न लावताही दोन्ही डोळ्यांनी दिसणे
‘१५.४ ते ६.६.२०२१ या कालावधीत मला दोन्ही डोळ्यांच्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनिमित्त कुडाळ सेवाकेंद्रात रहाण्याची संधी मिळाली. या दोन्ही शस्त्रक्रिया आधुनिक वैद्य संजय सामंत यांनी केली. त्यानंतर उपनेत्र न लावताही मला दोन्ही डोळ्यांनी जवळचे आणि लांबचे दिसू लागले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मला लाभलेली ही अपार कृपा आहे. मी सद्गुरु सत्यवान कदम यांना म्हणालो, ‘‘मला उपनेत्र न लावता जवळचे आणि लांबचे स्पष्ट दिसत आहे.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुमच्यासाठी देवाने दिलेली ही मोठी अनुभूती आहे.’’
२. दळणवळण बंदीमुळे प्रवास करणे अशक्य असल्यामुळे कुडाळ सेवाकेंद्रात रहावे लागणे
त्या वेळी मला गोवा येथे घर विकत घेण्यासाठी लागणार्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जायचे होते; परंतु कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आम्हाला बाहेर जाता येत नव्हते. मी वयस्कर असल्याने (वय ७० वर्षे) पनवेल येथील देवद आश्रमात जाण्यासाठी प्रवास करणेही धोकादायक होते. त्यामुळे मला कुडाळ सेवाकेंद्रात रहावे लागले.
३. ‘आम्लपित्ताचा तीव्र त्रास होत असल्याने कुडाळ सेवाकेंद्रात राहून सेवा करणे जमणार नाही’, असा नकारात्मक विचार येणे
मागील दीड वर्षापासून मला आम्लपित्ताचा तीव्र त्रास होत होता. माझे जेवण झाल्यावर साधारण एक घंट्याने मला अपचन होऊन खाल्लेले अन्न उलटी होऊन बाहेर पडत असे. पित्ताच्या त्रासामुळे मला सतत चक्कर यायची. माझा तोल जाऊन मी कोठेही पडत असे. त्यामुळे माझ्या मनात ‘मी अशा स्थितीत सेवाकेंद्रात कसा रहाणार ? मला तिथे सेवा करायला जमणार नाही’, असे नकारात्मक विचार येत असत.
४. स्वच्छतेची सेवा करतांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले समवेत आहेत’, असे जाणवणे आणि घामाच्या रूपाने शरिरातील विषारी द्रव्ये बाहेर पडल्याने हलकेपणा जाणवून देह चैतन्याने भारित होणे
एकदा मला जिन्याची स्वच्छता करायची होती. मला चक्कर येत असल्याने माझ्या मनात ‘ही सेवा कशी करायची ?’, असा नकारात्मक विचार आला. त्या दिवशी मी सेवाकेंद्रातील पहिल्या माळ्यावरील श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभे राहून आत्मनिवेदन केले. त्या वेळी श्रीकृष्णाने सांगितले, ‘तुला मिळालेली सेवा करून पहा.’ भगवंताने सांगितल्याप्रमाणे मी स्वच्छता चालू केली. आश्चर्य म्हणजे ‘आगाशीपासून तळमाळ्यापर्यंत संपूर्ण जिन्याची स्वच्छता (केर काढणे आणि ‘मॉब’ने पुसणे) केव्हा आणि कशी झाली ?’, हे मला कळलेही नाही. मी श्रीकृष्णाच्या प्रतिमेपाशी जाऊन कृतज्ञता व्यक्त केली, ‘हे भगवंता, माझ्या सध्याच्या स्थितीत मी ही शारीरिक सेवा करणे अशक्य होते. तूच सगळे केलेस. तूच मला शक्ती आणि चैतन्य प्रदान केलेस.
आज मला फार आनंद झाला आहे. भगवंता, ‘हा आनंद कसा व्यक्त करू ?’, हे मला कळत नाही.’ त्यानंतर मी जिना, मार्गिका आणि आगाशी यांची नियमितपणे स्वच्छता करू लागलो. त्या वेळी ‘परात्पर गुरुमाऊली माझ्या समवेत आहे’, असे मला जाणवत असे. या सेवा करतांना मी घामाघूम होत असलो, तरी घामाच्या रूपाने माझ्या शरिरातील विषारी द्रव्ये बाहेर पडल्याने मला हलकेपणा जाणवत असे आणि देह चैतन्याने भारित होत असे.
५. एरव्ही पथ्याचे जेवण घेत असतांना कुडाळ सेवाकेंद्रात असतांना सर्वांसाठी बनवत असलेले जेवण घेऊनही श्री गुरूंच्या कृपेने कसलाही त्रास न होणे आणि प्रकृतीत सुधारणा होणे
सेवाकेंद्रात सगळ्यांचे जेवण आणि अल्पाहार बनवणारी एकच साधिका आहे. त्यांना माझ्या एकट्यासाठी पथ्याचे जेवण बनवावे लागे. ‘त्या साधिकेला माझ्यामुळे त्रास होत आहे’, असे वाटून मला अपराधी वाटत असे. एकदा मी भगवान श्रीकृष्णाच्या चित्रासमोर उभा राहून माझी जेवणाविषयी असलेली अडचण कळकळीने सांगितली. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले, ‘आजपासून तू सर्वांसाठी बनवत असलेला प्रसाद आणि महाप्रसाद घेत जा.’ मी त्याप्रमाणे केल्यावर मला सर्व प्रकारचे अन्न पचू लागले. माझ्याकडून त्याबद्दल भगवंताच्या चरणी पदोपदी कृतज्ञता व्यक्त होत असे. आम्लपित्ताच्या त्रासामुळे गेल्या वर्षभरात माझे वजन ६१ किलोवरून ४९ किलो झाले होते. त्यामुळे मला प्रचंड थकवा आणि निरुत्साह जाणवत असे. मी सेवाकेंद्रात रहायला आल्यापासून मला अन्नपचन होऊ लागले आणि माझे वजनही पूर्ववत् झाले. ‘हे केवळ आणि केवळ श्री गुरूंच्या कृपेमुळेच होत आहे’, याची मला सतत जाणीव होत असे.’
– श्री. सुरेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२५.११.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |