प.पू. दास महाराज यांच्या नावातील ‘दास’ या शब्दातून ईश्वराने सुचवलेली सूत्रे

प.पू. दास महाराज

१. दास झाल्यावर ईश्वराचा सहवास मिळत असणे 

‘प.पू. दास महाराज यांच्या नावातील ‘दास’ या शब्दातून मला पुढील शब्द सुचत गेले – ‘दास, वास, उपवास आणि ध्यास.’ त्यानंतर पुन्हा ‘दास, साद आणि प्रतिसाद’, अशा पद्धतीने मी या शब्दजालात घुटमळत राहिलो. नंतर या शब्दकोड्याचे उत्तर देवाने मला पुढीलप्रमाणे सांगितले, ‘दास झाल्याविना ईश्वराला साद घालता येत नाही आणि दास झाल्याविना ईश्वराकडून त्या सादेला प्रतिसादही मिळत नाही. पुढे साद आणि प्रतिसादातून ईश्वराचा वास, म्हणजे सहवास कधी स्थुलातून, तर कधी सूक्ष्मातून लाभतो.’

२. ध्यास, दास आणि उपवास या  प्रक्रियेतून शेवटी ईश्वराचा साक्षात्कार होणे

पुढे उपवास घडतो. उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे रहाणे. त्यामुळे ईश्वराच्या जवळ जाण्याची प्रक्रिया ईश्वरीकृपेनेच अल्पाधिक प्रमाणात चालू होते. त्यातून पुढे ईश्वराचा ध्यास लागतो आणि मग ईश्वराच्या कृपेनेच ‘नराचा नारायण होणे’, या म्हणीचासुद्धा प्रत्यय येतो. त्याला साक्षात्कार होतो आणि ही आध्यात्मिक प्रक्रिया पूर्ण होते. प.पू. दास महाराज यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त १९ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ पर्यंतच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रकाशित झालेली लेखमाला वाचली आणि तसा ध्यास, दास अन् उपवास या प्रक्रियेतून जाण्याचा प्रत्येकाने मनापासून प्रयत्न केला, तर हिंदु राष्ट्र (ईश्वरी राज्य) अपेक्षेपेक्षाही अधिक लवकर येईल’, असे मला वाटते.’

– श्री. दत्तात्रेय पटवर्धन, सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. (२८.१२.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक