ठाणे येथे रिक्शाचालकाने तरुणीची छेड काढली !
विरोध केल्यावर तरुणीला फरफटत नेले
ठाणे, १४ ऑक्टोबर (वार्ता.) – येथील रेल्वे स्थानकाच्या परिसरात १४ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७ वाजताच्या सुमारास रिक्शाचालकाने एका तरुणीला फरफटत घेऊन गेल्याचे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले होते. याची नोंद घेऊन ठाणे नगर पोलिसांनी अज्ञात रिक्शाचालकाच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत.
पीडित तरुणी तिच्या कामानिमित्त जात असतांना त्या ठिकाणी एक रिक्शाचालक आला. त्याने तरुणीला खुणा करत छेड काढली. तरुणीने विरोध केला असता या रिक्शाचालकाने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र तरुणीने त्याला पळण्यापासून रोखले. तरुणीने त्याच्या कॉलरला धरून बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने रिक्शा चालू करून या तरुणीला फरफटत नेले. काही अंतर फरफटत गेल्यानंतर ही तरुणी गंभीररीत्या घायाळ होऊन खाली पडली.