रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेसाठी आलेल्या साधकाला सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे
१. निर्जीव वस्तूंकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१ अ. ‘सर्वांच्या समवेत मिळून-मिसळून रहाणार्या अन् एकमेकांना न्यून न लेखणार्या साधकांना सेवेची संधी लवकर मिळू शकते’, हे चहाच्या पेल्यांच्या माध्यमातून जाणवणे : ‘भोजनकक्षाची सिद्धता करत असतांना मी चहाचे पेले एकत्र करत होतो. सर्व पेले एकसारखे दिसतात; मात्र काही पेले मोठे, तर काही पेले छोटे आहेत. प्रथम मी एकसारखे पेले एकत्र करत असे; कारण ते सहजपणे एकात एक ठेवता येतात. या कृतीतून ‘मोकळेपणाने आणि मिळून-मिसळून रहाणार्या अन् एकमेकांना न्यून न लेखणार्या साधकांना ईश्वर या एकसमान पेल्यांप्रमाणे लवकर एकत्र करतो’, हे लक्षात आले. ‘ज्या साधकात अहं अधिक आहे’, तो सर्वांच्या समवेत असला, तरी एकाकी रहातो. त्याचप्रमाणे ‘मला काही जमत नाही’, असा न्यूनगंड असणारा साधक कुणाच्या तरी मागे झाकला जातो. त्यामुळे एकसमान पेल्यांची ती चवड पूर्ण संपल्यावरच लहान पेल्यांचा वापर होतो. त्याचप्रमाणे साधनेमध्ये न्यूनगंड असणार्या साधकाला सेवेची संधी सर्वांत शेवटी दिली जाते. ‘सर्वांत मिळून-मिसळून राहिल्याने आपल्याला नियमित सेवेची संधी मिळेल’, हे शिकायला मिळाले.
१ आ. ‘निर्जीव वस्तू ईश्वराने दिलेली परिस्थिती स्वीकारतात, त्याप्रमाणे समोर येणारी परिस्थिती स्वीकारता आली पाहिजे’, असे पंख्याकडून शिकायला मिळणे : परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवास करत असलेली खोलीत नामजपाला बसलो होतो. समोर असणार्या पंख्याचा वारा मला लागावा; म्हणून मी त्याचे तोंड माझ्याकडे फिरवले. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘पंखा आपण हालवू, तशी गुरुसेवा करतो. आपल्याला पंख्याची जी गती हवी आहे, ती कळ दाबली की, तो त्या गतीने फिरायला लागतो. पंख्याकडे ‘स्वेच्छा’ असा प्रकारच नाही. आमच्या संदर्भात भगवंताने थोडे अधिक प्रसंग निर्माण केले, तरी आम्हाला लगेच प्रतिक्रिया येतात आणि मनाचा संघर्ष होतो. त्या पंख्याप्रमाणे देव माझ्यासाठी जी कळ दाबेल, त्या गतीने मला धावता आले पाहिजे. म्हणजे ‘देव जे प्रसंग निर्माण करील, ते स्वीकारता आले पाहिजेत आणि ईश्वरेच्छेने वागता आले पाहिजे’, हे शिकायला मिळाले.
२. परात्पर गुरुदेवांनी दिलेल्या विचारांतून शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. ‘इतरांशी मिळून-मिसळून वागण्यासाठी परेच्छेने वागावे आणि सतत शिकण्याच्या स्थितीत रहावे’, असे परात्पर गुरुदेवांनी शिकवल्याचे जाणवणे : ‘भोजनकक्ष आवरणे’ या सेवेत आम्ही ४ साधक होतो. आम्ही सगळे एकत्र सेवा करायचो; परंतु एका दादांचे आमच्यात मिसळणे आणि बोलणेही अल्प असे. सेवा करतांना आमच्यातील स्वभावदोषांमुळे आमच्या प्रकृतींचा संघर्ष होत असे. मी गुरुमाऊलीला प्रार्थना केली, ‘गुरुमाऊली, आम्ही आनंद मिळवण्यासाठी आश्रमात आलो आहोत. येथे आमच्याकडून सर्व विपरित घडत आहे. आमच्या समवेतच्या दादांनाही आनंद मिळायला हवा. ‘त्यासाठी कसे करू ?’ ते तुम्हीच मला सुचवा.’ यावर आतून परात्पर गुरुदेवांचा आवाज माझ्या कानी आला, ‘अरे, राजकारणात स्पर्धा असते. आपण राजकारणी आहोत का ? परेच्छेने वागायला शिक. शिकवायचे सोड आणि शिकायला आरंभ कर. तू त्यांच्याशी आपणहून बोल आणि त्यांच्याकडून सेवा शिकून घे. मग बघ, सर्वांनाच आनंद मिळेल.’ हे लिखाण लिहितांनाही परात्पर गुरुदेव मला असे सांगत असल्याचे मला ऐकू आले.
२ आ. ‘साधनेत माघार घेणार्याचे अहं निर्मूलन होऊन आनंदाची प्राप्ती होईल आणि साधनेत प्रगतीही होईल’, असे जाणवणे : मी त्याच क्षणापासून प्रत्येक सेवा त्या दादांना विचारून करायला आरंभ केला. सहसाधकांनीही त्यांना विचारून सेवा करायला आरंभ केल्यामुळे आमच्या प्रकृतींमुळे त्यांचा होणारा संघर्ष संपला आणि आम्हालाही शिकता आले. सर्वांना आनंद मिळू लागला. ‘साधनेत स्पर्धा नकोच. माघार घेईल, त्याला आनंद मिळेल आणि त्यातून अहं निर्मूलन होऊन प्रगतीमध्ये येणारा अडथळा दूर होईल’, असे शिकायला मिळाले.
३. परात्पर गुरुदेवांच्या कृपाछत्राखाली राहिल्यास पालट होण्याची निश्चिती वाटणे
एकदा मी महाप्रसाद घेतल्यानंतर भोजनकक्षाच्या बाहेर बसलो होतो. त्या वेळी तेथील ‘वरच्या माळ्यापर्यंतची लादी गुळगुळीत आणि आरशाप्रमाणे आहे, तर बाहेरील लादी खरबरीत आहे’, असे मला दिसले. या प्रसंगात ‘परात्पर गुरुदेवांचे कृपाछत्र असेल, तर निर्जीव दगडात पालट होतो, तर आमच्यात का होणार नाही ? आमच्यातही निश्चित पालट होणार आहे. त्यांच्या कृपाछत्राखाली राहून ते सांगतील, त्याचे आम्ही नियमितपणे आज्ञापालन केल्यास पालट होणारच आहे’, हे शिकायला मिळाले.’