भक्तीसत्संगाच्या माध्यमातून श्री गुरूंना अपेक्षित भावपूर्ण आणि परिपूर्ण सेवा करून त्यांचे मन जिंकणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !
भक्तीसत्संग हा साधकांच्या जीवनातील एक अविभाज्य घटक बनलेला आहे. साक्षात् महाविष्णुस्वरूप परात्पर गुरुदेव यांच्या आंतरिक प्रेरणेने आणि त्यांच्याच कृपाशीर्वादाने हे सत्संग होत आहेत. भक्तीसत्संगाच्या माध्यमातून त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
‘ही सूत्रे केवळ शिकायला मिळालेली सूत्रे नव्हेत, तर ‘छोट्या छोट्या गोष्टींमधून आणि वागण्या-बोलण्यातून आपण प्रत्येक क्षणी साधना म्हणून कसे जगू शकतो ?’, याचा भावपूर्ण परिपाठ आहे. ‘साधकांनी ही सूत्रे वाचून स्वतःही तसा प्रयत्न केला, तर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि परात्पर गुरुदेव यांना अधिक आनंद होईल’, असे वाटते.’
– कु. वैष्णवी वेसणेकर (आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.९.२०२१) |
१. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ घेत असलेला भक्तीसत्संग म्हणजे साधकांसाठी श्रद्धामय संजीवनीच !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ मराठी आणि हिंदी या भाषांतील भक्तीसत्संग घेण्यासाठी आठवड्यातील ४ घंटे वेळ देतात. भक्तीसत्संग ही आम्हा साधकांसाठी श्रद्धामय संजीवनीच आहे. भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधकांना अधिकाधिक आनंद देण्याचा अन् त्यांच्यातील श्रद्धा आणि भक्तीभाव जागृत करून तो वाढवण्याचा ध्यास श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना लागलेला असतो.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
२ अ. सत्संगाशी एकरूप झालेल्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ ! : आपण एखादी महत्त्वाची सेवा करतांनाही आपले मन कित्येकदा इकडे-तिकडे भटकत असते; पण श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ सत्संगाशी आणि त्यातील सूत्रांशी पूर्णपणे एकरूप होतात. सत्संगात बोलतांना त्यांचे शब्द जराही इकडे-तिकडे होत नाहीत.
२ आ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची अहंशून्यता ! : भक्तीसत्संग झाल्यावर प्रत्येक वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आम्हाला आवर्जून विचारतात, ‘‘सत्संगात बोलतांना माझे काही चुकले का ? आणखी काही सुधारणा अपेक्षित आहे का ? साधकांनी सत्संगाविषयी काही त्रुटी अथवा सुधारणा सांगितल्या का ?’’
२ इ. विचारून करण्याची वृत्ती आणि चिकाटी : अध्यात्मात मोठा अधिकार असूनही श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील विचारून करण्याची वृत्ती, तसेच त्या प्रयत्नांमध्ये त्यांची असलेली चिकाटी, यांचा विचार केला, तर त्यांच्यापुढे आपले स्वतःला पालटण्यासाठीचे प्रयत्न अत्यंत क्षुल्लकच म्हणावे लागतील; कारण आपण कोणताही प्रयत्न करायला लागलो, तरी आपल्यामध्ये तो अखंडपणे करण्याची चिकाटी नसते. प्रत्येक सत्संगानंतर त्याविषयी विचारण्याच्या त्यांच्या या कृतीतून त्यांची चिकाटी दिसून येते.
२ ई. शिकण्याची वृत्ती : भक्तीसत्संगातील कथांमधील काही शब्द कठीण अथवा नवीन असतात. कधी कधी काही संस्कृत शब्द अथवा वाक्येही असतात. सत्संगापूर्वी ‘त्या शब्दांचा उच्चार कसा करायचा ?’, हे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आधीच विचारतात. यातून त्यांची प्रत्येक शब्दोच्चार योग्य करण्याची धडपड आणि शिकण्याची वृत्ती लक्षात येते.
२ उ. कर्तेपण गुरुचरणी अर्पण करणे : साधकांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या सत्संगाचे कौतुक केले, तर त्या सहजतेने कर्तेपण गुरूंना अर्पण करतात. त्या म्हणतात, ‘‘गुरूंच्या संकल्पामुळेच सर्व होत आहे. सर्वकाही गुरूंचेच आहे. तुमची लेखणी आणि माझी वाणी यांतून गुरुतत्त्वच कार्यरत होते.’’
२ ऊ. सत्संगातील सूत्रांमध्ये पालट करण्यापूर्वी साधिकांना विचारणे : सत्संगाविषयीची सूत्रे काढून श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना दिल्यावर त्या प्रथम त्याविषयी कौतुकच करतात; पण त्या सूत्रांमध्ये काही पालट करायचा असेल, तर त्या मनानेच करत नाहीत. त्याआधी आमच्याशी बोलतात. ‘असा पालट केला, तर ठीक वाटेल का ? चालेल का ?’, असे त्या आम्हाला विचारतात आणि मगच तसा पालट करतात. खरेतर सत्संग घेणार्या त्याच आहेत. आम्ही केवळ सत्संगासाठी सूत्रे काढून देऊन त्यांना थोडेफार साहाय्य करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे त्यामध्ये त्या सत्संगाच्या सूत्रांमध्ये पालट करू शकतात, तरीही त्या आमच्याशी बोलल्याविना त्यात पालट करत नाहीत.
आपण एखादी सेवा करतांना त्यातील कितीतरी गोष्टी मनानेच करतो अथवा आपल्याला सोयीस्कर होण्यासाठी मनानेच त्यामध्ये पालट करत असतो आणि आपल्या मनाला याची जाणीवही नसते; परंतु (सौ.) सिंगबाळ यांच्या कृतीतून मनाला त्याची जाणीव होते.
२ ए. ‘केवळ स्पंदनांवरूनही सत्संगातील सूत्रे परिपूर्ण आहेत का ?’, हे ओळखणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ! : बर्याचदा सत्संगातील विषयाची पूर्ण सूत्रे वाचायला मिळाली नाही, तरी सत्संगाची सूत्रे लिहिलेल्या प्रतीच्या (प्रिंटच्या) स्पंदनांवरूनच त्यांना ‘तो विषय परिपूर्ण झाला आहे का कि त्यामध्ये आणखी काही हवे ?’, हे कळते. एकदा सत्संगाच्या विषयाची प्रत त्यांना दिल्यावर त्यांनी विचारले, ‘‘यातील शेवटच्या भागात काही राहिले आहे का ? स्पंदनांवरून ते थोडे जड वाटते. मी पूर्ण वाचले नाही. त्यामुळे तसे असेलच, असे नाही; पण ‘काही राहिले आहे का ?’, हे तू एकदा पहा.’’ त्यांनी तसे सांगितल्यावर जेव्हा मी पाहिले, तेव्हा खरेच तसे लक्षात आले आणि तेथे योग्य तो पालट करता आला.
२ ऐ. भक्तीसत्संगाच्या माध्यमातून साधकांपर्यंत नावीन्यपूर्ण सूत्रे पोचवण्याची तळमळ असणे : भक्तीसत्संगात तात्त्विक विषय घेण्यापेक्षा त्यांनी आम्हाला कथा आणि गीते यांवर अधिक भर देण्यास सांगितले. त्या म्हणतात, ‘‘जी सूत्रे व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगितली जातात, ती सूत्रे येथे न सांगता भक्तीसत्संगांतून वेगळे काय घेऊ शकतो ?’, असा विचार करा. पुराणातील अनेक कथांमधून पुष्कळ काही शिकण्यासारखे असते. त्या शोधल्यास त्यातून अनेक सूत्रे मिळतील. त्यामुळे त्या सूत्रांच्या माध्यमातून साधकांचा साधना करण्याचा आणि भावजागृतीचे प्रयत्न करण्याचा उत्साह वाढेल. या सत्संगातून साधकांना वेगळे काहीतरी शिकायला मिळायला हवे.’’
२ ओ. ‘सत्संग घेण्याची सेवा कशा प्रकारे केल्याने भावपूर्ण आणि परिपूर्ण होऊन गुरुदेवांच्या चरणी रूजू होते ?’, हे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी स्वतःच्या कृतीतून शिकवणे : श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची काहीच गुणवैशिष्ट्ये आम्ही टिपू शकलो; परंतु प्रत्यक्षात त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांचे वर्णन करणे अशक्यच आहे. ‘सत्संग घेणे म्हणजे केवळ सूत्रे काढून बोलणे नव्हे’, हे त्यांनी त्यांच्या या कृतींमधून आम्हाला शिकवले. ‘सत्संग घेण्याच्या सेवेअंतर्गत येणार्या प्रत्येक बारकाव्यामध्ये आपली साधना कशी होत असते ? गुरुदेवांना कोणती सेवा आवडते आणि ती सेवा कशा प्रकारे केल्याने भावपूर्ण आणि परिपूर्ण होऊन गुरुदेवांच्या चरणी रूजू होते ?’, हे त्यांनी स्वतःच्या कृतीतून अनुभवायला दिले. त्यांच्या याच दैवी गुणांमुळे त्यांनी गुरूंचे मन जिंकले आहे.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या संकल्पामुळे सत्संगासाठीची सूत्रे लगेच मिळणे
एखाद्या वेळी सत्संगात घेण्याच्या दृष्टीने त्या काही सुधारणा अथवा नवीन सूत्रे सांगतात आणि ‘शक्य झाले, तर हेही मिळते का ?’, पहा’, असे त्या म्हणतात. तेव्हा त्यांच्या बोलण्यातून जणू त्यांचा संकल्पच होतो आणि हातात अल्प वेळ असला, तरी लगेचच ती सूत्रे मिळून सत्संग आणखी चांगला होतो.
४. कृतज्ञता आणि प्रार्थना
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्यातील दैवी अवतारत्व साक्षात् परात्पर गुरुदेवांच्या कृपेनेच आम्हा साधकांना या भक्तीसत्संगाच्या माध्यमातून अनुभवायला मिळत आहे. ‘त्यांच्या दिव्यत्वाचे आणि त्यांच्या दैवी वाणीद्वारे होणार्या भावमय परिवर्तनाचे आम्ही सर्व जण साक्षीदार बनत आहोत.’ याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !
‘हे गुरुदेवा, ‘आम्हा सर्व साधकांना घडवण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या माध्यमातून आपणच प्रयत्नरत आहात’, याची जाणीव होऊन आम्हाला त्यांच्यातील गुणांचे अनुकरण करता येऊ दे आणि आम्हालाही त्यांच्याप्रमाणे आपल्याशी एकरूप होता येऊ दे’, अशी आपल्या चरणी भावपूर्ण प्रार्थना आहे.’
– कु. वैष्णवी वेसणेकर (आताची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.९.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |