नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असणारे प्रा. साईबाबा निर्दाेष !
मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय !
मुंबई – शहरी नक्षलवादी आणि देहली विद्यापिठाचे तत्कालीन प्राध्यापक जी. एन्. साईबाबा यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून निर्दाेष घोषित करण्यात आले. नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात सत्र न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. वर्ष २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठासमोर त्यांनी याला आव्हान देणारी याचिका केली होती. अपंगत्वामुळे चाकांच्या आसंदीचा वापर करणारे साईबाबा हे नागपूर मध्यवर्ती कारागृहात होते. न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडपिठाने हा निर्णय दिला. न्यायालयाने आरोपीची तात्काळ सुटका करण्याचा आदेश दिला आहे.
१. पोलीस अन्वेषणात अनेक चुका असून त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे, तसेच त्यांची अटक अवैध आहे, असा युक्तीवाद बचाव पक्षाच्या वतीने करण्यात आला, तर सरकारी पक्षाच्या युक्तीवादानुसार सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे सबळ असून गुन्हेगारांची शिक्षा कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
२. साईबाबा यांच्यासह जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील विद्यार्थी हेम मिश्रा यांच्यासह इतर काही आरोपींना गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती.
३. वर्ष २०१३ मध्ये दक्षिण गडचिरोली येथील नक्षलवाद्यांच्या नेत्या नर्मदाअक्का हिला भेटण्यासाठी आलेल्या काही जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्या अन्वेषणात साईबाबा यांचे नक्षलवाद्यांशी सबंध असल्यामुळे पुरावे प्राप्त झाले. त्यांच्या घराची झडती घेतली असता तेथे अनेक डिजिटल पुरावे सापडल्याचा दावा पोलिसांनी केला होता.
४. माओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपात साईबाबा यांना वर्ष २०१४ मध्ये अटक करण्यात आली होती. साईबाबा हे अपंग आहेत. सध्या ते नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. माओवाद्यांशी संबंध आणि देशविरोधी कारवाया करणे या आरोपांवरून वर्ष २०१७ मध्ये साईबाबा आणि अन्य ५ जणांना गडचिरोली सत्र न्यायालयाने दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. आरोपींतील एकाचा कोरोनाच्या कालावधीत मृत्यू झाला आहे.