आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला साक्षात् महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी साधकांसाठी साकारलेले श्रद्धाविश्व !
‘भाववृद्धी सत्संग’ ही साधकांसाठी गुरूंची अमूल्य देणगीच आहे; पण त्या अंतर्गत आरंभलेली ‘आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला’, म्हणजे साक्षात् महालक्ष्मीच्या म्हणजेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या तळमळीमुळे साधकांसाठी साकारलेले एक श्रद्धाविश्वच आहे. ‘या आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखलेची प्रेरणा साक्षात् महालक्ष्मीला (श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना) महाविष्णूच्या कृपेने कशी मिळाली ?’, याचे आता अवलोकन करूया.
१. ‘आपत्काळ हा साधनेसाठी समृद्धीकाळ कसा आहे ?’, हे साधकांच्या मनावर बिंबवण्यासाठी आपत्कालीन भाववृद्धी सत्संग चालू करूया’, असे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सांगणे
डिसेंबर २०२० मध्ये भाववृद्धी सत्संगातील विषयांच्या संदर्भात बोलतांना एकदा श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘आता आपत्काळ वाढत चालला आहे. त्यामुळे आपत्काळाविषयी आपण एखादा भाववृद्धी सत्संग घेऊया. त्या माध्यमातून आपत्कालीन स्थितीमध्येही साधकांची परात्पर गुरुदेवांवरील श्रद्धा दृढ होण्यास साहाय्य होईल. १ नको. ४ – ५ भाववृद्धी सत्संग घेऊया. त्या माध्यमातून ‘आपत्काळ हेसुद्धा ईश्वराचेच नियोजन कसे आहे ? आपत्काळ हा आपत्काळ नसून तोही साधनेसाठी समृद्धीकाळ कसा आहे ?’, हे साधकांच्या अंतर्मनावर बिंबवता येईल.’’ येथेच त्यांच्या माध्यमातून महालक्ष्मीचा संकल्प झाला.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या संकल्पामुळे १५ दिवसांतच आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला चालू होणे आणि तिच्या अंतर्गत साधकांना ३१ सत्संग लाभणे
आपत्काळ आणि त्यामध्ये निर्माण होणारी कठीण परिस्थिती यांविषयी आम्ही पूर्णपणे अज्ञानी असूनही त्यांनी अवघ्या आठवडाभरात आमच्याकडून त्याविषयीची रूपरेषा सिद्ध करून घेतली अन् १५ दिवसांतच गुरुकृपेने आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला आरंभही झाली. केवळ ४ – ५ नव्हे, तर डिसेंबर २०२० पासून सप्टेंबर २०२१ पर्यंत १० मास ही आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखला चालू राहिली. या आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखलेतील ३१ दिव्य भाववृद्धी सत्संग साधकांना लाभले.
३. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ दैवी वाणीने साधकांच्या अंतर्मनातील आपत्काळाविषयीची भीती, नकारात्मकता, ताण इत्यादी न्यून होणे आणि गुरुमाऊलीचे दिव्य प्रतिबिंब सर्वांच्या अंतरात अन् चराचरात उमटणे
या आपत्कालीन भाववृद्धी सत्संग शृंखलेने आणि श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या दैवी वाणीने साधकांच्या अंतर्मनाच्या कानाकोपर्यात असलेली आपत्काळाविषयीची भीती, नकारात्मकता, ताण, काळजी इत्यादी न्यून झाले आणि साधकांना आपत्काळापेक्षाही सामर्थ्यवान असलेल्या महाविष्णुस्वरूप गुरुमाऊलीचे दिव्य प्रतिबिंब आपल्या अंतरात अन् चराचरात दाखवले. ‘या शृंखलेच्या माध्यमातून एवढी मोठी लीला भगवंताने महालक्ष्मीच्या माध्यमातून कशी घडवली’, त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्याबद्दल जन्मोजन्मी अखंडपणे कृतज्ञता व्यक्त करत राहिलो, तरी त्यांचे ऋण फिटणार नाही. आम्हा सर्व साधकांपुढे ‘त्यांच्या श्री चरणी शरणागत होऊन त्यांच्या चरणी रहाणे’, हाच एक पर्याय आता राहिला आहे.
४. दिव्य सत्संगाने साधकांना भीषण आपत्काळातूनही तारणार्या आणि साधकांचा भावमय आध्यात्मिक प्रवास करवून घेऊन त्यांना गुरुचरणांपर्यंत पोचवणार्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ !
साधकांना आपत्काळातून तारण्यासाठी या भाववृद्धी सत्संगरूपी रथाचा लगाम गुरुदेवांनी साक्षात् महालक्ष्मीस्वरूप श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या हातात दिला आहे. या भाववृद्धी सत्संगरूपी रथात सनातनच्या सहस्रो साधकांना बसवून त्या आपल्या दिव्य सहवासाने साधकांना भीषण आपत्काळातूनही तारत आहेत आणि साधकांचा भावमय आध्यात्मिक प्रवास करून घेऊन त्यांना सुखरूपपणे गुरुचरणांपर्यंतही पोचवत आहेत. आम्हाला या घोर आपत्काळातून तारणार्या गुरूंच्या या कृपेला सनातनच्या आम्हा सहस्रो साधकांचा शिरसाष्टांग नमस्कार !’
– कु. वैष्णवी वेसणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) आणि कु. योगिता पालन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.९.२०२१)