भारतात आता ३ जी आणि ४ जी भ्रमणभाष संचांची निर्मिती होणार नाही !
नवी देहली – भ्रमणभाष संच उत्पादक आस्थापनांनी १० सहस्र रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे ३ जी आणि ४ जी इंटरनेटची सुविधा असलेल्या स्मार्टफोनचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता १० सहस्रांपेक्षा अधिक किमतीचे ५ जी स्मार्टफोनचे उत्पादन करणार आहेत. दूरसंचार विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स अन् माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने मोबाईल ऑपरेटर आणि स्मार्टफोन उत्पादक आस्थापनांसमवेत बैठक घेतली. या आस्थापनांना येत्या ३ मासांत ५ जी सेवेकडे वळण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या भारतात ७५ कोटी लोक भ्रमणभाषचा वापर करतात. त्यापैकी १० कोटी लोक ५ जी भ्रमणभाष वापरतात. त्याच वेळी ३५ कोटी लोक अजूनही ३ जी आणि ४ जी असलेले संच वापरतात.