हिंदूंनी कर्महिंदु बनण्यास प्रयत्न करणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती
हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशपूर्तीनिमित्त गांगकला (उत्तरप्रदेश) येथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम
वाराणसी (उत्तरप्रदेश) – आपण भाग्यवान आहोत की, आम्ही हिंदु धर्मात जन्म घेतला आहे; परंतु या जन्माचे सार्थक करण्यासाठी आपल्याला कर्मानेही हिंदु बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपण मेकॉलेपुत्र नाही, तर ऋषिपुत्र आहोत. सध्या धर्मशिक्षण देण्याची व्यवस्था नसल्याने हिंदु युवक पाश्चात्त्य विकृतीचे अंधानुकरण करत आहेत. हिंदूंनी धर्माचरण केल्याविना हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी धर्माचरण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशपूर्तीनिमित्त गांगकला, बडागाव येथील शिवपुरी वाटिकेच्या सभागृहामध्ये समितीचा वर्धापन समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी त्यांनी वरील मार्गदर्शन केले.
या वेळी समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी समितीच्या २० वर्षांच्या कार्याचा परिचय उपस्थितांना करून दिला. तसेच सनातन संस्थेचे श्री. गुरुराज प्रभु यांनी ‘सध्याच्या काळात साधनेची आवश्यकता’ याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ‘हलाल जिहाद ? भारतीय अर्थव्यवस्था पर नया आक्रमण’, या हिंदी भाषेतील ग्रंथाचे लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.
क्षणचित्रे
१. बडागाव व्यापारी मंडळाचे उपाध्यक्ष श्री. विकास कुमार वैश्य यांनी कार्यक्रमासाठी मंडप, ध्वनीक्षेपक व्यवस्था, विद्युत्जनित्र आणि अन्य व्यवस्था केली होती. त्यांच्या पत्नीची तब्येत ठीक नसतांना त्यांचे जावईही ‘अतीदक्षता विभागा’त रुग्णाईत असतांनाही ते कार्यक्रमात सहभागी झाले.
२. सभागृहाचे मालक श्री. सीताराम अग्रहरी हे बडागाव येथील मोठे व्यापारी असून त्यांनी कार्यक्रमाच्या सिद्धतेकडे लक्ष दिले. ते ‘कार्यक्रमाला सद्गुरु उपस्थित रहाणार आहेत’, या भावाने ते पूर्ण वेळ कार्यक्रमात सहभागी झाले.
३. चक्खखारावनचे प्रमुख रविंद पटेल यांनी त्यांच्या गावात होणार्या नवीन पंचायत भवनात समितीचा कार्यक्रम ठेवण्याची इच्छा प्रदर्शित केली.