मथुरा (उत्तरप्रदेश) येथे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने शिक्षकांसाठी ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन
मथुरा (उत्तरप्रदेश) – महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने येथील राधा माधव इंटर महाविद्यालयातील शिक्षकांसाठी ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’, या विषयावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या वेळी विश्वविद्यालयाच्या डॉ. पूनम शर्मा यांनी ‘तणाव म्हणजे काय ?, तणावाची कारणे कोणती ?, तणावामुळे आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो ? आणि त्यामुळे विविध प्रकारचे शारीरिक अन् मानसिक आजार कसे उत्पन्न होतात ?’, यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी ‘आपल्या जीवनातील तणाव दूर होण्यासाठी आध्यात्मिक स्तरावर कसे प्रयत्न करावेत ?’, हे सांगतांना नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता इत्यादींचे महत्त्व सांगितले. या मार्गदर्शनाचा अनेक शिक्षकांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शिक्षकांनी त्यांच्या शंकांचे निरसन करून घेतले.