संभाजीनगर येथे एस्.टी गृहनिर्माण संस्थेत ८ लाखांचा अपहार !
दोघांच्या विरोधात गुन्हा नोंद !
संभाजीनगर – एस्.टी. मध्यवर्ती कार्यशाळा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मालमत्तेची परस्पर खरेदी-विक्री करून तत्कालीन अध्यक्ष आणि सचिव यांनी संस्थेत ८ लाख रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी या गृहनिर्माण संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष रामचंद्र नवपुते आणि सचिव हिरामण चव्हाण या दोघांच्या विरोधात १२ ऑक्टोबर या दिवशी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या प्रकरणी एस्.टी. मध्यवर्ती कार्यशाळा सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सध्याचे अध्यक्ष देवनाथ जाधव यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार एस्.टी. मध्यवर्ती सहकारी गृहनिर्माण संस्थेचा कार्यभार हा वर्ष १९९० पर्यंत सुरळीत चालू होता. वर्ष १९९० ते २०१५ या कालावधीत या संस्थेच्या अध्यक्षपदी रामचंद्र नवपूत आणि सचिव हिरामन चव्हाण हे दोघे कार्यरत होते. या काळातील एकूण १५ वर्षांचे एकत्रित लेखापरिक्षण लेखापरीक्षक एन्.ए. देशमुख यांनी केले. त्या वेळी लेखापरीक्षणात अनेक चुकीच्या नोंदी आणि अनियमितता होती, तसेच ८ लाख रुपयांचा अपहार केल्याचे निदर्शनास आले. या अहवालानंतर वर्ष २०१६ मध्ये उपनिबंधकांनी तत्कालीन अध्यक्ष आणि सचिव यांना निलंबित केले. या संस्थेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात आली.