सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
स्वभाषाशुद्धीचे महत्त्व, तसेच मराठीतील परकीय अन् त्यांना पर्यायी स्वकीय शब्द !
मराठी, हिंदी, गुजराती आदी संस्कृतोद्भव भाषांच्या व्याकरणाचा पाया भाषाजननी संस्कृतचे व्याकरण हाच आहे. परिणामी या भाषांचे व्याकरण शिकण्यासाठी संस्कृतचे व्याकरण ठाऊक असणे अनिवार्य आहे. आधुनिक काळात इंग्रजीच्या आक्रमणामुळे नव्या पिढीला संस्कृतवर आधारित स्वभाषेचे व्याकरण शिकणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर या लेखमालेमध्ये मराठीची स्वायत्तता आणि तिचे संस्कृतशी असलेले आध्यात्मिक नाते जपत व्याकरणाचे नियम मांडण्यात आले आहेत. सनातनचे निरनिराळी शैक्षणिक पार्श्वभूमी असलेले साधक, वार्ताहर, संकलक आदींना दृष्टीसमोर ठेवून ही मांडणी करण्यात आली आहे.
मागील लेखात आपण ‘इंग्रजी शब्द देवनागरी लिपीत (मराठीत) लिहिण्याची वेळ आल्यास ते कसे लिहावेत ?’, यासंबंधी काही सूत्रे पाहिली. आजच्या लेखात ‘स्वभाषाशुद्धीची आवश्यकता, मराठी भाषेमध्ये कळत-नकळत शिरलेले आणि प्रचलित झालेले परकीय शब्द, त्या शब्दांना मराठीत असलेले प्रतिशब्द’ इत्यादी विषयांची माहिती पाहू. (लेखांक १५ – भाग १)
१. भाषिक अस्मितेचा अंत ही राष्ट्रीयत्वाच्या अंताची पहिली पायरी !
भाषा हा मानवी संस्कृतीचा केंद्रबिंदू आहे. मनुष्याचे विचार आणि संस्कार त्याच्या भाषेद्वारेच व्यक्त होत असतात. ‘एखादी संस्कृती किती प्रगत आहे ? हे तिची भाषा किती प्रगल्भ आहे ?’, यावरून ठरते. एवढेच नव्हे, तर ‘एखादी संस्कृती किती काळ टिकणार ?’, हेही ‘तिची भाषा किती काळ टिकते ?’, यावर अवलंबून असते. भाषा पालटली की, संस्कृती पालटते; संस्कृती पालटली की, राष्ट्रीयत्व पालटते आणि राष्ट्रीयत्व पालटले की, स्वराष्ट्र लयास जायला वेळ लागत नाही.
२. स्वभाषेची उपेक्षा करणे, हे मानसिक स्तरावरील धर्मांतर !
भाषेचे मनुष्यजीवनातील अनन्यसाधारण महत्त्व जाणून जगाच्या इतिहासातील प्रत्येक महत्त्वाकांक्षी राज्यकर्त्याने स्वतः जिंकलेल्या प्रदेशावर स्वतःची भाषा लादण्याचा प्रयत्न केला. मराठी भाषाही यातून वाचलेली नाही. अनुमाने १ सहस्र वर्षांपूर्वीपासून भारतावर परकीय आक्रमणे चालू झाली. पुढे ते आक्रमक राज्यकर्ते बनल्यानंतर त्यांच्या भाषांचा फार मोठा पगडा मराठीसारख्या देशी भाषांवर निर्माण झाला. असंख्य उर्दू, फारसी इत्यादी शब्द मराठीत शिरले. पुढे ब्रिटिशांनी तर अत्यंत पद्धतशीरपणे भारताची मूळ भाषा असलेल्या संस्कृतला संपवण्यास आणि मराठीसारख्या संस्कृतोद्भव भाषांचे खच्चीकरण करण्यास आरंभ केला. हे कार्य त्यांनी एवढ्या धूर्तपणे आणि दूरगामी परिणाम करील, अशा रीतीने केले की, आज त्यांना भारतातून हाकलवून ७५ वर्षे झाली, तरी भारतियांवरील इंग्रजीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढतांनाच दिसत आहे. आता येथे दिवाळीएवढ्याच, किंबहुना तिच्याहून थोड्या अधिक उत्साहाने नाताळ साजरा होऊ लागला आहे. ‘स्वभाषा अस्ताला जाऊ लागली की, धर्मही अस्ताला जाऊ लागतो’, याची ही दुर्दैवी प्रचीती आहे.
३. भारताला पुन्हा वैभवशाली बनवण्यासाठी मातृभाषेचा पुरस्कार करणे आवश्यक !
आजच्या काळातील जगामधील एकही देश प्राचीन भारताएवढा ज्ञानसंपन्न, प्रतिभावंतांची विपुलता असलेला, समृद्ध, सुखी आणि समाधानी नाही, हे सत्य कुणीही मान्य करील. भारताला हे वैभव श्रुतिस्मृती, उपनिषदे, पुराणे इत्यादी संस्कृत धर्मग्रंथांचे अध्ययन आणि आचरण यांच्यामुळे प्राप्त झाले होते. ते पुन्हा प्राप्त होण्यासाठी संस्कृत धर्मग्रंथ आणि त्याकरता संस्कृत भाषा यांचे पुनरुज्जीवन व्हायला हवे. त्यातील पहिला टप्पा ‘संस्कृत भाषेपासून उगम पावलेल्या स्वदेशी भाषांचे पुनरुज्जीवन करणे’, हा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या द्रष्ट्या राष्ट्रपुरुषांनी स्वभाषेचे हे महत्त्व ओळखले होते. त्यांनी राज्यव्यवहार आणि लोकव्यवहार यांमध्ये मातृभाषा मराठीचा पुरस्कार केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तर परभाषेतील शब्दांसाठी नवे स्वकीय शब्द निर्माण केले. ‘स्वतःचे विचार स्वभाषेत व्यक्त करता न येणे’, ही एक प्रकारची मानसिक गुलामगिरी आहे. ती नष्ट होण्याकरता आपल्या भाषेतील परकीय शब्दांचा वापर टाळून स्वकीय शब्द वापरण्यास आरंभ करणे आवश्यक आहे.
४. नित्य वापरातील काही परकीय शब्द आणि त्यांचे मराठी प्रतिशब्द
४ अ. ‘कमी’ या फारसी भाषेतील शब्दासाठी मराठीत असलेले ‘न्यून’, ‘अल्प’ इत्यादी शब्द आणि त्यांचा वापर करण्याची पद्धत : ‘कमी’ या फारसी शब्दासाठी सनातनच्या वाङ्मयात ‘न्यून’ आणि ‘अल्प’ हे दोन शब्द अधिक प्रमाणात वापरले जातात. त्यामुळे ‘या दोन शब्दांचा वापर कसा करावा ?’, हे पुढे दिले आहे.
४ अ १. न्यून : ‘त्यांच्याकडे एक किलो साखर होती. तिच्यातील १०० ग्रॅम ‘कमी’ झाली’, या वाक्यांमधील ‘कमी’ या शब्दाच्या जागी ‘न्यून’ हा शब्द वापरावा. एखाद्या गोष्टीच्या मुळात असलेल्या प्रमाणापैकी काही भाग ‘कमी’ झाला, तर तो ‘न्यून’ झाला, असे म्हणावे. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. दहा फुलांमधील दोन फुले न्यून झाली.
आ. दुखापतींमुळे आमच्या गटातील चार खेळाडू न्यून झाले.
इ. आता सीमेलगतच्या भागातील हिंदू न्यून झाले आहेत.
४ अ २. अल्प : एखादी गोष्ट मुळातच ‘कमी’ असेल, तर ती ‘अल्प’ आहे, असे म्हणावे, उदा. घरात दूध अल्प होते. याची आणखी काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
अ. आमच्या परिसरात अन्य भाषिक लोक अल्प आहेत.
आ. ते फारच अल्प वेतन देतात.
इ. त्याने अल्प काळात पुष्कळ प्रगती केली.
४ अ ३. ‘कमी’ या परकीय शब्दासाठी वापरायचे आणखी काही मराठी प्रतिशब्द : ‘न्यून’ आणि ‘अल्प’ दोन शब्दांखेरीज ‘कमी’ या परकीय शब्दासाठी नेहमी सहजपणे वापरू शकतो, असे आणखीही काही शब्द मराठीत आहेत. हे शब्द वाक्यात उपयोग करून पुढे दिले आहेत आणि ते ठळकही केले आहेत.
अ. चहात दूध थोडे घाल.
आ. माझे प्रयत्न अपुरे पडले.
इ. काकांची शारीरिक क्षमता आता उणावली आहे.
ई. हलक्या प्रतीच्या वस्तू फारशा टिकत नाहीत.
उ. हिंदुविरोधी वक्तव्यांमुळे अभिनेत्याची लोकप्रियता पुष्कळ घटली.’
(क्रमशः)
– सुश्री (कुमारी) सुप्रिया शरद नवरंगे, एम्.ए. (मराठी), बी.एड., सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०२२)