गोव्यात डिसेंबरमध्ये जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषद
आज पणजीत प्रास्ताविक कार्यक्रम
पणजी – जगाचे आयुर्वेदाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी ९ वी जागतिक आयुर्वेद आरोग्य परिषद आणि प्रदर्शन कला अकादमी, पणजी, गोवा येथे ८ ते ११ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
आयोजकांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पणजी येथे १३ ऑक्टोबरला परिषदेची प्रस्तावना करणारा कार्यक्रम केंद्रीय आयुष मंत्री सरबानंद सोनोवाल, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री तथा माजी आयुष राज्यमंत्री श्री. श्रीपाद नाईक यांच्या उपस्थितीत होणार आहे.
Press Conference on the occassion of Curtain Raiser of 9th World Ayurveda Congress & Arogya Expo in Goa https://t.co/wZTUUhW1gN
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) October 13, 2022
केंद्र आणि राज्य सरकार, तसेच आयुष मंत्रालय यांच्या सहकार्याने डिसेंबरमध्ये होणार्या ४ दिवसीय कार्यक्रमात जगभरातून उद्योग क्षेत्रातले मान्यवर, आयुर्वेद चिकित्सक, पारंपरिक वैद्य, शैक्षणिक तज्ञ, विद्यार्थी, औषध उत्पादक, औषधी वनस्पतींची लागवड करणारे आणि वितरक उपस्थित असतील. अंदाजे ४ सहस्र ५०० प्रतिनिधींची उपस्थिती अपेक्षित आहे. यांपैकी ४०० विदेशातील असतील.
Curtain Raiser of 9th World Ayurveda Congress & Arogya Expo https://t.co/jCtFwwJKyT
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) October 13, 2022
परिषदेत औषधी वनस्पती यावर राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचा परिसंवाद , पारंपरिक औषध निर्माण शास्त्र आणि पारंपरिक वैद्य यांची ओळख, आयुर्वेद आणि ज्योतिष विजनन आदी कार्यक्रम होणार आहेत. ‘आयुर्वेद आणि प्रसारमाध्यमे’ असेही १ सत्र असेल आणि आयुर्वेदावर छोटा चित्रपट महोत्सव असेल.
जागतिक परिषद कला अकादमी येथे होणार असल्याने तोपर्यंत कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण होईल, अशी आशा आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येणार असल्याने परिषदेच्या दुसर्या दिवशी त्यांच्या हस्ते नव्या केबलस्टेड (लोखंडी केबलवर आधारलेल्या) झुआरी पुलाच्या एका बाजूचे आणि मोपा विमानतळ प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता आहे.