पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेसह १४ जणांविरुद्ध ‘मकोका’ !
खंडणीसाठी व्यावसायिकाच्या अपहरणाचे प्रकरण
पुणे – ‘शेअर ट्रेडिंग’मध्ये गुंतवलेल्या ४ कोटी रुपयांच्या बदल्यात व्यावसायिकाचे अपहरण करून २० कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी येथील कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या १४ साथीदारांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. यातील ४ जणांना अटक करण्यात आली असून गजानन मारणे याच्यासह इतर आरोपी पसार आहेत. गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांनी संघटितपणे गुन्हेगारी करत स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले होते. (कुख्यात गुंडाची गुंडगिरी अजूनही चालू रहाते, यावरून पोलिसांचा धाक त्यांना नाही, हेच सिद्ध होते. पोलीस त्यांचा धाक केव्हा निर्माण करणार ? – संपादक)