सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा (वय ८० वर्षे) यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि त्यांनी केलेले मार्गदर्शन
‘मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनचे २३ वे संत पू. विनायक कर्वेमामा यांचा आश्विन कृष्ण चतुर्थी (१३.१०.२०२२) या दिवशी ८० वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
पू. विनायक कर्वेमामा यांच्या चरणी ८० व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. पू. विनायक कर्वेमामा यांची गुणवैशिष्ट्ये
१ अ. वक्तशीरपणा : ‘पू. विनायक कर्वेमामा सेवा, जेवण इत्यादी प्रत्येक कृती वेळेवर करतात. ते प्रतिदिन सकाळी गुरुपादुकांची पूजा करतात. तेव्हा ते ५ मिनिटे आधी येऊन वेळेतच पूजेला आरंभ करतात.
१ आ. स्वावलंबी
१. पू. मामांचे वय ७९ वर्षे आहे. तरीसुद्धा ते त्यांचे कपडे धुणे इत्यादी वैयक्तिक कृती स्वतःच करतात. ते महाप्रसाद घेण्यासाठीही एका माळ्यावरून चालत खाली उतरून येतात.
२. मी पू. मामा रहात असलेल्या खोलीत स्वच्छतेची सेवा करण्यासाठी जाते. तेव्हा मी त्यांना त्यांचे कपडे धुण्यासाठी मागितल्यावर ते मला न देता ‘मी माझे कपडे धुतो’, असे म्हणतात.
१ इ. पू. मामा मला लहान मुलासारखे निरागस वाटतात.
१ ई. ते सतत आनंदावस्थेत असतात.
१ उ. शिकण्याची वृत्ती : एकदा पू. मामांनी कौशेय कापडाचा (रेशमी) सदरा घातला होता. तो सदरा हाताने न धुता ‘ड्रायक्लिनींग’साठी (कृत्रिम द्रव्यांनी, उदा. पेट्रोल इत्यादींनी रेशमी वस्त्रे धुण्याची क्रिया करण्यासाठी) बाहेर द्यायचा होता. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘सदरा ‘ड्रायक्लिनींग’साठी द्यायला नको. त्यासाठी बाहेर पैसे देण्यापेक्षा आपण ‘ड्रायक्लिनींग’ कसे करतात ?’, हे ‘गूगल’वर पाहूया आणि त्याप्रमाणे करणे आपल्याला शक्य होत असेल, तर आपणच करूया.’’ यावरून त्यांच्यामध्ये नवीन गोष्ट शिकण्याची जिज्ञासा असल्याचे माझ्या लक्षात आले.
१ ऊ. ध्येय ठेवून समयमर्यादेत सेवा करण्याचा प्रयत्न करणे : पू. मामा डब्यांमध्ये कुंकू भरण्याची सेवा करतात. तेव्हा ते ‘१५ मिनिटांत ३६ कुंकवाच्या डब्या भरायच्या’, अशी समयमर्यादा घालून ध्येय ठेवून सेवा करतात. एखाद्या वेळी त्यांच्याकडून अल्प डब्या भरल्या गेल्यास ते ‘माझ्याकडून सेवा अल्प का झाली ? मला सेवा करतांना झोप येत होती का ? मनात अनावश्यक विचार येत होते का ?’, याचा अभ्यास करतात. ते आम्हा साधकांनाही समयमर्यादा घालून ध्येय ठेवून सेवा करण्यास सांगतात आणि सेवा झाल्यानंतर सेवेची फलनिष्पत्ती काढण्यास सांगतात.
१ ए. प्रेमभाव : माझी पू. मामांच्या खोलीतील स्वच्छतेची सेवा संपल्यावर ते मला नेहमी ‘तुला कोणता खाऊ देऊ ? तुला गोड आवडते का ?’, असे विचारून मला आवडीचा खाऊ देतात.
१ ऐ. सतत नामजप करणे : पू. मामा अखंड नामजप करत असतात. ते साधकांसाठी नामजपादी उपाय करून झाल्यावर स्वतःच्या खोलीत येऊन पुन्हा जपमाळ घेऊन नामजप करण्यासाठी बसतात.
२. पू. कर्वेमामांनी केलेले अमूल्य मार्गदर्शन
२ अ. पातळीचा विचार न करता केवळ ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न करावेत ! : आध्यात्मिक पातळीच्या संदर्भात ते म्हणाले, ‘‘आपल्याला पातळी हवी कि ईश्वर हवा ? आपल्याला ईश्वरच हवा आहे. त्यामुळे पातळीचा विचार न करता केवळ ईश्वरप्राप्तीसाठी प्रयत्न केले, तर पातळी आपोआप वाढते. ‘ईश्वरप्राप्ती’ हे मुख्य उत्पादन (‘मेन प्रॉडक्ट’) आहे, तर आध्यात्मिक पातळी त्याचे उप-उत्पादन (त्याचा अनुषांगिक परिणाम असणारे) (‘बाय-प्रॉडक्ट’) आहे. मुख्य विषय आत्मसात् केल्यास त्याचा उप-विषय आपोआपच साध्य होतो. त्यामुळे आपण पातळीचा विचार न करता केवळ साधनेचे प्रयत्न वाढवायला पाहिजेत.’’
२ आ. साधकांनी ईश्वराचे अखंड स्मरण करावे ! : आपण संपूर्ण दिवस ‘मी, माझे’, असे म्हणत असतो. त्या ऐवजी आपण ‘ईश्वर, ईश्वराचे’ असे म्हटले, तर आपल्याकडून ईश्वराचे किती तरी स्मरण होईल ! आपण ईश्वराचे अखंड स्मरण केले पाहिजे.
३. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘हे गुरुदेवा, तुम्हीच मला संतांच्या सहवासात रहाण्याची संधी देऊन त्यांच्या माध्यमातून शिकवत आहात आणि माझ्यासारख्या क्षुद्र जिवाचा उद्धार करत आहात’, या तुमच्या कृपेविषयी कोटीशः कृतज्ञता !
‘संतांमधील गुण माझ्यात येण्यासाठी तुम्हाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न तुम्हीच माझ्याकडून करवून घ्या’, अशी कळकळीची प्रार्थना आहे.’
– आपली चरणसेविका,
कु. रेवती मोगेर (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, मंगळुरू. (३०.८.२०२१)