भीषण आपत्काळाचा सामना करण्यासाठी साधनेचे बळ निरंतर वाढवण्याची आवश्यकता !
पू. रमानंद गौडा यांनी साधक आणि धर्मप्रेमी यांना केलेले मार्गदर्शन
११.१०.२०२२ या दिवशी कर्नाटकातील साधक आणि धर्मप्रेमी यांना सनातनचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी केलेले मार्गदर्शन पाहिले. पू. रमानंदअण्णांनी साधकांना श्री गुरूंचे जीवनातील अनन्यसाधारण महत्त्व सांगून साधनेची अनिवार्यता साधकांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतरच्या भागात पू. अण्णांच्या मार्गदर्शनाचा झालेला लाभ आणि साधकांनी त्याविषयी व्यक्त केलेले मनोगत आपण १२.१०.२०२२ या दिवशी पाहिले. आज अंतिम भागात धर्मप्रेमी यांनी व्यक्त केलेले मनोगत येथे पहाणार आहोत.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/619456.html
९. धर्मप्रेमींनी व्यक्त केलेले मनोगत
९ अ. सौ. रश्मी अमृत, धर्मप्रेमी, कुशालनगर.
९ अ १. पू. अण्णांचे मार्गदर्शन ऐकून मरगळ दूर होणे : ‘पू. अण्णांच्या मार्गदर्शनाच्या दिवशी सत्संग प्रारंभ होण्यापूर्वी अनेक साधकांना त्रास होऊन शारीरिक अडचणी येत होत्या. साधकांना ‘हा सत्संग झोपूनच ऐकावा’, असे वाटण्याइतकी मरगळ आली होती; परंतु पू. अण्णांचे मार्गदर्शन ऐकताच सर्वांची मरगळ आणि त्रास दूर होऊन त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण झाला.
९ अ २. तीव्र शारीरिक त्रास होत असतांनाही मार्गदर्शनाच्या वेळी त्याची जाणीव न होणे आणि ‘साधना अन् सेवा अधिक करायला पाहिजे’, असे वाटणे :‘आपण साधना अधिक कशी आणि का करायची ?’, याची जाणीव निर्माण झाली. आमच्या घरी ४ जण तीव्र ज्वराने तळमळत होते. माझी रोगप्रतिकार शक्ती न्यून असून मला इतरही शारीरिक त्रास आहेत. पू. अण्णांच्या मार्गदर्शनाच्या वेळी मला कशाचीच जाणीव झाली नाही. यासाठी मला गुरुदेवांविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटते. माझी त्यांच्यावरील श्रद्धा वाढली आहे. ‘मला साधना आणि सेवा अधिक केली पाहिजे’, असे तीव्रतेने वाटू लागले आहे.’
९ आ. श्रीधर, धर्मप्रेमी, बंट्वाळ.
९ आ १. स्वयंसूचना देऊन ‘वाईट विचारावर मात करू शकतो’, हे शिकणे : ‘दळणवळण बंदीच्या कठीण काळात ‘मनात येणार्या वाईट विचारांच्या विरोधात सतत स्वयंसूचना देऊन त्यावर मात करू शकतो’, याचे सत्संगात उत्तम रितीने विवेचन केले. त्यामुळे मी आता नियमित नामजप करीन आणि सत्संगात सांगितलेल्या मार्गसूचीचे पालन करण्याचा प्रयत्न करीन.’
९ इ. एक धर्मप्रेमी
९ इ १. आपत्काळाचा सामना करण्यासाठी साहाय्य करून धैर्य वाढवणारे मार्गदर्शन : ‘पू. अण्णांच्या मार्गदर्शनापूर्वी कोरोना महामारीविषयी माझ्या मनात काळजी आणि भीतीचे वातावरण होते. पू. अण्णांचे प्रत्येक वाक्य माझ्या मनाला स्पर्श करत होते. त्यामुळे माझ्या मनातील भीती दूर झाली.’
९ ई. काही धर्मप्रेमी : ‘आम्हाला (अनेक ठिकाणी मार्गदर्शनाला जोडल्या गेलेल्या धर्मप्रेमींना) ‘साधना-सेवा करावी’, असा उत्साह निर्माण झाला. मार्गदर्शन ऐकतांना आमची भावजागृतीही होत होती. आपत्काळात असे सौभाग्य लाभल्याबद्दल आम्ही श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
१०. पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनाचा झालेला लाभ
‘या मार्गदर्शनामुळे साधक आणि धर्मप्रेमी यांच्यामध्ये असलेले भय, चिंता, भीती, नकारात्मक विचार न्यून होऊन त्यांना आधार अन् प्रेरणा मिळाली. सर्वांमध्ये साधनेची गती वृद्धींगत होऊन उत्साह निर्माण झाला.
१० अ. पू. अण्णांनी मार्गदर्शनातून आध्यात्मिक स्तरावरील उपायांचे गांभीर्य आणि जीवनातील श्री गुरु अन् साधना यांचे महत्त्व साधकांच्या अंतर्मनावर बिंबवणे : ‘गुरुदेव काळानुसार सांगत असलेले सर्व नामजपादी उपाय साधक गांभीर्याने किंवा योग्य रितीने करत नाहीत’, हे ठाऊक असूनही पू. अण्णा प्रत्येक उपाय पुनःपुन्हा सांगत होते. त्यांच्या मार्गदर्शनानंतर साधकांच्या मनात असलेले भय आणि काळजी दूर होऊन त्यांच्या मनाचे समाधान झाले. अनेक साधकांना ‘या आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी आपण साधनेचे प्रयत्न सातत्याने करायला हवेत’, असे वाटले. त्यांना आपल्या जीवनात असलेले श्री गुरूंचे महत्त्व बाह्यतः ठाऊक होते; पण या मार्गदर्शनामुळे ‘गुरु नसतील, तर आपले जीवन किती कष्टप्रद झाले असते ? अनेक साधकांना आज आपण केवळ ‘श्री गुरूंच्या कृपेने आहोत’, याची जाणीव झाली. साधकांच्या मनात ‘गुरुपौर्णिमेच्या आत स्वभावदोष आणि अहं न्यून करून गुण वाढवण्याचे ध्येय ठेवून प्रयत्न केला पाहिजे. भाव, भक्ती आणि श्रद्धा ठेवून श्री गुरूंची कृपा प्राप्त करून घेतली पाहिजे’, असा विचार दृढ झाला.
१० आ. अनेक साधकांना ‘गुरूंनी सांगितल्याप्रमाणे चिकाटीने स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया करून साधनेत पुढे गेले पाहिजे’, असे वाटणे : ‘साधनेत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन याला अधिक महत्त्व दिले पाहिजे. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनानंतरच साधक साधनेत पुढे जाऊ शकतो’, याची पू. अण्णांनी पुन्हा जाणीव करून दिली. ‘पू. अण्णांच्या मार्गदर्शनाने शरिरावरील त्रासदायक आवरण दूर होत आहे’, अशी जाणीव होऊन माझे मन शांत झाले. त्यामुळे अनेक साधकांना ‘गुरूंनी सांगितल्याप्रमाणे चिकाटीने स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया करून साधनेत पुढे गेले पाहिजे’, असे वाटले.
१० इ. पुढे येऊ घातलेल्या आपत्काळाच्या भीषणतेविषयी जाणीव करून देतांना साधकांमध्ये असलेली भीती आणि ताण दूर करणारे पू. अण्णा यांचे मार्गदर्शन ! : पू. अण्णांनी पुढे येऊ घातलेल्या आपत्काळाच्या भीषणतेविषयी साधकांना जाणीव करून देतांनाच त्यांच्यामध्ये असलेली भीती आणि ताण दूर केला. ‘सर्वांकडून योग्य साधना व्हावी’, ही तीव्र तळमळ ठेवून पू. रमानंदअण्णा यांनी स्वतः या मार्गदर्शनाचे नियोजन केले. साधक, धर्मप्रेमी, अधिवक्ता, आधुनिक वैद्य, उद्योगपती, संकेतस्थळाशी जोडलेले, ‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, अशा समाजातील सर्व जिज्ञासूंना त्यांनी वेगवेगळे मार्गदर्शन केले. त्यामुळे आता सर्वांमध्ये ‘साधनाच केली पाहिजे. साधनेची गती वाढवली पाहिजे’, अशी इच्छा निर्माण होऊन उत्साहही वाढला आणि सर्वांना आधार अन् प्रेरणा मिळाली. हे सर्व पू. अण्णांचे मार्गदर्शन आणि श्री गुरूंची कृपा यांमुळे साध्य झाले. त्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता.’
– सौ. मंजुळा गौडा (पू. रमानंद गौडा यांच्या पत्नी) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), मंगळुरू, कर्नाटक. (२.६.२०२१)
(समाप्त)