खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी अमरावती येथे परिवहन अधिकार्यांना निवेदन !
हिंदु जनजागृती समितीचा सुराज्य अभियान उपक्रम !
अमरावती, १२ ऑक्टोबर (वार्ता.) – सण, उत्सव आणि शालेय सुट्या यांच्या कालावधीत खासगी ट्रॅव्हल्सकडून तिकिटाचे अधिक दर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. याविषयी परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्वच परिवहन कार्यालयांना आदेश दिले आहेत. या अनुषंगाने अमरावती येथे शासनाच्या आदेशानुसार तत्परतेने कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांना हिंदु जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या अंतर्गत देण्यात आले. या वेळी समितीच्या सुराज्य अभियान समन्वयक अधिवक्त्या सौ. प्राजक्ता वरूडकर-जामोदे, तसेच श्री. गिरीश कोमेरवार, डॉ. रमेश वरूडकर, सौ. किरण कोमेरवार या उपस्थित होत्या. या वेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निवेदनात नमूद केलेल्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.