प्रत्येक वार्ताहराने बातमीतून चळवळ कशी निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावेत ! – श्री. नागेश गाडे, समूह संपादक, सनातन प्रभात
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘वार्ताहर आणि संपादक प्रशिक्षण शिबीर’ !
रामनाथी (गोवा) – वृत्तपत्राच्या माध्यमातून चळवळ निर्माण व्हावी, या उद्देशाने सनातन प्रभात नियतकालिकांचे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी ‘सनातन प्रभात’ चालू केले आहे. त्यामुळे प्रत्येक वार्ताहराने आपण केलेल्या बातमीतून पुढे चळवळ कशी निर्माण होईल ?, यादृष्टीने प्रयत्न करायला हवे. यासह केवळ बातमीसाठी बातमी न करता बातमीच्या माध्यमातून आपली साधना कशी होईल ?, या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. शिबिरात जे काही शिकलो ते वर्षभर कृतीत आणले, तर या शिबिराची फलनिष्पत्ती झाली, असे म्हणता येईल. जे काही शिकलो, ते कृतीत आणणे हीच कृतज्ञता आहे, असे प्रतिपादन ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले सनातन प्रभातचे समूह संपादक श्री. नागेश गाडे यांनी केले.
सनातन संस्थेच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात ११ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत ‘वार्ताहर आणि संपादक प्रशिक्षण शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. याप्रसंगी दैनिक ‘सनातन प्रभात’चे सहसंपादक श्री. भूषण केरकर यांनीही उपस्थितांना संबोधित केले. या शिबिरासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील शिबिरार्थी उपस्थित आहेत. सूत्रसंचालन वर्षा कुलकर्णी यांनी केले. या शिबिरात वृत्त सिद्ध करणे आणि त्यातील सुधारणा, शुद्धलेखनाचा अभ्यास, शासकीय कार्यालयांचे कामकाज कसे चालते ?, यांसह समस्याप्रधान वृत्त कसे मिळवावे ? समाजाभिमुख पत्रकारितेसाठी करावयाचे प्रयत्न, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.
या प्रसंगी मार्गदर्शन करतांना ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. भूषण केरकर म्हणाले, ‘‘वार्ताहर सेवेच्या माध्यमातून समष्टी साधना करण्याची अमूल्य संधी आपल्याला मिळाली आहे. लेखणी हे एक शस्त्र आहे. लेखणीचा वार हा शस्त्रापेक्षाही अधिक प्रभावी असतो. लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांच्या माध्यमातून केलेले लिखाण जनमत जागृत करणारे आणि ब्रिटिशांच्या काळजाला भिडणारे होते. जे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळात ‘केसरी’ने केले, तेच कार्य आज ‘सनातन प्रभात’ करत आहे. ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्रासाठी स्थापनेचे व्यापक ध्येय ठेवून कार्य करत असल्याने वार्ताहराने या ध्येयाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे. आपल्याला या शिबिराचा लाभ घेऊन सक्षम वार्ताहर बनायचे आहे आणि धर्मजागृतीचा वसा उचलायचा आहे. वार्ताहर सेवेचा प्रवास हा चांगला वार्ताहर, साधक-वार्ताहर, शिष्य-वार्ताहर आणि पुढे संत-वार्ताहर, असा असायला हवा.’’
१२ ऑक्टोबर या दिवशी श्री. प्रीतम नाचणकर, सौ. समीक्षा नागेश गाडे आणि कु. सायली डिंगरे यांनी समस्याप्रधान बातम्या कशा मिळवाव्यात ? या विषयावर, तर श्री. नागेश गाडे आणि श्री. अजय केळकर यांनी समाजाभिमुख पत्रकारितेसाठी करावयाचे प्रयत्न या विषयांवर वार्ताहरांना मार्गदर्शन केले.