दहा रुपयांची फसवणूक केल्यामुळे ग्राहकाला १५ सहस्र रुपये देण्याचा जिल्हा ग्राहक मंच (सिंधुदुर्ग)चा वीज वितरणला आदेश

वीज वितरण आस्थापनाच्या मनमानी कारभाराच्या विरोधात यशस्वी लढा देणारे ओरोस येथील विष्णुप्रसाद दळवी यांचे अभिनंदन !

वीज वितरण आस्थापनाला हा मोठा धक्का !

सिंधुदुर्ग – वीजदेयकाच्या रकमेत १० रुपये अधिक आकारून फसवणूक केल्याच्या प्रकरणी ग्राहकाला १५ सहस्र रुपये ४५ दिवसांच्या आत द्यावेत, असा आदेश जिल्हा ग्राहक मंचने वीज वितरण आस्थापनाला दिला आहे. ग्राहकांना विविध कारणांनी वेठीस धरणार्‍या वीज वितरण आस्थापनाला हा मोठा धक्का आहे.

ओरोस येथील सुलोचना नगर येथे रहाणारे विष्णुप्रसाद दळवी यांना रहात्या घराचे  डिसेंबर २०१९ मध्ये ५४० रुपये वीजदेयक आले होते. वीज वितरण आस्थापनाने हे देयक १८ डिसेंबर २०१९ पूर्वी भरल्यास त्यामध्ये १० रुपयांची सवलत मिळेल आणि त्या दिनांकानंतर भरल्यास ५४० रुपये देयक भरावे लागले, असे देयकात नमूद केले होते. यासाठी दळवी यांनी वीज वितरण आस्थापनाच्या संगणकप्रणालीवर तपासले असता प्रत्यक्षात कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच संगणक प्रणालीवर ५४० रुपयांचे देयक दिसत होते. ‘अशा प्रकारे सर्वच ग्राहकांची फसवणूक केली जात असणार’, हे लक्षात येताच दळवी यांनी संगणक प्रणालीवर दिसणारे देयक भरले. त्यानंतर अशा प्रकारे इतर ग्राहकांचीही फसवणूक होत असणार हे लक्षात घेऊन, तसेच १० रुपयांच्या हानीभरपाईसाठी त्यांनी वीज वितरण आस्थापनाचे उपकार्यकारी अभियंता आणि  विभागीय कार्यकारी अभियंता यांना पक्षकार करून त्यांच्याविरुद्ध जिल्हा ग्राहक मंचाकडे दावा प्रविष्ट केला. विशेष म्हणजे दळवी यांनी ग्राहक मंचच्या न्यायालयासमोर स्वतः युक्तीवाद केला होता. ग्राहक मंचने यावर निर्णय देतांना दळवी यांना झालेल्या मानसिक त्रासापोटी १० सहस्र रुपये, तसेच दाव्यासाठी झालेल्या खर्चासाठी ५ सहस्र रुपये, असे एकूण १५ सहस्र रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.