अंधेरी मतदारसंघाची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबरला होणार !
मुंबई – अंधेरी (पूर्व) विधानसभेच्या मतदारसंघाची पोटनिवडणूक ३ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. राज्याच्या राजकारणातील पालटलेल्या समीकरणांमुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. या विधानसभा मतदारसंघात ३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता लागू झाली आहे. या मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होणार आहे.
शिवसेनेतील दोन गट ठाकरे समर्थक असलेला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे दोन्ही गट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या निवडणुकीची मतमोजणी ६ नोव्हेंबर या दिवशी होणार आहे. निवडणुकीची अधिसूचना ७ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नामनिर्देशनपत्र सादर करण्याची अखेरचा दिनांक १४ ऑक्टोबर, नामनिर्देशन पत्रांची छाननी १५ ऑक्टोबर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक १७ ऑक्टोबर असणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी १ जानेवारी २०२२ या दिवशीच्या अर्हता दिनांकावर आधारित मतदारसूची वापरण्यात येणार आहे.
या पोटनिवडणुकीत भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे, तर ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाकडून रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.