सर्वांशी सहजतेने संवाद साधणारे आणि नामांकित बासरीवादक असूनही कर्तेपणा ईश्वराला अर्पण करणारे पुणे येथील प्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे (वय ८० वर्षे) !

‘पू. पंडित केशव गिंडे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरीवादक आहेत. त्यांनी बासरीवादनाचे शिक्षण प्रसिद्ध बासरीवादक पंडित पन्नालाल घोष यांचे शिष्य पंडित देवेंद्र मुर्डेश्वर आणि पंडित हरिपद चौधरी यांच्याकडे घेतले. प.पू. गुळवणी महाराज आणि सद्गुरु रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पू. गिंडेगुरुजी यांनी साधना केली. त्यांना संगीत साधनेच्या प्रवासात अनेक संत आणि देवता यांचे दर्शन होऊन दैवी मार्गदर्शनही लाभले आहे.

पू. पंडित केशव गिंडे

त्यांचे बासरीतील संशोधन अलौकिक आहे. त्यांनी ‘बासरीवादनात स्वरांची सलगता रहावी’, यासाठी ‘केशववेणू’ या बासरीची निर्मिती केली. या बासरीचे वैशिष्ट्य, म्हणजे ही बासरी सव्वाचार सप्तकांत (सात स्वरांचा एक सप्तक असतो.) वाजवता येते.    

या बासरीची नोंदणी ‘गोल्डन बुक ऑफ रेकॉर्डस्’, ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्’ आणि ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् ’ यांमध्ये झाली आहे. पू. गिंडेगुरुजी यांना आतापर्यंत अनेक सन्मानांनी गौरवलेले आहे. अलीकडेच त्यांना ‘भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार’ या पुरस्काराने गौरवण्यात आले. १.९.२०२२ या दिवशी पू. गिंडेगुरुजी यांना ‘वेणूनादसम्राट महर्षि’ हा अत्यंत प्रतिष्ठित बहुमानाचा पुरस्कारही मिळाला.

प्रसिद्ध बासरीवादक पू. पंडित केशव गिंडे यांनी केलेल्या बासरीवादनाचा उपस्थितांवर कसा परिणाम होतो’, यासंदर्भातील संशोधनात्मक प्रयोग करण्यात आले. त्यांची साधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या बासरीवादनाच्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधकांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.’  

– कु. तेजल पात्रीकर, संगीत विशारद (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के), संगीत समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.११.२०२१) 

पू. गिंडेगुरुजी यांच्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या भेटीच्या वेळी साधिकेला पृथ्वी, आप आणि वायु या तत्त्वांशी संबंधित अनुभूती येणे

‘पू. गिंडेगुरुजी यांची परात्पर गुरुदेवांशी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी) भेट झाली. तेव्हा त्या सत्संगात मला शरिराभोवती कापसासारखा मऊ स्पर्श जाणवत होता. त्यानंतर काही वेळाने ‘सूक्ष्मातून माझ्या आजूबाजूला पाणी आहे’, असे जाणवत होते. मला विविध गंधही येत होते. अशा प्रकारे देवाने मला पृथ्वी, आप आणि वायु या तत्त्वांची अनुभूती एकाच वेळी दिली. तेव्हा ‘देवाने संतांच्या सामर्थ्याची प्रचीती दिली’, असे मला जाणवले.’

– सौ. अनघा जोशी, बी.ए. (संगीत), (वर्ष २०२२ मधील आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)

बासरीवादन करतांना पू. पंडित केशव गिंडे

१. साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

१ अ. श्री. गिरिजय प्रभुदेसाई (संगीत विशारद (तबला))  

१ अ १. नामांकित कलाकार असूनही कर्तेपणा ईश्वराला अर्पण करणारे पू. पंडित केशव गिंडेगुरुजी ! : ‘पू. गिंडेगुरुजी यांच्या बासरीवादनाचे विविध प्रयोग घेण्यात आले. एकदा पू. गिंडेगुरुजी यांच्या वादनाचा प्रयोग झाल्यावर मी त्यांना म्हणालो, ‘‘पू. गुरुजी, वादन पुष्कळ सुंदर झाले !’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मी काही करत नाही. देव सर्वकाही करतो. आपण केवळ कठपुतळी आहोत. ईश्वरच या कठपुतळीच्या दोर्‍या हालवतो.’’

१ अ २. अहंशून्यता : पू. गिंडेगुरुजी प्रत्येकाशी सहजतेने, आपलेपणाने आणि नम्रतेने बोलतात. कलाकारांना प्रसिद्धी मिळाल्यावर काही कलाकारांच्या वागण्या-बोलण्यात अहं जाणवतो. पू. गिंडेगुरुजी ज्येष्ठ आणि नामांकित कलाकार असूनही त्यांच्यात अहंचा लवलेशही जाणवत नाही.’

१ आ. सौ. अनघा जोशी, बी.ए. (संगीत)  

१ आ १. सहकलाकाराच्या वादन कलेची जाण ठेवत त्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणारे पू. पंडित केशव गिंडेगुरुजी ! : ‘पू. गिंडेगुरुजी यांच्या बासरी वादनाच्या वेळी तबलावादक साधक श्री. गिरिजय प्रभुदेसाई हे पू. गिंडेगुरुजी यांना तबल्याची साथसंगत करत होते. पू. गिंडेगुरुजी यांना श्री. गिरिजय यांचे तबलावादन पुष्कळ आवडले. पू. गिंडेगुरुजी यांनी श्री. गिरिजय यांचे ‘‘तू पुष्कळ छान वाजवलेस’’, असे म्हणून कौतुकही केले. समाजातील अनेक नामांकित कलाकार अन्य कलाकारांना महत्त्व देत नाहीत; मात्र पू. गिंडेगुरुजी यांनी वादक साधकाचे कौतुक करून त्याला प्रोत्साहन दिले.’

२. पू. गिंडेगुरुजी यांचे बासरीवादन ऐकतांना आलेल्या अनुभूती  

२ अ. सौ. अनघा जोशी, बी.ए. (संगीत)  

१. ‘पू. गिंडेगुरुजी बासरीवादन करतांना ‘ते शून्यात पहात आहेत’, असे मला जाणवले.

२. ‘ते निर्गुणाकडे जात असावेत’, असे मला वाटले.

३. पू. गिंडेगुरुजी त्यांच्या गावी गेल्यावर ‘प्रयोगस्थळी, म्हणजेच ध्वनीचित्रीकरण कक्षातील वातावरणात त्यांच्या वादनाचा परिणाम २ दिवस टिकून होता’, असे मला जाणवले.’

३. पू. पंडित केशव गिंडेगुरुजी यांनी ‘पारंपरिक बासरी’ आणि ‘केशववेणू’ यांवर बासरीवादन करतांना साधकांना आलेल्या अनुभूती 

३ अ. पारंपरिक बासरीवर (नेहमी समाजात जी वाजवली जाते ती) राग ‘तोडी’ वादन करत असतांना साधकांना आलेल्या अनुभूती

३ अ १. सौ. भक्ती कुलकर्णी, संगीत अभ्यासक 

३ अ १ अ. पू. गिंडेगुरुजी बासरीवादन करत असतांना ‘भगवान श्रीकृष्ण बासरीवादन करत आहे’, असे जाणवून डोळे आपोआप मिटले जाणे आणि पुष्कळ शांत वाटणे : ‘पू. गिंडेगुरुजी यांनी राग ‘तोडी’वर बासरी वाजवण्यास प्रारंभ केला. त्या वेळी ‘मी गोकुळात, तसेच वृंदावनात आहे’, असे मला जाणवत होते. पू. गिंडेगुरुजी बासरी वाजवत असतांना ‘साक्षात् भगवान श्रीकृष्णच बासरी वाजवत आहे’, असे मला जाणवत होते. बासरीचे स्वर ऐकून माझे डोळे आपोआप मिटले गेले आणि मला पुष्कळ शांत वाटले.’

३ अ २. कु. अपाला औंधकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १५ वर्षे)

३ अ २ अ. ध्यान लागून ध्यानातच बासरीच्या स्वरांवर मानसनृत्य होणे, आज्ञाचक्र आणि सहस्रार यांवर संवेदना जाणवणे अन् सुषुम्ना नाडी जागृत झाल्याप्रमाणे जाणवणे : ‘पू. गिंडेगुरुजी यांनी पारंपरिक बासरीवर, म्हणजेच नेहमीच्या बासरीवर राग ‘तोडी’ वादनास प्रारंभ केल्यावर मला उत्साह जाणवला. माझ्या देहावरील रज-तमाचे आवरण दूर झाले आणि मला शरीर हलके झाल्यासारखे जाणवले. आरंभी माझे मन अंतर्मुख होऊन नंतर माझे ध्यान लागले. माझ्याकडून ध्यानामध्येच बासरीच्या स्वरांवर मानसनृत्य झाले. प्रारंभी मला आज्ञाचक्रावर संवेदना जाणवल्या आणि नंतर सहस्रारचक्रावर संवेदना जाणवून शरीर आतून हलू लागले. त्या वेळी मला सुषुम्ना नाडी जागृत झाल्यासारखे जाणवले. ‘माझ्या आजूबाजूला काही चालू आहे’, याची मला जाणीव नव्हती.

३ अ २ आ. साधिकेच्या आज्ञाचक्रावर पांढर्‍या रंगाची दोन वलये दिसणे आणि तिला चांगल्या संवेदना जाणवणे : पू. गिंडेगुरुजी यांनी राग ‘तोडी’ वाजवण्यास आरंभ केल्यानंतर मला पुष्कळ शांती जाणवली. माझ्या आज्ञाचक्रावर पांढर्‍या रंगाची दोन वलये दिसली. मला मणिपूरचक्र आणि आज्ञाचक्र यांवर चांगल्या संवेदना जाणवल्या.

३ अ २ इ.‘बासरी संदर्भातील प्रयोग हळूहळू निर्गुण स्तराकडे जात आहे’, असे मला जाणवले.

३ अ २ ई. मला पावसाच्या सरींचा २ वेळा नाद ऐकू आला.

३ अ २ उ. माझ्या तोंडामध्ये प्रथम गोडसर चव आणि त्यानंतर आंबट चव आली.

३ अ २ ऊ. प्रयोगानंतर माझ्या डोळ्यांवर थोडी निळसर छटा आली.’

३ आ. पू. गिंडेगुरुजी ‘केशववेणू’वर राग ‘तोडी’ वादन करतांना आलेल्या अनुभूती 

३ आ १. कु. म्रिणालिनी देवघरे, नृत्य विशारद

३ आ १ अ. ध्यान लागून ‘वातावरणात आपतत्त्वाचे प्रमाण वाढले आहे’, असे जाणवणे : पू. गिंडेगुरुजी ‘केशववेणू’वर तोडी राग वाजवत असतांना माझे मन निर्विचार झाले. माझे शरीर आतून हलत असल्याचे जाणवून थोड्या वेळाने माझे ध्यान लागले. वादनाचा परिणाम म्हणून वातावरणात आपतत्त्वाचे प्रमाण वाढल्याचे जाणवले. या प्रयोगानंतर माझे डोळे आणखीन निळसर झाले.’

३ आ २. कु. अपाला औंधकर 

३ आ २ अ. दैवी सुगंध येणे आणि सूर्याचे पहिले किरण पृथ्वीवर येत असलेली पहाटेची वेळ अनुभवता येणे : ‘पू. गिंडेगुरुजी यांचे बासरीवादन चालू झाल्यापासूनच मला पुष्कळ दैवी सुगंध येत होता. मला वातावरणात आनंदाची स्पंदने जाणवली. माझे ध्यान लागले. मला सूर्यदेवाचे दर्शन झाले. सूर्याचे पहिले किरण पृथ्वीवर ज्या वेळी येतात, ती पहाटेची वेळ प्रयोगात मला अनुभवता आली. माझे मन पुष्कळ शांत झाले होते.

३ आ २ आ. ‘सा’, ‘रे’, ‘ग’ आणि ‘नी’ या स्वरांशी संबंधित देवतांचे दर्शन होणे : नंतर मी ध्यानातून बाहेर आले. मी डोळे उघडून बासरीवादन ऐकतांना मला ‘सा’, ‘रे’, ‘ग’, आणि ‘नी’ हे स्वर बासरीतून बाहेर आल्याचे दिसले. ‘प्रत्येक स्वर, म्हणजे एक एक देवताच समोर उभी आहे’, असे मला दिसले. त्या वेळी पू. गिंडेगुरुजींच्या भोवताली आणि रंगमंचावर पुष्कळ पांढरा प्रकाश दिसला. ‘माझा स्थूलदेह हलका होऊन मी हळूहळू वर वर जात आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला मोगर्‍याचा सुगंध आला.’

३ आ ३. कु. रेणुका कुलकर्णी, संगीत अभ्यासक  

३ आ ३ अ. ‘पू. गिंडेगुरुजी संत असल्याने आणि त्यांचे बासरीवादन उच्च स्तरीय असल्याने त्यातील चैतन्याचा परिणाम माझ्या शरिरातील उच्च स्तरीय चक्रांवर (आज्ञाचक्र आणि सहस्रार यांवर) मला अधिक जाणवत होता.’

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक