पाकिस्तानमधील इस्लामी जहालवादामुळे अनेक देवांना मानणाऱ्या कलश जमातीला धोका !
पाकिस्तानमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या अन् सर्वांत अल्पसंख्यांक प्रमाणात असलेल्या ‘कलश’ जमातीला तिच्या अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. धार्मिक जहालवाद, बलपूर्वक केली जाणारी धर्मांतरे, स्थलांतरे आणि हवामानातील पालट ही या जमातीपुढे असणारी संकटे आहेत. विविध संस्कृतींचा समावेश असलेल्या अखंड भारतातील ही संस्कृती आपण नष्ट होऊ देणार का ? कि ती वाचण्यासाठी भारत सरकार काही प्रयत्न करणार ? हा खरा प्रश्न आहे.
१. कलश जमातीविषयीची माहिती
या समाजातील वाई, सीमा निसेल, वंटा, अश्कुन, त्रिगमी भाषा बोलणाऱ्यांना ‘कलश’ या नावाने ओळखले जाते. कलश हे लोक मूळ आशियामधील असून त्यांच्या पूर्वजांनी त्सियाम भागातून चित्राल व्हॅलीमध्ये स्थलांतर केले. याचा उल्लेख त्यांची लोकगीते किंवा महाकाव्यात येतो. कलश जमातीच्या परंपरा किंवा चालीरिती पाहिल्या, तर कलश जमात ही स्थलांतर झालेले किंवा निर्वासित होते, हे लक्षात येते. काही जण म्हणतात की, ते गांधारी लोकांचे वंशज आहेत. ते बोलत असलेली कलश भाषा जिला ‘कलश मून’ म्हटले जाते. कलश जमातीतील महिला सर्वसाधारणपणे काळ्या रंगाचे लांब झगे घालतात. त्यावर कवड्यांनी नक्षीकाम केलेले असते. यासाठी चित्राल भागातील मुसलमान त्यांना ‘ब्लॅक काफिर’ म्हणतात. या जमातीतील पुरुष पाकिस्तानी लोकांप्रमाणे सलवार कमीज, तर लहान मुलेही तसेच कपडे वापरतात. या जमातीत इंद्र, मुंजे मलेक, महादेव, इम्रा, जेस्तक, क्रूमई, सूची, वरोटी आणि जाच वगैरे देवतांना मानतात, ज्यांचा उल्लेख त्यांच्या लोककथांमध्ये आहे.
२. कलश जमातीतील लोकांचे बलपूर्वक धर्मांतर
कलश जमातीतील लोक पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा भागातील चित्राल तालुक्यातील कलश व्हॅलीमध्ये रहातात. चित्राल जिल्हा हा अफगाणिस्तानमधील नूरिस्तान भागाला जोडलेला आहे. नूरिस्तानला ‘काफिरीस्तान’ (काफिरांची म्हणजेच इस्लामेतरांची भूमी) असेही म्हटले जाते. या भागातील संस्कृती आणि कलश जमातीची संस्कृती यांत साम्य आहे. ११ व्या शतकात गझनीने या भागावर पहिल्यांदा आक्रमण केले. वर्ष १३३९ मध्ये तैमूरने या
भागावर आक्रमण केले, तेव्हा त्यांनी स्वतःची ओळख अबाधित ठेवली. वर्ष १८९० मध्ये काफिरीस्तानमधील लोकांचे आणि त्यानंतर वर्ष १८९५ मध्ये नूरिस्तानचे बलपूर्वक इस्लाम धर्मात धर्मांतर करण्यात आले. त्यामुळे काफिरीस्तान हे नूरिस्तान झाले.
३. कलश जमातीची सध्याची स्थिती
चित्राल जिल्हा हा ‘खो’ आणि ‘कलश’ या दोन प्रमुख वंशांच्या जमातींमध्ये विभागला गेला आहे. खो जमातीत सुन्नी आणि इस्माइली मुसलमान आहेत. कलश जमातीचे लोक पाळत असलेल्या परंपरा आणि त्यांची श्रद्धास्थाने यांचा सनातन वैदिक संस्कृतीशी जवळचा संबंध आहे. वर्ष १९०० मध्ये चित्राल जिल्ह्यात कलश जमातीचे लोक बहुसंख्यांक होते; परंतु आता ही परिस्थिती पालटली आहे. आता कलश जमातीचे केवळ ४ सहस्र लोक या भागात रहात आहेत. अलीकडच्या वर्षांत कलश जमातीतील लोकांना तालिबानने धमक्या देऊन त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करत आहे. बहुसंख्यांक असलेली ही जमात आता अल्पसंख्यांक झाली आहे. आम्ही ही जमात नष्ट होऊ देणार का ? ही जमात आता नूरिस्तानी होईल का ? (१७.९.२०२२)
– सुशांत रघुवंशी (साभार : ‘भारत व्हॉईस’चे संकेतस्थळ)