वडगाव येथील जलशुद्धीकरणाची प्रक्रिया सदोष असल्याने संबंधित अधिकार्यांवर कारवाईची मागणी !
धायरी (जिल्हा पुणे) – वडगाव येथील जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये अधिक प्रमाणात क्लोरीन टाकून नागरिकांच्या जिवाशी खेळणार्या अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक हरिदास चरवड यांनी महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांकडे केली आहे. महापालिका आयुक्त, साहाय्यक आयुक्त, खाते प्रमुख, पाणीपुरवठा विभाग यांना चरवड यांनी निवेदन दिले आहे. पुणे महापालिकेच्या वडगाव जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये पाण्याच्या शुद्धतेची प्रक्रिया सदोष आहे. प्रक्रियेमधील सर्व युनिट वापरले जात नाहीत. त्यामुळे क्लोरीनचे प्रमाण वाढवले जात आहे. शुद्धीकरणासाठी विविध टप्पे आहेत; मात्र त्याचा योग्य तांत्रिक उपयोग न करता सोपी आणि कमी खर्चाची पद्धत वापरली जाते. विहित मानकापेक्षा अधिक प्रमाणात क्लोरीन पाण्यात मिसळले गेल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आठ दिवसांमध्ये या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी; अन्यथा नागरिकांसमवेत कार्यालयासमोर आंदोलन करू, असे चरवड यांनी सांगितले.
संपादकीय भूमिकालोकांच्या जिवाशी खेळणार्यांना कठोर शिक्षाच करायला हवी ! |