आशिया आणि अमेरिका खंड भविष्यात एकत्र येऊन होणार अमेशिया महाद्वीप !

पर्थ (ऑस्ट्रेलिया)/बीजिंग (चीन) – पुढील २० ते ३० कोटी वर्षांमध्ये आर्क्टिक महासागर आणि कॅरिबियन सागर हे विलुप्त होऊन आशिया अन् अमेरिका खंड एकत्र येतील. यामुळे ‘अमेशिया’ नावाचे महाद्वीप उदयास येईल, असा अंदाज ऑस्ट्रेलियातील ‘कर्टिन विश्वविद्यालय’ आणि चीनचे ‘पेकिंग विश्वविद्यालय’ येथील संशोधनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, प्रतिवर्षी प्रशांत महासागरात एकेका इंचाची घट होत आहे.

‘नॅशनल सायंस रिव्ह्यू जर्नल’मध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार मुख्य लेखक डॉ. चुआन हुआंग म्हणाले की, गेल्या २ अब्ज वर्षांमध्ये पृथ्वीचे महाद्वीप प्रत्येक ६० कोटी वर्षांनी एक ‘सुपरकॉन्टिनेंट’ (मोठे महाद्वीप) बनवण्यासाठी एकत्र येतात. याचा अर्थ वर्तमान महाद्वीप २०-३० कोटी वर्षांनी एकमेकांना टक्कर देणार आहेत.

अभ्यासानुसार युरेशिया आणि अमेरिका हे प्रशांत महासागरच्या दिशेने पुढे सरकत आहेत, तर ऑस्ट्रेलिया प्रत्येक वर्षी साधारण ७ सेंटीमीटरच्या गतीने आशियाच्या दिशेने सरकत आहे.