आनंदी आणि समृद्ध जीवनासाठी साधना आवश्यक ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था
बीड येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘आनंदी आणि तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन
बीड – नामजप ही कलियुगातील श्रेष्ठ उपासना आहे. केवळ मनुष्य जन्मात साधना करून ईश्वरप्राप्ती करू शकतो. जीवनातील साधनेचे महत्त्व समजून घेऊन कुटुंबातील प्रत्येकाने साधनेला प्रारंभ केल्यास जीवन आनंदी आणि समृद्ध होईल. त्यासाठी भगवंताने ज्या कुळात जन्माला घातले, त्या कुळातील कुलदेवीचा अधिकाधिक नामजप करावा, तसेच पितृऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने ‘श्री गुरुदेव दत्त’ हा नामजप करावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले.
सनातन संस्थेच्या वतीने येथील जिज्ञासूंसाठी ‘आनंदी आणि तणावमुक्त जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर श्री याज्ञवल्क्य वेद भवन या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या मार्गदर्शन करत होत्या. व्याख्यानाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला. व्याख्यानाचा उद्देश सनातन संस्थेच्या संत पू. दीपाली मतकर यांनी सांगितला. या वेळी सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन आणि सात्त्विक उत्पादनांचा कक्ष लावण्यात आला होता. त्याचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
क्षणचित्रे
१. व्याख्यानानंतर जिज्ञासूंनी ५ ठिकाणी साधना सत्संग चालू करण्याची मागणी केली, तसेच ग्रामीण भागात प्रवचन घेण्याची मागणी केली.
२. एका जिज्ञासूने ‘नांदेड जिल्ह्यातील जिज्ञासूंची नावे कळवतो, त्यांनाही साधना सांगा’, असे सांगितले.
३. दोन जिज्ञासूंनी ‘अध्यात्मप्रसाराच्या सेवेला प्रतिदिन १ घंटा वेळ देणार’, असे सांगितले.
४. बीड येथील एका सभागृहाच्या मालकांनी ‘तुमच्या कार्यक्रमासाठी माझे सभागृह कधीही विनामूल्य वापरा’, असे सांगितले.
५. एका जिज्ञासूने सांगितले की, सनातन संस्थेच्या साधकांची रहाण्याची व्यवस्था करू शकतो.
जिज्ञासूंचे अभिप्राय
१. श्री. राजेंद्र जगताप, माजी आमदार, काँग्रेस – व्याख्यानातून ‘अध्यात्म, सदाचरण, धर्मरक्षण आणि मनुष्याने जीवन कसे जगावे ?’, याविषयी सविस्तर मार्गदर्शन लाभले.
२. श्री. दिलीप रामभाऊ वांगीकर – कार्यक्रम उत्तम होता. बीडमध्ये अधिकाधिक लोकांना साधनेचे महत्त्व कळावे, यासाठी प्रत्येक सप्ताहात सत्संग चालू करावा.
३. श्री. माधव दत्ताराम भदेवाड – कार्यक्रम पुष्कळ आवडला. गावोगावी जाऊन अध्यात्मप्रसार करण्याच्या सेवेत मी सहभागी होईन.
४. सौ. धनश्री मकरंद कुलकर्णी – व्याख्यानामध्ये पुष्कळ प्रसन्न वाटले. सदगुरु स्वाती खाडये आणि पू. दीपाली मतकर यांच्या पाठीमागे भगव्या रंगाचा प्रकाश दिसला. गुरुमाईंचा (सद्गुरु आणि संत यांचा) आशीर्वाद माझ्या कुटुंबावर रहावा आणि नियमित गुरुंची सेवा करण्याची बुद्धी मला अन् कुटुंबाला व्हावी, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना !
५. सौ. श्रावणी श्रीपाद वैद्य – व्याख्यानामध्ये सद्गुरु स्वातीताईंनी सांगितल्याप्रमाणे अधिकाधिक नामजप आणि साधना करीन.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार धर्मप्रेमी यांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |