अत्यंत साधी रहाणी असलेले, प्रेमळ आणि निःस्पृह पंत महाराज बाळेकुंद्री !
आज १२ ऑक्टोबर या दिवशी पंत महाराज बाळेकुंद्री यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
‘आश्विन कृष्ण तृतीयेला (१९ ऑक्टोबर १९०५ या दिवशी) बेळगाव शेजारील बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज यांनी समाधी घेतली.
रामचंद्रपंत आणि गोदुबाई (सीताबाई) या सत्त्वशील दांपत्याच्या पोटी श्रावण शुक्ल अष्टमीला श्री पंत महाराज यांचा जन्म झाला. त्यांनी आपला प्राथमिक विद्याभ्यास आपल्या आजोळीच केला. त्यानंतर बेळगाव येथे इंग्रजी शिक्षण पूर्ण केल्यावर तेथील एका इंग्रजी शाळेत श्री पंत महाराज शिक्षक म्हणून काम करू लागले. आरंभीपासूनच त्यांचे लक्ष नीतीमत्ता, नियमितपणा आणि सद्वर्तन यांकडे असे. पंतांच्या पितृकुलातील सर्वच माणसे सत्यप्रतिज्ञ, ईश्वरनिष्ठ आणि अढळ अशा सात्त्विक धैर्याची होती. या सर्वांची भगवान दत्तात्रेयांवर अत्यंत निष्ठा असे. पारमार्थिक विषयांचे चिंतन आणि तत्त्वविवेचनाची हौस यांमुळे त्यांची मानसिक भूमिका फारच उंच झाली. बाळेकुंद्रीजवळील कर्डीगुद्दीच्या डोंगरांत वास्तव्यास राहिलेल्या एका शुद्धद्वैतमार्गाच्या महायोग्याने श्री पंतांना अनुग्रह दिला. त्यानंतर पंतांनी काही दिवस योगाचा अभ्यास केला. त्यांना मराठी, कानडी, इंग्रची, हिंदी, संस्कृत आदी भाषा चांगल्याच अवगत होत्या. त्यांचा शिष्यसमुदायही बर्याच मोठ्या प्रमाणावर जमला. पंतांची राहणी अत्यंत साधी असून ते प्रेमळ आणि निःस्पृह होते. त्यांनी आपल्या प्रेमाने आणि सौजन्याने संसार आनंदमय बनवून आपले अवतार कार्य वयाच्या ५१ व्या वर्षी समाप्त केले. बेळगाव येथे त्यांनी देहत्याग केल्यावर त्यांच्या सहस्रो शिष्यांनी मोठ्या समारंभाने त्यांचा देह बाळेकुंद्री येथे नेला आणि त्यांच्या आंबराईत त्याला अग्निनारायणाच्या स्वाधीन करून त्या ठिकाणी एक औदुंबर वृक्ष लावला. या ठिकाणी त्यांच्या भक्तांकडून प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणावर त्यांचा उत्सव होत असतो.’
(साभार : ‘दिनविशेष (भारतीय इतिहासाचे तिथीवार दर्शन)’)