उज्जैन (मध्यप्रदेश) येथील महाकालेश्वर मंदिराच्या परिसरातील ‘महाकाल लोक’ संकुलाचे उद्घाटन
उज्जैन (मध्यप्रदेश) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येथील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या महाकालेश्वर मंदिराच्या परिसरातील ‘महाकाल लोक’ या नवीन संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी १५ फूट उंचीच्या शिवलिंगाच्या प्रतिकृतीवरील पडदा हटवून हे उद्घाटन करण्यात आले. हे संपूर्ण संकुल आध्यात्मिक स्तरावर निर्माण करण्यात आले आहे. अध्यात्माचे हे नवे प्रांगण सर्वांसाठी खुले करण्यात आले आहे. यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी महाकालेश्वर मंदिरात जाऊन पूजा केली. तसेच काही मिनिटे ध्यान केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रक्षेपण क्षिप्रा नदीच्या काठावर मोठ्या पडद्यावर करण्यात आले. याच लाभ सहस्रो लोकांनी घेतला. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जगातील ४० देशांमध्ये करण्यात आले.
महाकाल लोक संकुलासाठी ८५६ कोटी रुपये खर्च करण्यात आले. पूर्वी २.८ हेक्टरमध्ये पसरलेले महाकाल संकुल आता ४७ हेक्टरचे झाले आहे. यात ९४६ मीटर लांबीचा मार्ग असणार आहे. यामुळे भाविक थेट मंदिराच्या गर्भगृहात पोचू शकणार आहेत.