सावरकरांविषयी बोलण्यापूर्वी राहुल गांधींनी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचा अभ्यास करावा ! – जगदीश मुळीक, भाजप शहराध्यक्ष
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण
पुणे – ज्यांच्या पूर्वजांनी देशाची फाळणी केली, ते राहुल गांधी ‘भारत जोडो यात्रा’ काढत आहेत. प्रत्यक्षात या यात्रेतून देश तोडण्याची भाषा केली जाते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधाने केली जातात. सावरकरांनी अनेकांना क्रांतीची प्रेरणा दिली. त्यांच्याविषयी बोलण्यापूर्वी राहुल गांधींनी भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासाचा अभ्यास करावा, अशी टीका भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रे’च्या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्याचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.
मुळीक पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय परिस्थितीत जाणीवपूर्वक वीर सावरकरांना अपमानीत करण्याचे काम केले गेले. राहुल गांधी यांना स्वातंत्र्याचा इतिहास माहिती नाही. देशातील काँग्रेसचा जनाधार संपला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वीर सावरकर यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा भारतीय जनतेने स्वीकार केला आहे. त्यामुळे नैराश्यातून राहुल गांधी बेताल वक्तव्य करीत आहेत.